आदिवासींचे प्रश्न सोडविण्यासाठी कटिबध्द ; जनतेच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही : श्रीराम पाटील
भुसावळ येथे लोकसंघर्ष समितीचा मेळावा
प्रतिनिधी / भुसावळ
आदिवासींचे प्रश्न सोडविण्यासाठी आपण कटिबद्ध असून नागरीकांच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही असा विश्वास महाविकास आघाडीचे राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट )रावेर लोकसभा मतदार संघातील उमेदवार श्रीराम पाटील यांनी दिला आहे. भुसावळ येथे लोकसंघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांच्या आयोजित मेळाव्यात ते बोलत होते.
भुसावळ येथील माळी समाज मंगल कार्यालयात भुसावळ, मुक्ताईनगर व जामनेर या तालुक्यातील लोकसंघर्ष मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी व्यासपीठावर लोकसंघर्ष समितीच्या अध्यक्षा प्रतिभा शिंदे, शिवसेनेचे (उबाठा गट) संपर्क प्रमुख संजय सावंत, रावेर लोकसभा मतदार संघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार श्रीराम पाटील, जळगावचे उप महापौर कुलभूषण पाटील, मराठा सेवा संघाचे सुरेंद्र पाटील, जयश्री सोनवणे, रावेरचे पंचायत समिती माजी सदस्य दीपक पाटील, लोकसंघर्ष समितीचे सचिन धांडे, भगतसिंग पाटील, कैलास मोरे, सीताराम सोनवणे, मुस्तफा तडवी, मन्सूर तडवी गेमा बारेला, रुपसिंग बारेला, बुलंद छावा संघटनेचे प्रमोद पाटील, प्रदीप सपकाळे, नूरा तडवी, केशव वाघ उपस्थित होते. माझ्याकडे विकासाचे व्हिजन असून सातपुड्यातील आदिवासींसह मतदार संघाचा विकास करण्यावर आपला भर राहणार आहे. सर्वच ठिकाणच्या मतदारांचा उत्स्फूर्तपणे पाठिंबा मिळत असून नागरिकांच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही असे श्रीराम पाटील यांनी उपस्थितांना आश्वस्त केले. आदिवासींचे अनेक प्रश्न आजही कायम आहेत. भाजप सरकारने आदिवासींच्या प्रश्नांकडे कायमच दुर्लक्ष केले आहे. त्यासाठी सरकार बदलण्याची गरज आहे असे आवाहन यावेळी लोकसंघर्ष मोर्चाच्या नेत्या प्रतिभा शिंदे यांनी पदाधिकाऱ्यांशी संवाद साधताना केले. तसेच यावेळी शिवसेनेचे संपर्क प्रमुख संजय सावंत यांनी मार्गदशन केले. मेळाव्याला लोकसंघर्ष मोर्चाचे भुसावळ, जामनेर मुक्ताईनगर तालुक्यातील पदाधिकारी , विविध गावांचे सरपंच उपसरपंच, सदस्य, उपस्थित होते.