केळी निर्यातीसाठी जैन इरिगेशनचा पुढाकार : जळगावात अपेडाची केळी उत्पादक आणि निर्यादारांसमवेत बैठक
जळगाव बनाना क्लस्टरचे प्रयत्न करु : अभिषेक देव
प्रतिनिधी/जळगाव
देशात केळी उत्पादनात अग्रेसर असलेल्या जळगाव जिल्ह्यातून केळीच्या निर्यातीसाठी जैन इरिगेशनने पुढाकार घेतला आहे. केळीच्या परदेशात निर्यातीसाठी जैन इरिगेशनने अपेडा, केळी उत्पादक शेतकरी व निर्यातदार यांची जैन हिल्सवर संयुक्त बैठक घेतली. यावेळी जळगाव जिल्हा बनाना क्लस्टर निर्मितीसाठी केंद्र सरकारकडे प्रयत्न करू असे आश्वासन अपेडाचे अध्यक्ष अभिषेक देव यांनी दिले. यावेळी श्री देव यांनी निर्यातदार व केळी उत्पादक शेतकऱ्यांशी संवाद साधला.
जळगाव जिल्हा हा प्रमुख केळी उत्पादकांपैकी एक असून या परिसरात बडवाणी, बऱ्हाणपूर, नंदुरबार, धुळे, सुरत, नर्मदानगर आदी जिल्ह्यातील केळी उत्पादकांवर आधारित अर्थव्यवस्था मोठी आहे. यातून ग्रामीण भागात मोठा रोजगार निर्माण होतो; त्यादृष्टीने देशातील प्रमुख बनाना क्लस्टर पैकी जळगाव जिल्ह्यातही बनाना क्लस्टर असावे, यासाठी विशेष अहवाल तयार करुन स्वत: केंद्र सरकारकडे पाठपुरावा करू’ असे आश्वासन अपेडाचे अध्यक्ष अभिषेक देव यांनी दिले.
केळी गुणवत्ता आणि उत्पादनात भारत देश अग्रस्थानी आहे. जागतिक स्तरावर भारताचा निर्यात वाटा एक टक्क्यांपेक्षा कमी आहे. प्रमुख निर्यातदार देशांमध्ये आपण १८ व्या क्रमांकावर आहोत. आपल्यापेक्षा लहान देश निर्यातीत पुढे आहेत. गत वर्षाची भारताची केळी निर्यात २९०.९ मिलीयन डॉलर्स होती. केळीची निर्यात एक बिलीयनच्यावर कशी होईल, याबाबतची महत्त्वपूर्ण चर्चा जैन हिल्स येथे अपेडा केळी उत्पादक व निर्यातदार यांच्यासमवेत बैठकीत झाली. यासाठी पायाभूत सुविधांसह फ्रुटकेअर मॅनेजमेंटसाठी शेतकऱ्यांचे प्रशिक्षण, पॅक हाऊस, कोल्ड स्टोअरेज, शेतातून पॅकहाऊस पर्यंत सुरक्षीत, जलद व कमी किंमतीत वाहतूक सुविधा निर्माण करण्याविषयी चर्चा झाली. अॅग्रीकल्चर प्रोसेस फूड प्रोडक्ट्स एक्सपोर्ट डेव्हलपमेंट अॅथोरिटी (अपेडा) व जैन इरिगेशन सिस्टीम्स लि. तर्फे कस्तुरबा सभागृह येथे आयोजित ‘बनाना ग्रोवर्स अॅण्ड एक्सपोटर्स मीट २०२४-२५’ मध्ये प्रमुख अतिथी म्हणून अभिषेक देव बोलत होते. याप्रसंगी व्यासपीठावर जैन इरिगेशनचे उपाध्यक्ष अनिल जैन, सहव्यवस्थापकीय संचालक अजित जैन, अपेडाचे व्यवस्थापक विनिता सुधांशू, महाराष्ट्र अपेडाचे प्रशांत वाघमारे, केळी उत्पादक संघाचे वसंत महाजन, अमोल जावळे, केळी निर्यातदारांपैकी आशिष अग्रवाल, किरण ढोके, केळी तज्ज्ञ डॉ. के. बी. पाटील व्यासपीठावर उपस्थित होते. दीपप्रज्वलननाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. केळी उत्पादक असोसिएशनतर्फे डि.के. महाजन, वसंतराव महाजन, सचिन पाटील, ललित पाटील, संजीव देशमुख, संतोष लाचेरा, प्रेमानंद महाजन, दिगेंद्रसिंग भरुच यांच्याहस्ते केळीचे झाड असलेली ट्रॉफी, शाल, सूतीहार देवून अभिषेक देव यांचा सत्कार करण्यात आला.
