ब्रेकिंग: पुरात वाहून गेल्याने एकाचा मृत्यू, तर एक जण बेपत्ता

घरांमध्ये पाणी घुसले, पूर परिस्थितीची तहसीलदारांतर्फे पाहणी

ब्रेकिंग: पुरात वाहून गेल्याने एकाचा मृत्यू, तर एक जण बेपत्ता

कृषीसेवक न्यूज नेटवर्क / रावेर 

बुधवारी रात्री झालेल्या मुसळधार पावसाने रावेर तालुक्यातील नदी नाल्यांना आलेल्या पुरात दोन  जण वाहून गेल्याची प्राथमिक अंदाज व्यक्त आहे. त्यापैकी एकाचा मृतदेह आज (दि ६ ) सकाळी हाती लागला आहे. बाबुराव रायसिंग बारेला (वय ५०) रा.  मोरव्हाल ता रावेर असे पुरात वाहून मयत झालेल्याचे नाव आहे.  तर बेपत्ता झालेल्या दुसऱ्याची शोध मोहीम नागरिक, मित्रपरिवार, कुटुंब, महसूल, व पोलीस यंत्रणेतर्फे सुरु आहे.  रात्री पुराचे पाणी नदीकाठावरील अनेक घरांमध्ये घुसल्याने नागरिकांचे संसारोपयोगी साहित्याचे नुकसान झाले आहे. खिरोदा प्र रावेर येथील दहा ते बारा गुरे पुराच्या पाण्यात वाहून गेल्याची माहिती नागरिकांनी दिली आहे.  तहसीलदार बंडू कापसे यांनी रात्रीच पूर परिस्थितीची व नुकसानीची पाहणी करीत उपाययोजना केल्या आहेत. 

बुधवारी रात्री तालुक्यात व मध्यप्रदेशात मुसळधार पाऊस झाल्याने सुकीधरण पूर्ण क्षमतेने भरुन ओव्हरफ्लो झाले आहे. रात्री अभोडा येथील तसेच शहरातून गेलेल्या नागझिरी नदीला मोठा पूर आला होता. अभोडा येथील नदीच्या पुराच्या पाण्यात बाबुराव रायसिंग बारेला हा वाहून गेला होता. आज सकाळी शोध कार्य सुरु असताना त्याचा मृतदेह हाती लागला असल्याची माहिती तहसीलदार कापसे यांनी दिली. तर शहरातील जुना सावदा रस्त्यावरील नागझिरी नदीला आलेल्या पुरात पुलावरून दोन मोटार सायकल वाहून गेल्या आहेत. त्यापैकी प्रसंगावधान राखल्याने एक जण थोडक्यात बचावला आहे. तर एक जण बेपत्ता असून रात्रीपासून त्याची शोध मोहीम राबविण्यात येत आहे. 

घरांमध्ये पाणी घुसले 

नागझिरी नदीला आलेल्या पुराचे पाणी रात्री रसलपूर, रमजीपूर, खिरोदा या गांवामधील घरांमध्ये घुसल्याने नागरिकांचे संसारोपयोगी साहित्य ओले झाले. तहसीलदार बंडू कापसे यांनी रात्रीच पूर परिस्थितीची पाहणी केली. पुराच्या पाण्यात दहा ते बारा गुरे वाहून गेल्याने नागरिकांचे नुकसान   झाले आहे.