रावेर तालुक्यात विज पडून पाच जण जखमी : मजूर कुटुंबावर नैसर्गिक आपत्तीची कुऱ्हाड

पुढील उपचारासाठी बऱ्हाणपूरला रवाना

रावेर तालुक्यात विज पडून पाच जण जखमी : मजूर कुटुंबावर नैसर्गिक आपत्तीची कुऱ्हाड

प्रतिनिधी/ रावेर

रावेर तालुक्यातील दोधे शेती शिवारात तात्पुरत्या स्वरुपात वास्तव्यास असलेल्या मजूर कुटुंबांच्या झोपडीवर मंगळवारी सकाळी सात वाजता विज पडल्याने पाच जण जखमी झाले आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. स्थानिक नागरिकांनी त्वरीत घटनास्थळी धाव घेत जखमींना रावेरच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. प्राथमिक उपचारानंतर जखमींची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी मध्य प्रदेशातील बुरहानपुर येथील शासकीय रुग्णालयात हलवण्यात आले आहे.

 मूळचे मध्य प्रदेशातील झिरण्या येथील रहिवासी असलेले मजूर दोधे शिवारात मजुरीसाठी आले होते.  मजुरीसाठी आलेले मीराबाई प्रताप जमरे (वय 30), पूजा प्रताप जमरे (वय 13), रेखाबाई खरते (वय 30), कालू खरते (वय 30) आणि ज्योती चंद्रसिंग रावत (वय 32) हे पाच जण वीज पडल्याने जखमी झाले आहेत.  मंगळवारी सकाळी सातच्या सुमारास अचानक विज पडल्याने हे सर्वजण गंभीर जखमी झाले. या दुर्घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अचानक घडलेल्या या घटनेमुळे संपूर्ण गाव हादरले आहे. स्थानिक प्रशासनाने या घटनेची दखल घेतली असून, नागरिकांना सावधगिरी बाळगण्याचे आवाहन करण्यात आले आहे. उमाई फौंडेशनचे अध्यक्ष व सामजिक कार्यकर्ते दिपक पाटील यांनी वीज पडलेल्या जखमीना रुणालयात दाखल केले.