महसूल अधिकाऱ्यांची हतबलता की गौण खनिज माफियांची मुजोरी : रावेर तालुक्यातून गौण खनिजाची अवैध वाहतूक रोखणार कोण ?
महसूल विभागाला लागतोय चुना

प्रतिनिधी / रावेर
रावेर तालुक्यात मोठ्या प्रमाणावर वाळू माती मुरूम या गौण खनिजाचे अवैधरीत्या उत्तखनन व वाहतूक सुरु आहे. महसूल विभागाकडून यावर नाममात्र कारवाई होत आहे. गौण खनिजाचे अवैधरीत्या होणारे उत्तखंनं व वाहतूक रोखण्यात महसूल विभागाचे अधिकारी सपशेल अपयशी ठरल्याचे दिसून येत आहे. अवैध गौण खनिजाच्या वाहतुकीला आळा घालता न आल्याने अखेर या विभागाचे अधिकारी व कर्मचारी वाळू माफियासमोर हतबल झाल्याचे दिसून येते. तर या विभागाच्या अधिकाऱ्यांना न जुमानता अवैध वाहतूक बिनबोभाट रात्रंदिवस सुरु असल्याने माफियाची मुजोरी वाढली आहे. उटखेडा शिवारात दररोज सुमारे 20 डंपरद्वारे मातीची वाहतूक सुरु आहे.
रावेर तालुक्यात वाळू व माती व मुरूमची अवैध वाहतूक राजरोसपणे सुरु आहे. याला आळा घालण्यात महसूल विभागाचे अधिकारी व कर्मचारी अपयशी ठरले आहेत. पंधरा दिवसापूर्वी रोझोदा-खिरोदा रस्त्यावर या भागाच्या मंडळ अधिकाऱ्याने अवैध वाहतूक करणारे डंपर पकडले होते. मात्र दोन दिवस होऊनही यावर कारवाई झाली नसल्याने स्थानिक नागरिकांना शंका आली. आर्थिक तडजोड न झाल्याने अखेर तिसऱ्या दिवशी या डंपरवर महसूल विभागाला कारवाई करावी लागली.
हतनूर कालव्या जवळील गाशा गुंडाळला
हतनूर कालव्या लगत मातीचे अवैध उत्तखंनं व वाहतूक सुरु असल्याचे कालवा लगतच्या गावातील शेतकऱ्यांनी सांगितले. याकडे हतनूर प्रकल्प व महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष झाले आहे. याबाबतचे वृत्त शुक्रवारी कृषिसेवकमधून प्रकाशित होताच आज सकाळीच अवैध मातीची वाहतूक करणाऱ्यांनी या ठिकाणचा गाशा गुंडाळून पलायन केले. तर मातीची वाहतूक केल्याचा पुरावा दिसू नये यासाठी वाहतूकदारांनी वाहतुकीसाठी वापरलेला रस्ता झाडून स्वच्छ केल्याची माहिती शेतकऱ्यांनी दिली.
उटखेडा शिवारात अवैध उत्तखनन व वाहतूक
दरम्यान, मातीच्या अवैध वाहतूकदारांनी त्यांचा मोर्चा आता उटखेडा शिवारात वळवला आहे. उटखेडा-मुंजलवाडी रस्त्याने एका ठिकाणी सावदा परिसरातील दोन व्यक्तीकडून जेसीबीने अवैध उत्तखन सुरु असून दररोज 15 ते 20 डंपरद्वारे या मातीची वाहतूक सुरु आहे. ही वाहतूक रोखण्याचे महसूल प्रशासनासमोर मोठे आव्हान आहे. महसूल विभाग कारवाई करण्यात हतबल झाल्यानेच वाळू व माती माफियांची रावेर तालुक्यात मुजोरी वाढली आहे.
*उद्या वाचा : शेतात माती टाकणाऱ्या शेतकऱ्यांची माफियांकडून लूट : महसूल विभागाचा हिस्सा किती ?*