रावेरला बेशिस्त वाहतुकीसह वाहन चालकांवर आजपासून पोलिसांच्या कारवाईचा दंडुका
सर्वांनी वाहतुकीचे नियम पाळावेत : पोलीस निरीक्षक संदीप पाटील
प्रतिनिधी/रावेर
रावेर शहरातील मुख्य रस्त्यांवर असलेले अतिक्रमण काढण्याची धडक मोहीम नगरपालिका व पोलीस विभागाने दोन दिवसापूर्वी राबविली. यामुळे शहरातील मुख्य रस्ते मोकळे झाले आहेत. मात्र शहरात बेशिस्त वाहतुकीने कळस गाठला असून या वाहन चालकांना लगाम लावण्यासाठी बेशिस्तपणे पार्किंग करणाऱ्या व बेशिस्तपणे वाहन चालवणाऱ्या वाहन चालकांवर कडक कारवाईचा दंडुका पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांनी उगारला आहे. वाहनचालकांनी वाहतुकीचे नियम पाळावेत असे आवाहनही त्यांनी यावेळी केले आहे.
रावेर शहरातील मुख्य रस्त्यांवर तसेच अंकलेश्वर–बऱ्हाणपूर महामार्गावर मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण झालेले होते. त्यामुळे अपघाताच्या अनेक वेळा घटना यापूर्वी घडलेल्या आहेत. अतिक्रमण काढण्याबाबत नागरिकांच्या सातत्याने नगरपालिका व पोलीस विभागाकडे तक्रारी येत होत्या. दोन दिवसात शहरातील मुख्य रस्त्यावरील व महामार्गावरील अतिक्रमण काढण्यात आल्याने रस्ते मोकळे झाले आहेत.
आजपासून बेशिस्त वाहतुकीला लगाम
पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांनी १६ जूनला पदभार स्वीकारल्यानंतर शहरात फिरून पाहणी केली. यावेळी त्यांनी शहरातील विविध भागांची सविस्तर माहिती जाणून घेतली. शहरात मोठ्या प्रमाणावर बेशिस्त वाहन चालक व वाहतूक सुरु असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले आहे. त्यामुळे मुख्य रस्त्यांवर व महामार्गावर बेशिस्तपणे वाहन उभे करणाऱ्या वाहनावर आजपासून कडक कारवाईचा दंडुका उगारला जाणार आहे. ग्रामीण रुग्णालयापासून ते डॉ बाबासाहेब आंबेडकर चौकापर्यंत मुख्य रस्त्याच्या दुतर्फा तसेच डॉ. आंबेडकर चौकात दुचाकी व चारचाकी बेशिस्तपणे उभ्या केल्या जातात. आंबेडकर चौकापासून सावदा रोडने नागझिरी पुलापर्यंत तसेच याच चौकापासून बऱ्हाणपूर रोडवर वाहनचालक मनमानी पद्धतीने वाहने उभी करीत असल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण होतो. अशा वाहनांवर पोलीस विभागातर्फे कारवाई करण्यात येणार आहे. डॉ आंबेडकर चौक ते हेडगेवार चौकापर्यंत रस्त्यात वाहने उभी करणाऱ्यांविरुद्ध कडक कारवाई केली जाणार आहे.
अल्पवयीन चालकांच्या पालकांवर कारवाई
अल्पवयीन मुलांना वाहन चालवण्यावर शासनाची बंदी आहे. मात्र अल्पवयीन मुले व मुली बेदकारपणे डब्बल ट्रिपल सीट वाहने चालवीत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आल्याने या मुलांच्या पालकांवर आता पोलीस विभागातर्फे कारवाई करण्यात येणार आहे. याशिवाय लायसन्स नसणे, वाहनाचे कागदपत्र नसणे, नंबर प्लेट नसणे, ट्रिपल सीट दुचाकी चालवणे, कट मारणे, वाहतुकीला अडथला निर्माण होईल असे वाहन रस्त्यात उभे करणे विनाकारण हॉर्न वाजवणे अशा वाहन चालकांवर प्रसंगी वाहन जप्त करण्याची कारवाई केली जाणार असल्याची माहिती पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांनी दिली.
धडाकेबाज पोलीस निरीक्षक
वीस दिवसापूर्वी बदलून आलेल्या पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांनी नगरपालिका प्रशासनाच्या पाठीशी खंबीरपणे बळ उभे करीत प्रथम अतिक्रमण हटाव मोहीम हाती घेत यशस्वीपणे राबविली. त्यांच्या या कारवाईचे रावेरकरांनी उत्स्फुर्तपणे स्वागत केले आहे. आता श्री पाटील यांनी बेशिस्त वाहतुकीला लगाम लावण्यासाठी आजपासून मोहीम उघडली असून यामुळे पायी चालणाऱ्या पादचाऱ्यांनी पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांचे आभार मानले आहे.
"वाहन चालकांनी आपली वाहने वाहतुकीला अडथळा निर्माण होणार नाही अशा पद्धतीने उभी करावीत. तसेच पालकांनी अल्पवयीन मुलांना वाहन देवू नये. बेशिस्तपणे वाहन चालवीत असल्याचे आढळून आल्यास कडक कायदेशीर कारवाई करण्यात येईल. सर्वांनी वाहतुकीचे नियम पाळावेत."
---- संदीप पाटील, पोलीस निरीक्षक रावेर

krushisewak 
