चार वर्षात रावेर पंचायत समितीची इज्जत व इभ्रत चव्हाट्यावर : ६० वर्षाच्या काळात सर्वात वादग्रस्त ठरल्या बिडीओ

जनतेशी सुसंवादाचा अभाव : शौचालय घोटाळा गाजला राज्यभर

चार वर्षात रावेर पंचायत समितीची इज्जत व इभ्रत चव्हाट्यावर : ६० वर्षाच्या काळात सर्वात वादग्रस्त ठरल्या बिडीओ

प्रतिनिधी / रावेर 

लोकशाहीच्या आधार स्तंभापैकी प्रशासन हा एक महत्वाचा स्तंभ आहे. राज्यकर्ते आणि सामान्य जनता यांच्यातील समन्वयचा दुवा म्हणून प्रशासनातील अधिकाऱ्यांकडे पहिले जाते. मात्र मग्रूर, अहंकारी, आणि अधिकाराचा दुरुपयोग करणारे काही महाभाग अधिकारी प्रशासनात कार्यरत असतात. कायद्याच्या चौकटीत राहून जनतेची कामे करणारे अधिकारी जनतेच्या प्रशंसेला पात्र ठरतात. जनता, लोकप्रतिनिधी व राजकीय पदाधिकारी यांना विश्वासात घेवून संबधित अधिकाऱ्याणे जनतेची कामे केली पाहिजेत अशी जनतेकडून साधारणपणे अपेक्षा असते. मात्र या सर्वाना बाजूला सारत काम केल्यास त्याचे परिणाम संबधित अधिकाऱ्याला भोगावे लागतात. गेल्या चार वर्षापासून रावेर पंचायत समितीचा कारभार पाहणाऱ्या बिडीओ दीपाली कोतवाल यांची रावेर येथून नुकतीच नांदगाव जि नाशिक येथे बदली झाली आहे. मात्र रावेर पंचायत समितीतील त्यांची चार वर्षांची कारकीर्द कायम वादग्रस्त ठरली. अर्थात यामागे त्यांच्यामधील असलेला अधिकारी पदाचा अहंकार व मग्रुरी हि कारणे नागरिकांच्या चर्चेत दिसून येत आहेत.   

रावेर पंचायत समितीची स्थापना १९६२ ला झाली आहे. पंचायत समितीच्या स्थापनेपासून तर आतापर्यंत या पंचायत समितीला एकूण  सुमारे ९६ बिडीओ लाभले आहेत. लाभलेल्या बिडीओंची सर्वांचीच कामाची पद्धत वेगवेगळी राहिली आहे. अपवादात्मक स्थितीत काही बिडीओंचे जनता व पंचायत समितीच्या पदाधिकाऱ्यांशी तात्विक वादही झाल्याची उदाहरणे घडली होती. मात्र संबधित अधिकाऱ्यांमधील समयसूचकता व सुसंवाद यामुळे वाद टोकापर्यंत गेले नाहीत. गेल्या चार वर्षांच्या काळात बिडीओ दिपाली कोतवाल यांच्या कारकिर्दीत घडलेल्या गैरव्यवहारामुळे रावेर पंचायत समितीची इज्जत व इभ्रत जेवढी चव्हाट्यावर आली ती कोणत्याच बिडिओच्या काळात आली नाही. केवळ बिडीओ दीपाली कोतवाल यांच्या कार्यशैलीमुळे सतत चार वर्षे रावेर पंचायत समिती या ना कारणामुळे चर्चेत राहिली. पुढील महिन्यात होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीपूर्वी प्रशासनाने त्यांची रावेर येथून नांदगाव जि नाशिक येथे बिडीओ म्हणून बदली केली आहे. एखाद्या विभागाचा अधिकारी जनतेशी समन्वय राखून काम करीत असेल तर त्याला येणाऱ्या अडचणीचे प्रमाण नगण्य असते. मात्र अधिकाराचा व पदाचा अहंकार निर्माण झाला कि त्या अधिकाऱ्याला काम करताना कशा प्रकारे अडचणीचा सामना करावा लागतो.

