पोलिसांना यश : एक धागा गवसाला आणि 44 गुन्ह्याचा छडा लागला : वीज तारा चोरणारी टोळी जेरबंद

साडेपाच लाखांचा मुद्देमाल जप्त, तीन जणांना अटक

पोलिसांना यश : एक धागा गवसाला आणि 44 गुन्ह्याचा छडा लागला : वीज तारा चोरणारी टोळी जेरबंद

प्रतिनिधी / रावेर 

शेती शिवरातील वीज वाहिनीच्या आल्यूमिनियम तारा चोरणारी टोळी जेरबंद करण्यात जळगाव एलसीबी व रावेर पोलीस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकाला यश आले आहे. याप्रकारणी तीन आरोपिंना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून साडेपाच लाखाचा मुद्देमाल जप्त केला आहे. तपासाची एक कडी उघडताच एकूण 44 गुन्ह्यांची उकल करण्यात पोलिसांना यश मिळाले आहे. नुरा केरसिंग मोरे रा झिर पांजऱ्या ता धुळकोट जि बऱ्हाणपूर, अनिल भेरसिंग मंडले रा तितरांना ता धुळकोट व चोरीच्या वीज तारा घेणारा यासिन खान हुसेन खान रा उटखेडा रोड, रावेर यांना अटक करण्यात आली आहे.

रावेर परिसरातील शेती शिवरातील वीज वितरण कंपनीच्या विद्युत खंबावरील वीज तारा रात्रीच्या वेळी चोरून नेण्याच्या घटना मोठ्या प्रमाणावर घडत होत्या. यामुळे वीज कंपनीचे नुकसान होऊन शेतकऱ्यांना वीज पुरवठा मिळत नव्हता.

वीज तार चोरीचे 44 गुन्हे 

रावेर, फैजपूर, निंभोरा व यावल पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात गेल्या आठ महिन्यात वीज तारा चोरीचे प्रमाण वाढले होते. या काळात रावेर पोलीस स्टेशनमध्ये एकूण 22, यावल पोलीस स्टेशन मध्ये 14, निंभोरा पोलीस स्टेशन व फैजपूर पोलीस स्टेशन मध्ये प्रत्येकी 4 गुन्हे दाखल आहेत. 

यांनी लावला छडा 

एलसीबी चे पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांच्या मार्गदर्शनात पोलीस उप निरीक्षक राहुल तायडे, गणेश वाघमारे, पोलीस कर्मचारी महेश महाजन,नितीन बाविस्कर, प्रमोद लाडवंजारी, किरण धनगर, ईश्वर पाटील, बबन पाटील, प्रमोद ठाकूर, प्रदीप सपकाळे, तर रावेर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक डॉ विशाल जयस्वाल यांच्या मार्गदर्शनात गुन्हे शोध पथकातील रवींद्र वंजारी, सचिन घुगे, प्रमोद पाटील, विशाल पाटील, महेश मोगरे, विकार शेख, सुकेश तडवी यांनी मिळालेल्या एका तपासाच्या धाग्यावरून 44 गुन्ह्यांचा शोध एका झटक्यात लावला आहे.

चोरीसाठी वापरलेली कार जप्त 

आरोपी रात्री वीज तारा चोरीसाठी स्विप्ट डिझायर कार क्र एम पी 68 झेड सी 2546 चा वापर करीत होते. व चोरलेले तार रावेर येथील उटखेडा रोडवरील यासिन खान हुसेन खान याला विकत होते. ही कार पोलिसांनी जप्त केली आहे.