रावेर तालुक्याला वादळी पावसाचा तडाखा : शेकडो हेक्टरवरील केळी बागांचे नुकसान : आमदार अमोल जावळे यांच्या पंचनाम्याच्या सूचना
शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत द्यावी
प्रतिनिधी/रावेर
रावेर तालुक्यात आज संध्याकाळी सव्वा सातच्या सुमारास विजांच्या कडकडाटासह जोरदार वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसाने तडाखा दिला आहे. कापणीला आलेल्या शेकडो हेक्टरवरील केळी बागांचे या पावसामुळे अतोनात नुकसान झाले आहे. केळी बागांच्या नुकसानीचा आकडा कोटींच्या घरात असून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासनाने तातडीने आर्थिक मदत द्यावी.
कालपासून रावेर तालुक्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली. तर आज अक्षरशः वादळी पावसाने तालुक्याला जोरदार तडाखा दिला आहे. जोरदार वादळी वाऱ्यामुळे कापणीला आलेल्या केळी बागा मोडून पडल्याने मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेले आहे. हातातोंडांशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतला असून शेतकऱ्यांसमोर यामुळे मोठे संकट निर्माण झाले आहे. सुमारे पाऊन तास विजांच्या कडकडाटासह पावसाचा तडाखा सुरु होता. पावसामुळे वीज पुरवठा खंडीत झाला आहे.नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासनाने तातडीने आर्थिक मदत द्यावी अशी मागणी करण्यात आली आहे. उटखेडा, कुसुम्बा, भाटखेडा, निंभोरा, गहुखेडा, रणगाव,तासखेडा या पट्ट्यात तसेच कोचूर, आटवडा, नेहेता, दोधे व अनेक गावातील शेती शिवरातील केळीला या वादळाचा फटका बसला आहे. आता अंधार असल्याने नेमके किती नुकसान झाले आहे याची माहिती उद्या मिळण्याची शक्यता आहे.
उद्यापासून पंचनामे : आमदार जावळे
वादळी पावसाने केळी बागांच्या झालेल्या नुकसानीचे उद्यापासून तातडीने पंचनामे करण्याच्या सूचना आमदार अमोल जावळे यांनी प्रशासनाला दिल्या आहेत. पंचनाम्याचा अहवाल शासनाला प्राप्त झाल्यावर नुकसानग्रस्त केळी उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करण्यात येणार असल्याची माहिती आमदार अमोल जावळे यांनी दिली.

krushisewak 
