राजकीय विश्लेषण ; रावेर विधानसभा मतदार संघात कोण मारेल बाजी ?

भाजपमध्ये अर्धा डझन उमेदवार इच्छुक

राजकीय विश्लेषण ; रावेर विधानसभा मतदार संघात कोण मारेल बाजी ?

कृष्णा पाटील/ रावेर

येत्या नोव्हेंबर महिन्यात विधानसभा निवडणुका होण्याचे संकेत मिळाले आहेत. त्यादृष्टीने राजकीय पक्ष व इच्छुक उमेदवारांची तयारी व जनसंपर्क सुरु आहे. सध्या हा मतदार संघ कॉंग्रेसच्या ताब्यात असून शिरीष चौधरी हे या मतदार संघाचे विधानसभेत प्रतिनिधित्व करत आहेत. मात्र या मतदार संघातील चाणाक्ष मतदारांनी प्रत्येक वेळी आपला लोकप्रतिनिधी बदलला आहे. गेल्या पाच निवडणुकांचा इतिहास पाहता विद्यमान आमदाराला सलग पुन्हा दुसऱ्यांदा मतदारांनी संधी दिलेली नाही. या निवडणुकीसाठी भाजपतर्फे अर्धा डझन इच्छुक उमेदवारी मिळण्यासाठी शर्यतीत आहेत. तर कॉंग्रेसतर्फे  येणाऱ्या निवडणुकीसाठी आमदार शिरीष चौधरी यांचे पुत्र व युवा नेते धनंजय चौधरी यांच्या नावाला पक्षातील जेष्ठ नेत्यांनी सहमती दर्शवली आहे. मात्र काँग्रेसचे पदाधिकारी व रावेरचे माजी नगराध्यक्ष दारा मोहम्मद यांनी काँग्रेसकडे उमेदवारीची मागणी केल्याने काँग्रेसमध्ये उमेदवारीसाठी चुरस निर्माण होण्याची शक्यता आहे. हि जागा राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार पक्षाला सोडण्याची मागणी या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे. सध्या कॉंग्रेसच्या ताब्यात असलेला हा मतदार संघ पुन्हा आपल्याच ताब्यात ठेवण्यात कॉंग्रेसला शर्थीचे प्रयत्न करावे लागणार असून भाजपला हा मतदार संघ स्वताकडे खेचून आणण्यासाठी उमेदवारीच्या नाराजीवरून निर्माण होणारा पक्षांतर्गत विरोध शांत करावा लागणार आहे.

२००९ मध्ये शिरीष चौधरी हे अपक्ष म्हणून विजयी झाले होते त्यावेळी त्यांनी भाजपच्या उमेदवार शोभा पाटील यांचा पराभव केला होता.  यावेळी भाजपचे विद्यमान आमदार अरुण पाटील यांची उमेदवारी कापून भाजपने शोभा पाटील यांना उमेदवारी दिली होती. २०१४ मध्ये झालेल्या निवडणुकीत भाजपचे उमेदवार हरिभाऊ जावळे विजयी होत कॉंग्रेसचे प्रतिस्पर्धी उमेदवार शिरीष चौधरी यांचा पराभव केला होता. आमदार शिरीष चौधरी हे २०१९ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपचे उमेदवार हरिभाऊ जावळे यांचा पराभव करीत निवडून आले होते. तर तिसऱ्या क्रमांकाची मते अपक्ष उमेदवार व भुसावळचे माजी नगराध्यक्ष अनिल चौधरी यांनी घेतली होती. यावेळी अनिल चौधरी उमेदवार म्हणून रिंगणात उतरणार आहेत. सध्या या मतदार संघाचे प्रतिनिधी म्हणून आमदार शिरीष चौधरी आहेत. मात्र येत्या निवडणुकीत आमदार चौधरी स्वतः उभे न राहता मुलगा धनंजय याला उमेदवारी मिळवून देत त्याला निवडून आणण्यासाठी ते सर्वतोपारी प्रयत्न करतील.

