शेतकऱ्यांनी उत्पादक न राहता उद्योजक व्हावे : आमदार अमोल जावळे

फैजपूरला कृषीधन केळी महोत्सव व प्रदर्शन

शेतकऱ्यांनी उत्पादक न राहता उद्योजक व्हावे : आमदार अमोल जावळे

प्रतिनिधी/फैजपूर

शेतीतील नव तंत्रज्ञानात दररोज भर पडत आहे. मात्र हे तंत्रज्ञान प्रयोगशाळेपुरते मर्यादित न राहता ते जमिनीपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न विविध उपक्रमांच्या माध्यमातून झाला पाहिजे. शेतकऱ्यांनी उत्पादक न राहता आता उद्योजक झाले पाहिजे ही काळाची गरज आहे असे आवाहन आमदार अमोल जावळे यांनी केले. फैजपूर येथे आयोजित कृषिधन या “केळी महोत्सव व प्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी ते मार्गदर्शन करतांना बोलत होते.

पाल येथील कृषी विज्ञान केंद्र व कृषी विभाग यांच्यातर्फे फैजपूर येथे कृषीधन या कृषीप्रदर्शनाचे ६ ते ८ फेब्रुवारी दरम्यान आयोजन करण्यात आले आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार शिरीष चौधरी होते. प्रांताधिकारी बबनराव काकडे यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून प्रदर्शनाला सुरुवात करण्यात आली. यावेळी व्यासपीठावर माजी आमदार रमेश चौधरी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कुर्बान तडवी, फुलशेतीचे प्रयोगशील शेतकरी राजाराम चौधरी(जुन्नर), सातपुडा विकास मंडळाचे अध्यक्ष अशोक झांबरे, उपाध्यक्षा डॉ अरुणा चौधरी, सचिव अजित पाटील, हेमंत शेवाळे, प्रगतीशील शेतकरी रामचंद्र महाजन, कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष डॉ राजेंद्र पाटील, माजी नगराध्यक्ष हरीश गनवाणी, निंभोरा कृषी तंत्र विद्यालयाचे अध्यक्ष प्रल्हाद बोंडे, सुनील कोंडे, तालुका कृषी अधिकारी भाऊसाहेब वाळके(रावेर), भरत वारे(यावल) यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

श्री जावळे उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन करतांना पुढे म्हणाले की, शेतीत बदलत्या वातावरणामुळे शेती पिकांवर विपरीत परिणाम होत आहे. त्यामुळे पिकांचे अनेक वेळा नुकसान होते, उत्पादनात घट येते. उत्पादित शेतमालाला योग्य बाजारपेठ मिळवायची असेल तर प्रक्रिया उद्योगावर शेतकऱ्यांनी भर दिला पाहिजे असे मत श्री जावळे यांनी यावेळी व्यक्त केले. महिला बचत गटांच्या माध्यमातून महिलांनी उभरलेले उद्योग आर्थिक सक्षमता निर्माण करणारे आहेत. युवकांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करून शेती करावी असा सल्ला आमदार अमोल जावळे यांनी यावेळी उपस्थितांना दिला.

सेंद्रिय शेतीची कास धरावी : शिरीष चौधरी

नवनवीन तंत्रज्ञान व सेंद्रिय शेतीची कास धरल्याशिवाय शेतकरी अधिक सक्षम होऊ शकणार नाही. पाल कृषी विज्ञान केंद्र व कृषी विभागातर्फे आयोजित हे कृषी प्रदर्शन केळी पिकाला समर्पित करण्यात आले आहे. विपरीत हवामान विरोधात शेतकरी सातत्याने संघर्ष करीत आहे. उत्पादनात वाढ करण्यासह खर्च कमी करण्यासाठी विज्ञान केंद्रातर्फे उपाय शोधण्याचा प्रयत्न कृषी विज्ञान केंद्र करीत आहे. केळी फळाची विक्री करण्याबरोबरच खोडाचा, पानाचा व या पिकाच्या प्रत्यके भागाचा व्यावसायिकतेच्या दृष्टीकोनातून वापर झाला पाहिजे. यासाठी प्रक्रिया उद्योग उभारण्याची गरज आहे. शेतकऱ्यांनी एकच पिकावर अवलंबून न राहता विविध पिकांची लागवड करून उत्पादनघेण्याची गरज आहे. तसेच शेतीशी निगडीत व्यवसायाची कास धरावी असे आवाहन माजी आमदार शिरीष चौधरी यांनी केले.

शेतकऱ्यांनी प्रगत तंत्रज्ञान स्वीकारावे : काकडे

शेती क्षेत्रातही आधुनिक तंत्रज्ञान पोहचले असून शेतकऱ्यांनी याचा वापर उत्पादन वाढीसाठी करावा. हे तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहचविण्याचे काम पाल कृषी विज्ञान केंद्रातर्फे सुरु आहे. शेती क्षेत्रात आधुनिक प्रयोग केले जात असून शेतीला तंत्रज्ञानाची जोड दिल्याशिवाय आर्थिक विकास साधता येणार नाही. त्यासाठी शेतकऱ्यांनी प्रगत तंत्रज्ञान स्वीकारले पाहिजे असे आवाहन फैजपूर विभागाचे प्रांताधिकारी बबनराव काकडे यांनी केले.

शेतकऱ्यांचा सन्मान

विविध पिकात तसेच उद्योगात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या शेतकऱ्यांचा यावेळी रुमाल व सन्मानपत्र स्मृतिचिन्ह देवून मान्यवरांच्या हस्ते कृषी विज्ञान केंद्रातर्फे सन्मान करण्यात आला. तसेच केळी पिकावर तयार केलेल्या घडी पुस्तिकेचे प्रकाशन यावेळी करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्तविक पाल कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख डॉ महेश महाजन यांनी केले. मान्यवरांचे स्वागत केंद्राच्या कर्मचाऱ्यांनी केले.