स्थानिक स्वराज्य संस्थेत काम करताना समन्वय व सुसंवाद महत्वाचा ठरतो. बिडीओ दिपाली कोतवाल यांच्या कार्यकाळात सुमारे दीड कोटींचा वैयक्तिक शौचालय घोटाळा प्रसार माध्यमांनी बाहेर काढला. हा घोटाळा पूर्ण महाराष्ट्रभर गाजल्याने पंचायत समिती चर्चेत राहिली. या घोटाळ्यात १०६ आरोपींविरुद्ध गुन्हे दाखल असून अधिकारी व लाभार्थ्यासह ३६ जणांना तुरुंगवास भोगावा लागला आहे. याशिवाय जिल्हा परिषदेचे तत्कालीन उपाध्यक्ष नंदकिशोर महाजन यांचा जनहिताच्या कामावरून बिडीओंशी झालेला वाद जळगाव जिल्ह्याने पहिला आहे. कामे करतांना पंचायत समितीच्या पदाधिकाऱ्यांना बिडीओ विश्वासात घेत नसल्याने तत्कालीन सभापती कविता कोळी यांनी थेट आयुकांकडे त्यांची तक्रार याच काळात केली होती. कर्मचाऱ्यांचे बोगस अपंग प्रमाणपत्र प्रकरण प्रसार माध्यमांनी गाजवले. बनावट अपंग प्रमाणपत्र धारक कर्मचाऱ्याला पुरस्कारासाठी बिडीओंनी जिल्हा परिषदेकडे प्रस्ताव पाठवला होता. मात्र वरिष्ठांच्या हि बाब लक्षात येताच हा पुरस्कार रद्द करण्याची नामुष्की यांच्याच काळात ओढवली. पंचायत समितीच्या शेष फंडातही गैरव्यवहार झाल्याचा संशय निळे निशाण सामाजिक संघटनेला आल्याने त्यांनी पंचायत समितीत तीव्र आंदोलन केले. ब्युटीपार्लर योजनेचा लाभ खऱ्या लाभार्थी महिलांपर्यंत पोहचलाच नाही. जिल्हा परिषदेच्या वाघोड येथील शाळेचे काम उत्कृष्ट असतांना या शाळेला डावलून स्वताच्या शिक्षक असलेल्या पतीच्या शाळेला पुरस्कार मिळवून दिला. सतत चार वर्षे रावेर पंचायत समिती कायम वादाच्या भोवऱ्यात व चर्चेत राहिली. मात्र याच काळात समस्या घेवून येणाऱ्या नागरिकांना न्याय मिळू शकला नाही. बिडीओ कोतवाल यांची सामान्य नागरिकांशी बोलण्याची पद्धत अरेरावीची व भाषा मग्रुरीची होती. त्यांच्या कार्यकाळात ठराविक व्यक्तीचा पंचायत समितीत अधिक वावर होता. पंचायत समितीवर प्रशासक म्हणून काम करतांना अनेक ठिकाणी बिडीओंच्या सहकार्याने गैरव्यवहार झाल्याचा संशय नागरिकांना आहे. याची प्रकरणे यथावकाश बाहेर येतील यात शंका नाही. अहंकार हा माणसाला नुकसानदायक असतो, वादग्रस्त काळात बिडीओंना झालेला मानसिक त्रास व झालेले नुकसान ते वेगळेच . ते भरून निघणे शक्य नाही.   

सारांश :

कोणत्याही पदावरील अधिकाऱ्याने अधिकारी म्हणून काम करतांना सामान्य जनता दैवत समजून काम करावे. काम घेवून येणाऱ्या व्यक्तीशी सुसंवाद, समन्वयाची भूमिका ठेवल्यास येणाऱ्या अडचणी आपोआपच कमी होतात. जनतेची, राजकीय पदाधिकाऱ्यांची मते जाणून घेतल्यास हाती घेतलेल्या कामांना गती मिळते. पदाचा अहंकार,गर्व, मग्रूरी जास्त काळ टिकत नाही.