आमदार चौधरींचा राजकारणातून बाहेर पडण्याचा निर्णय

प्रकृती अस्वास्थामुळे यापुढील निवडणूक लढणार नसल्याचा निर्णय आमदार शिरीष चौधरी यांनी त्यांच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमात जाहीर केला आहे. त्याचवेळी त्यांनी पुत्र धनंजय याला मतदारांसमोर राजकीय वारसदार म्हणून प्रमोट केले आहे. आतापर्यंत आपण माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिलात यापुढे आपला आशीर्वाद कायम धनंजयवर ठेवावा अशी भावनिक साद यावेळी त्यांनी मतदारांना घातली होती. मात्र शैक्षणिक, सांस्कृतिक व सामाजिक कार्यात आपण कार्य करीत राहणार असल्याचे श्री चौधरी यांनी यावेळी सांगितले होते.

भाजपमध्ये अर्धा डझन उमेदवार इच्छुक

येणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी भाजपमध्ये इच्छुकांच्या नावाची यादी दिवसेंदिवस वाढत आहे. माजी खासदार व आमदार स्व. हरिभाऊ जावळे यांचे पुत्र तथा भाजपचे जिल्हाध्यक्ष अमोल जावळे, भाजपच्या महिला प्रदेश उपाध्यक्षा डॉ केतकी पाटील, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष रंजना पाटील, फैजपुरचे माजी नगराध्यक्ष पांडुरंग सराफ, आश्रय फौंडेशनचे अध्यक्ष डॉ कुंदन फेगडे, माजी जि प सदस्य भरत महाजन हे भाजपकडून उछुक आहेत. या सर्वानीच मतदार संघात मतदारांच्या भेटीगाठी घेण्यावर भर दिला आहे. मात्र यापैकी पक्ष कोणाला उमेदवारी देतो यावर बरेच काही अवलंबून आहे. काही इच्छुक उमेदवारांकडून आतापासूनच पक्षाचे चिन्ह व मतदार संघाचे नाव वापरून प्रचाराला सुरुवात केली आहे. हे करत असताना पक्षाच्या जिल्हाध्यक्षांना प्रचार पत्रकावरून डावलण्यात आले आहे. मात्र अमोल जावळे यांनी या मतदार संघात मंत्री गिरीश महाजन यांच्या माध्यमातून विविध विकासकामे मंजूर करून आणली आहेत. त्याचा फायदा त्यांना होऊ शकतो. तसेच अमोल जावळे यांचा तळागाळातील कार्यकर्ते व मतदारांशी असलेला थेट संबंध त्यांना उमेदवारी मिळाल्यास कामी येऊ शकतो. स्व हरिभाऊ जावळे यांची सहानुभूती व पुण्याई अमोल जावळे यांच्या कितपत कामी येते हे त्यांना उमेदवारी मिळाल्यास दिसून येईल. 

धनंजय चौधरीची संवाद यात्रा

स्व मधुकरराव चौधरी यांच्या स्मृतीदिनाच्या कार्यक्रमात उपस्थित असलेल्या कॉंग्रेसचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी मात्री बाळासाहेब थोरात यांनी या जेष्ठ नेत्यांनी धनंजय चौधरींनी या मतदार संघाचे नेतृव करावे असे वक्तव्य केले होते. त्यामुळे आगामी उमेदवार म्हणून कॉंग्रेसतर्फे धनंजय चौधरींच्या नावाची भावी उमेदवार म्हणून चर्चा आहे. याच अनुषंगाने धनंजय चौधरींनी मतदार संघात कृतज्ञता संवाद यात्रा काढत मतदारांच्या भेटीगाठी घेत जनसंपर्क वाढविण्यावर भर दिला आहे. रावेर मतदार संघातील जनतेच्या समस्या प्रश्न, समजून घेण्याचा यामाध्यमातून त्यांनी प्रयत्न केला आहे. याचा किती लाभ धनंजय चौधरींना मिळतो हे निवडणुकीनंतरच दिसून येईल. 

