पदाचा दुरुपयोग : रसलपूर ग्रामपंचायतीच्या सरपंचाचे काळे कारनामे : 15 व्या वित्त आयोगातील कामे स्वतःच्या भावाच्या नावावर
पुढील आठवड्यात आवळाला जाणार चौकशीचा फास
प्रतिनिधी/रावेर
तालुक्यातील रसलपूर ग्रामपंचायतीत 15 व्या वित्त आयोगाच्या निधीत गैरव्यवहार झाल्याचा संशय आहे. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करणवाल यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. त्यानुसार उप मुख्य कार्यकारी अधिकारी बी एस अकलाडे यांनी रावेरचे बिडीओ विनोद मेढे यांना चौकशी करून पुढील कार्यवाहीसाठी अहवाल पाठविण्याचे आदेश दिले आहेत. दरम्यान, येथील सरपंच हनीफखान यांनी पदाचा गैरवापर करीत स्वतःच्या भावाच्या नावावर 15 वा वित्त आयोगातील अनेक कामे घेतल्याची माहिती ग्रामपंचायतीने दिलेल्या कागदपत्रावरून दिसून येत आहे. त्यामुळे आर्थिक गैरव्यवहारात प्रथम दर्शनी सरपंचांचा सहभाग असल्याची अधिक शक्यता जिल्हा परिषदेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी वर्तवली आहे.
रसलपूर ग्रामपंचायतीत सन 2022 ते 2025 या काळात 15 व्या वित्त आयोगाच्या निधीत मोठ्या प्रमाणावर आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा संशय आहे. याची वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून चौकशी करून दोषींवर गुन्हे दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश जिल्हा परिषदेचे उप मुख्य कार्यकारी बी एस आकलडे यांना दिले आहेत. जिल्हा परिषदेच्या सिइओ मिनल करणवाल यांनीही या ग्रामपंचायतीच्या तक्रारीची दखल घेतली आहे. रावेरचे बिडीओ विनोद मेढे यांना चौकशी करून अहवाल पाठविण्याचे आदेश उप मुख्य कार्यकारी अधिकारी श्री अकलाडे यांनी दिले आहेत. त्यामुळे पुढील आठवड्यात येथील ग्रामपंचायतीच्या चौकशीचा फास आवळाला जाण्याची अधिक शक्यता आहे.
सरपंचाने केला पदाचा गैरवापर
15 वा वित्त आयोगाच्या निधीतून गावात करण्यात आलेल्या कामांमध्ये मोठ्या प्रमाणावर आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा संशय आहे. सरपंच हनीफखान अय्याजखान यांनी पदाचा दुरुपयोग करीत या निधीतून स्वतःचा भाऊ सत्तारखान अय्याजखान यांच्या नावावर अनेक कामे घेतलेली आहे. हे दोघे भाऊ एकत्र कुटूंबातील आहेत. त्यामुळे संशयित आर्थिक गैरव्यवहारात प्रथम दर्शनी सरपंचांचा सहभाग असल्याची अधिक शक्यता जिल्हा परिषदेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी वर्तवली आहे. सरपंच हनीफखान यांच्या भावाच्या नावावर कामे घेतल्याची माहिती ग्रामपंचायतीने दिलेल्या कागदपत्रावरून उघड झाली आहे.
मलिदा नेमका कोणाच्या घशात
या योजनेच्या निधीत झालेल्या संशयित आर्थिक गैरव्यवहारात आणखी कोणकोणत्या ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांचा सहभाग आहे, कोणाकोणाच्या घशात या योजनेतून मलिदा गेला आहे हे चौकशीतून समोर येणार आहे. पडद्यामागील झारीतील शुक्राचार्य कोण आहेत याचा उलगडा चौकशीतून जनतेला दिसणार आहे. त्यामुळे रसलपूर ग्रामपंचायतीच्या चौकशीतून आर्थिक गैरव्यवहार करणारे खरे चेहरे जनतेसमोर येणार आहे. दरम्यान, यापूर्वी रावेर पंचायत समितीतील शौचालय घोटाळा संपूर्ण राज्यभर गाजला होता. या प्रकरणी 126 जणांविरुद्ध गुन्हा दाखल असून 36 जणांना अटक करण्यात आली होती. त्यामुळे या प्रकरणाच्या चौकशीतून काय निष्पन्न होते याकडे रावेर तालुक्यातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.

krushisewak 
