अमेरिकेत आषाढी एकादशीला दुमदुमणार विठू नामाचा गजर

महाराष्ट्रीयन युवकांनी न्यू जर्सीत उभारले पांडुरंगाचे मंदिर

अमेरिकेत आषाढी एकादशीला दुमदुमणार विठू नामाचा गजर

कृष्णा पाटील  / रावेर

महाराष्ट्राचे आराध्य दैवत पांडुरंग परमात्म्याच्या मूर्तीची प्राण प्रतिष्ठा मराठी माणसांनी २१ मे रोजी सातासमुद्रापार न्यू जर्सी (अमेरिका) येथे केली आहे. अमेरिकेत यंदा २९ जूनला असलेल्या आषाढी एकादशीला टाळ मृदूंगाच्या गजरात विठूनामाचा जयघोष दुमदुमणार आहे. अमेरिकेत स्थायिक असलेल्या महाराष्ट्रातल्या तीन मराठी उद्योजकांनी यासाठी पुढाकार घेतला आहे. न्यू जर्सी येथे १० एकर जागेवर २० हजार स्क्वेअर फूट जागेवर मंदिर उभारण्यात येत आहे.

 महाराष्ट्रातील प्रवीण पाटील (जामनेर ), भालचंद्र कुलकर्णी (मुंबई) व आनंद चौथाई (पुणे) या  उद्योजक मित्रांनी न्यू जर्सी येथे मराठी माणसाचे आराध्य दैवत विठ्ठल रखुमाईचे मंदिर उभारण्याचा निर्णय घेतला. यासाठी १० एकर जागा विकत घेऊन त्याठिकाणी २० हजार स्क्वेअर फूट जागेवर या मंदिराची उभारणी करण्यात येणार आहे. २१ मे रोजी स्टिवसेंट अवे लिंधर्स्ट (न्यू जर्सी) या ठिकाणी पंढरपूर येथून नेलेल्या अडीच फूट उंचीच्या विठ्ठल रखुमाईंच्या मूर्तीची स्थापना करण्यात आली आहे. हे मंदिर सर्वांसाठी अमेरिकन स्टॅंडर्ड टाईम नुसार सायंकाळी पाच ते रात्री साडेआठ पर्यंत दर्शनासाठी उघडे ठेवण्यात येते. २९ जूनला यंदाच्या आषाढी एकादशीच्या मुहूर्तावर अमेरिकेत राम कृष्ण हरी आणि ज्ञानोबा तुकाराम नाममंत्राचा घोष दुमदुमणार आहे. अमेरिकेत आषाढी वारी साजरी करण्यासाठी आतापासूनच तयारी सुरू झाली आहे.
 
शिकागोत पांडुरंगाची स्थापना
३ एप्रिल रोजी शिकागोत महाराष्ट्रीयन तरुण उद्योजकांनी पांडुरंगाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करून मंदिराची उभारणी केली. त्यापाठोपाठ आता न्यू जर्सी या ठिकाणी सुद्धा पांडुरंगाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना केली आहे. भविष्यात जवळपास दहा एकर भूभागावर मंदिर उभारणीचे कार्य आरंभ केले जाईल अशी माहिती न्यू जर्सी(अमेरिका) येथून उद्योजक  प्रवीण पाटील, भालचंद्र कुलकर्णी व आनंद चौथाई यांनी दिली.
न्यू जर्सीत विठ्ठल मंदिर उभारण्याचा या तिघांचा मोठा वाट आहे.


अमेरिकेतील न्यू जर्सी मध्ये पहिल्यांदाच पांडुरंगाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा झाली आहे. येथे पहिल्यांदाच आषाढी वारी ग्लोबल स्वरूपात साजरी करण्यात येणार आहे. वारीचे स्वरूप कसे असावे याविषयी थेट अमेरिकेतून प्रवीण पाटील यांनी  चर्चा करीत माहिती घेतली. २९ जूनला यंदा अमेरिकेत प्रथमच आषाढी वारी होत असून महाराष्ट्रीयन भाविकभक्त वारी सोहळ्यात मोठ्या प्रमाणात सहभागी होणार असून ते वारीचा अनुभव घेणार आहे.
 --प्रा रामकृष्णा महाराज पाटील, जामनेर  


विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या माध्यमातून अमेरिकेत स्थायी झालेल्या महाराष्ट्रीयन आणि भारतीय मंडळींना एकत्रित आणणे, महाराष्ट्राचे थोर संतांचे विचार तरुण व बालकांमध्ये प्रसार आणि प्रचार करणे, परदेशात भारतीय संस्कृतीचे अध्ययन करणे, भक्तीचे संस्कार करणे या व्यापक दृष्टिकोनातून या मंदिराचे निर्माण कार्य हाती घेण्यात आले आहे.
--प्रवीण पाटील न्यू जर्सी (अमेरिका)