पक्षश्रेष्ठीची भूमिका काय?

स्व मधुकरराव चौधरी यांच्या स्मृतीदिनाच्या कार्यक्रमाला निमंत्रित असलेले कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले व विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार हे पक्ष संघटनेचे दोन्ही प्रमुख पदाधिकारी उपस्थित नव्हते. मध्यंतरी झालेल्या विधानपरिषदेच्या निवडणुकीत कॉंग्रेसची मते फुटल्याची चर्चा होती. यावेळी आमदार शिरीष चौधरींच्या नावाची प्रसार माध्यमातून चर्चा झाली. त्यावेळी आमदार चौधरींना पत्रकार परिषद घेऊन याबाबत खुलासा द्यावा लागला होता. त्यामुळे पक्षात सारे काही आलबेल आहे असे म्हणता येणार नाही. दरम्यान, रावेरचे माजी नगराध्यक्ष दारा मोहम्मद यांनी आमदार शिरीष चौधरी यांच्याविरुद्ध उघडपणे भूमिका घेतली आहे. त्यांनी कॉंग्रेसकडे उमेदवारीची मागणी केली आहे.दारा मोहम्मद यांच्या पाठीशी कोण आहेत हे त्यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेवेळी जनतेसमोर आले आहे. याशिवाय आणखी कोण इच्छुक आहेत हे निवडणूक जाहीर झाल्यावर दिसून येईल. 

राष्ट्रवादीकडून जागेची मागणी

रावेरची जागा राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटाला सोडावी अशी मागणी या पक्षाच्या यावल व रावेर येथे झालेल्या बैठकीत करण्यात आली आहे. या पक्षातर्फे माजी आमदार अरुण पाटील यांच्यासह आणखी एकदोन जण इच्छुक असल्याची माहिती पक्षाचे जिल्हाध्यक्ष प्रमोद पाटील यांनी दिली. अरुण पाटील यांच्याकडे गेल्या १५ वर्षात कोणतेही संविधानिक पद नसताना त्यांनी मतदार संघातील कायम ठेवलेला संपर्क हि त्यांची जमेची बाजू आहे.   

अनिल चौधरींचा प्रभाव कितपत?

गेल्या निवडणुकीवेळी भुसावळचे माजी नगराध्यक्ष अनिल चौधरी यांनी अपक्ष उमेदवारी करीत दिलेली टक्कर दखल घेण्यासारखी आहे. त्यांना ४५ हजार मते मिळाली होती.  मात्र गेल्या पाच वर्षात अनिल चौधरी यांचा मतदार संघातील जनतेशी फारसा संपर्क राहिला नाही. त्यांचा प्रभाव काही अंशी ओसरल्याने याचा परिणाम या निवडणुकीत त्यांना मिळणाऱ्या मतांवर होण्याची शक्यता नाकारता येत नाही. मात्र सध्या ते कुटुंबातील सदस्यासह मतदारांच्या भेटी घेत संपर्क मोहीम राबवीत आहेत. याचा त्यांना कितपत निवडणुकीत लाभ होईल हे निवडणूक निकालातून दिसणार आहे. 

कोण मारेल बाजी ?

विधानसभेची होणारी निवडणूक कॉंग्रेस, भाजप याच प्रमुख पक्षांच्या उमेदवारात होणार असली अनिल चौधरी हे देखील उमेदवार असून ते नक्कीच यावेळी अधिक ताकद लावण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटाने उमेदवार दिल्यास मतांची विभागणी होईल. होणाऱ्या विधानसभा निवडणुकीवर लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार श्रीराम पाटील यांच्या झालेल्या पराभवाचा काही अंशी परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे कोण बाजी मारेल हे येणाऱ्या काळात दिसून येईल.