BREKING : रावेर ग्रामीण रुग्णालयाची आमदार अमोल जावळे यांच्याकडून झाडाझडती : पूर्वसूचना न देता गैरहजर कर्मचाऱ्यांना शोकॉज नोटीस बजावण्याच्या तहसीलदारांना सूचना
आमदार जावळे यांच्याकडून पाहणी, संताप आणि इशारा

प्रतिनिधी/ रावेर
रावेर मतदार संघांचे आमदार अमोल जावळे यांनी आज दुपारी येथील ग्रामीण रुग्णालयाला अचानक भेट देत रुग्णांना दिल्या जाणाऱ्या सुविधांची पाहणी केली. यावेळी रुग्णालयातील ऑक्सिजन सिलेंडर रिकामे असल्याचे तर एक्स-रे मशीन बंद असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे रुग्णांना अत्यावशक सेवा कशी देतात ? असा प्रश्न रुग्णालय प्रशासनाला विचारत श्री जावळे यांनी संताप व्यक्त केला. यावेळी हजेरी पत्रकाची पाहणी केली असता अनेक कायमस्वरूपी कर्मचारी कोणतीही पूर्व सूचना न देता गैरहजर असल्याचे उघडकीस आले. या कर्मचाऱ्यांना शोकॉज नोटीस बजावण्याच्या सूचना आमदार जावळे यांनी यावेळी उपस्थित असलेल्या तहसीलदार बी ए कापसे यांना केल्या असून यापुढे तक्रार आल्यास कारवाई होईल असा इशारा श्री जावळे यांनी यावेळी दिला.
शासकीय कार्यालयातील दिरंगाई व गलथान कारभाराला चाप लावत कामात सुसूत्रता यावी व नागरिकांची कामे वेळेत व्हावी तसेच शासकीय कार्यलायातून दिल्या जाणाऱ्या सेवा वेळेवर मिळाव्यात यासाठी आमदार अमोल जावळे प्रयत्नशील आहेत. आज दुपारी अचानक त्यांनी येथील ग्रामीण रुग्णालयाला भेट देत तेथील सुविधा, यंत्र, उपकरणे, पुरुष व स्त्री आंतर रुग्ण कक्ष, प्रसुतीगृह, नवजात शिशु कक्ष, शव विच्छेदन रूम, औषधी भांडार, एक्स-रे विभाग, पिण्याच्या पाण्याची सुविधा, यासह इतर विभागांची पाहणी केली. यावेळी इमर्जन्सी वार्ड , पुरुष आंतर रुग्ण कक्ष, नवजात शिशु कक्षातील तिघे ऑक्सिजन सिलेंडर रिकामे असल्याचे दिसून आले. तर एक्स रे मशीन आठ दिवसापासून बंद स्थितीत असल्याची माहिती या विभागाच्या कर्मचाऱ्याने दिली. यावेळी उपस्थित असलेले तहसीलदार बी ए कापसे यांना याची तत्काळ दखल घेवून कारवाई करण्याच्या सूचना आमदारांनी दिल्या.
समस्यांचा विळखा
पिण्याच्या पाण्याची रुग्णालयात सुविधा नाही, बेडवरील गाद्या फाटलेल्या स्थितीत आढळून आल्या. स्वच्छतेचा रुग्णालयात अभाव असल्याचे निदर्शनास आले. यामुळे आमदार अमोल जावळे चांगलेच संतापले. आरोग्य सेवेवर शासन मोठा खर्च करते. मात्र रुग्णालयातून रुग्णांना सुविधा का पुरविल्या जात नाहीत याबाबत वैद्यकीय अधिकारी डॉ वीरेंद्र काटकर यांना जाब विचारला. तसेच बेजबाबदार वर्तणुकीबाबत कर्मचाऱ्यांची चांगलीच झापाई केली.
गैरहजर कर्मचाऱ्यांना शोकॉज नोटीस
येथील रुग्णालयात कायमस्वरूपी व कंत्राटी कर्मचारी आहेत. यावेळी कंत्राटी कर्मचारी उपस्थित होते. तर कायमस्वरूपी अनेक कर्मचारी कार्यालयात आढळले नाहीत. हजेरी पत्रकाची आमदार जावळे यांनी पाहणी केली असता अनेक कर्मचाऱ्यांच्या सह्या नसल्याचे निदर्शनास आले. तर हे कर्मचारी रजेवर नसल्याची माहिती यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉ काटकर यांनी दिली. त्यामुळे गैरहजर कर्मचाऱ्यांना शोकॉज नोटीस बजावण्याच्या सूचना आमदार अमोल जावळे यांनी यावेळी तहसीलदार बी ए कापसे यांना दिल्या आहेत. यावेळी श्री जावळे यांनी कर्मचाऱ्यांच्या समस्या एकूण घेत त्या सोडविण्याचे आश्वासन दिले. यावेळी निवासी नायब तहसीलदार आर डी. पाटील, मंडळ अधिकारी टोंगळे, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष पद्माकर महाजन, तालुकाध्यक्ष एड सुर्यकांत देशमुख, रवींद्र पाटील, पंचायत समितीचे माजी उपसभापती पी के महाजन, सी एस पाटील, राजेश शिंदे, बाळा अमोदकर यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते.
“रावेर ग्रामीण रुग्णालयातून दिल्या जाणाऱ्या सुविधांबाबत नागरिकांच्या असंख्य तक्रारी होत्या. याची दखल घेवून रुग्णालयाला सरप्राईज व्हिजीट दिली. रुग्णांना तसेच सुविधा पुरविण्यात रुग्णालय प्रशासनाला असलेल्या अडचणी समजून घेतल्या. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ किरण पाटील यांच्याशी बोलून असुविधांची माहिती दिली आहे. बेजबाबदार कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याच्या सूचना तहसीलदारांना दिल्या आहेत.”
___-अमोल जावळे आमदार, रावेर