निर्यातक्षम उत्पादन घ्यावे : अभिषेक देव
अभिषेक देव बोलताना पुढे म्हणाले की, केळी उत्पादनाचे जैन तंत्रज्ञान उपयुक्त ठरू पहात आहे. फ्रुट केअर मॅनेजमेंट, क्लिनींग, उत्पादन क्षमता वाढविणे, आंतरराष्ट्रीय मानांकानप्रमाणे निर्यातक्षम केळी उत्पादनासाठी शेतकऱ्यांनी प्रयत्न करावेत. जैन इरिगेशन ही केळी उत्पादकांसह फळ-भाजीपाला निर्यात करू पाहणाऱ्यांसाठी महत्त्वपूर्ण अॅसेट आहे. अचूक तंत्रज्ञानाच्या वापरातून निर्यातक्षम उत्पादन घेतले पाहिजे. इराण, इराकसह आखाती देशांसह रशिया, युरोप व अन्य देशात केळी निर्यातीला मोठी संधी आहे. त्यासाठी ब्रॅंडीग महत्त्वाचे आहे.’
केळी निर्यातीसाठी स्वतंत्र मिशन हवे : अनिल जैन
जैन इरिगेशनने अल्पभुधारक शेतकरी आर्थिक सक्षम व्हावा यासाठी केळीवर संशोधन करुन १९९४ ला टिश्यूकल्चर तंत्रज्ञान उपलब्ध करुन दिले. जोडीला ठिबक सिंचन, फर्टिगेशन, प्रिसीजन फार्मिंग, क्रॉपकेअर यात काम केले आहे. यामुळे निर्यातक्षम केळी उत्पादन होऊ लागली. शेतकऱ्यांमध्ये समृद्धी आणि अधिकच्या उत्पादनामुळे सुबत्ता आली. तीस वर्षातील हा बदल जैन इरिगेशनचे संस्थापक स्व भवरलाल जैन यांच्या दूरदृष्टीने झाला आहे. केळी हे आरोग्य, रोजगार, विदेशी चलन मिळविण्याचे महत्त्वाचे साधन आहे. त्यासाठी गुणवत्तापूर्ण रोपांची व निर्यातक्षम वाणाची उपलब्ध हा महत्त्वाचा भाग आहे सोबत मूल्यवर्धन साखळीतील प्रत्येकाची सकारात्मक दृष्टी निर्यात वाढीसाठी महत्त्वपूर्ण ठरते. केळी निर्यात वाढविण्यासाठी केळीसाठी स्वतंत्र केळी मिशन कार्यक्रम आखण्यात यावा असे जैन इरिगेशनचे व्यवस्थापकीय संचालक अनिल जैन यांनी मत व्यक्त केले.
निर्यातीसाठी जैन इरीगेशनचे सहकार्य हवे : विनिता सुधांशू
जैन इरिगेशन सारख्या संस्था उच्च तंत्रज्ञानातुन शेतकऱ्यांच्या पाठीशी भक्कमपणे कार्य करत आहे. अपेडाचे कार्य विस्तारीत असून ७०० च्यावर उत्पादनांमध्ये निर्यातीसंबंधित कार्य सुरू असते. निर्यातीचा वाटा वाढविण्यासाठी शेतकरी, निर्यातदार आणि जैन इरिगेशनचे सहकार्य अपेक्षित आहे अशी अपेक्षा विनिता सुधांशू यांनी व्यक्त केली.
शेतकरी व निर्यातदारांशी मुक्त संवाद
केंद्र सरकारने निर्यात वाढीसाठी धोरणात्मक दृष्टीने काय केले पाहिजे, त्यासाठी प्रश्नोत्तर स्वरुपात मुक्त संवाद शेतकरी व निर्यातदारांशी अभिषेक देव यांच्यासह अपेडाच्या अधिकाऱ्यांनी केला. अपेडाच्यावतीने प्रशांत वाघमारे, प्रिन्स त्रिपाठी एन एचबी, एश्वर्य गुप्ता उपस्थित होते. बऱ्हाणपूर, बडवाणी, नंदुरबार, जळगाव मधील आशिष अग्रवाल, राजेंद्र पाटील, भागवत पाटील, प्रशांत महाजन, विशाल अग्रवाल, विशाल महाजन, भागवत महाजन, उमेश महाजन, बि. ओ. पाटील, अनिल पाटील यांच्यासह ३०० केळी उत्पादक शेतकरी उपस्थित होते. तर अमीर करीमी, प्रशांत धारपुरे, युवराज शिंदे, महेश ढोके, शफी शेख, रविंद्र जाधव, अनिल परदेशी, प्रमोद निर्मळ, डॉ. अझहर पठाण यांचेसह २० निर्यातदार उपस्थीत होते. प्रास्ताविक व सूत्रसंचालन जेष्ठ केळी तज्ञ व जैन इरिगेशनचे उपाध्यक्ष डॉ. के. बी. पाटील यांनी केले.