स्पेशल रिपोर्ट : हळद लागवडीमुळे सोनेरी गावाच्या दिशेने उटखेड्याची वाटचाल : जळगाव जिल्ह्यात सर्वाधिक ४०० एकरवर हळद पिकाची लागवड : आठ महिन्यात हळद विक्रीतून साडेबारा कोटींचे उत्पन्न
हळदीला लोणच्यासाठी गुजरात, राजस्थानमधून मागणी

कृष्णा पाटील/ रावेर
जळगाव जिल्ह्यात सर्वाधिक हळद लागवड करणारे गाव
जळगाव जिल्ह्यात हळद लागवडीचे प्रयोग इतर तालुक्यात केले जातात. मात्र रावेर तालुक्यातील या पिकाखालील क्षेत्रात दरवर्षी वाढ होत आहे. यंदाच्या खरीप हंगामात रावेर तालुक्यातील सुमारे ४,००० एकरवर हळद पिकाची लागवड करण्यात आली आहे. त्यापैकी एकट्या उटखेडा गावातील शेतकऱ्यांनी ४०० ते ५०० एकरवर हळद लागवड केली आहे. त्यामुळे जळगाव जिल्ह्यात सर्वाधिक हळद पिकाची लागवड व उत्पन्न घेणारे उटखेडा हे एकमेव गाव ठरले आहे.
आठ महिन्यात साडेबारा कोटींचे उत्पन्न
सुमारे १०० ते १२५ शेतकऱ्यांनी हळद लागवड करीत उत्पादन घेतले. एकरी सरासरी १५० क्विंटल कच्च्या हळदीचे उत्पादन झाले. केवळ आठ महिन्यात या गावातील शेतकऱ्यांना ६० हजार क्विंटल हळद उत्पादन मिळाले आहे. गुजरात व राजस्थानच्या व्यापाऱ्यांकडून लोणच्यासाठी (आचार) येथील कच्ची हळद खरेदी करण्यात आली असून सरासरी २५०० प्रती क्विंटल भाव मिळाल्याने आठ महिन्यात सुमारे साडेबारा ते पंधरा कोटीचे उत्पन्न शेतकऱ्यांना मिळाले आहे.
"सोनेरी" गावाच्या दिशेने वाटचाल
हळदीचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन होत असतांना गावाला लागून काही व्यावसायिक हळदीवर बॉईल करून मशीनद्वारे प्रक्रिया करीत आहेत. हळदीची चाळणीने छाननी होत असल्याने यावेळी बारीक हळदीचे कण हवेत उडून तरंगत आहेत. यामुळे या परिसरात उन्हामुळे सोनेरी वातावरण निर्माण होत आहे. नैसर्गिकरीत्या व अधिक उत्पादनामुळे आर्थिकदृष्ट्या उटखेड्याची वाटचाल "सोनेरी" गावाच्कया दिशेने सुरु आहे असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.
रावेर तालुक्यात ८२ गावात हळद लागवड
रावेर तालुक्यातील रावेर, मुंजलवाडी, उटखेडा, भाटखेडा, खिरोदा प्र रावेर, कुसुंबा, अभोडा बुद्रुक, जिन्सी, लोहारा, चिंचाटी, वाघोदा बुद्रुक, चिनावल, खिरोदा प्र यावल, कळमोदा, कुंभारखेडा, सावखेडा बुद्रुक, सावखेडा खुर्द, रोझोदा, बोरखेडा सीम, कोचुर बुद्रुक, कोचुर खुर्द, अभोडा खुर्द, केऱ्हाळा बुद्रुक, केऱ्हाळा खुर्द, मंगरूळ, पिंप्री, जुनोने, पाडले बुद्रुक, मोरगाव बुद्रुक, मोरगाव खुर्द, बोरखेडा, तामसवाडी, मोहगण, अटवाडे, दोधे, नेहेता, वाघोड, कर्जोद, ऐनपूर, निंबोल, रेंभोटा, कोळदा, सुलवाडी, वाघाडी, विटवे, नांदूरखेडा, सांगवे, थेरोळा, खिर्डी बुद्रुक, खिर्डी खुर्द, गोलवाडे, भामलवाडी, तांदलवाडी, पुरी, सिंगत, मांगलवाडी, सुनोदा, गाते, वाघोदा खुर्द, बलवाडी, निंभोरा बुद्रुक, मस्कावद बुद्रुक, मस्कावद खुर्द, मस्कावद सीम, दसनूर, सिंगनूर, आंदलवाडी, विवरे खुर्द, विवरे बुद्रुक, वडगाव, थोरगव्हाण व सावदा या ८२ गावात हळद पिकाची यंदा लागवड करण्यात आली आहे.
"केळी हे मुख्य पिक असले तरी वारंवार येणाऱ्या नैसर्गिक आपत्तीमुळे होणारे नुकसान भरून निघत नाही. हळद हे केळीला उत्तम पर्यायी पिक ठरू शकते. हळद पिकातून उत्पन्नाची खात्री निर्माण झाल्याने दरवर्षी गावातील शेतकरी या पिकाची लागवड करीत आहेत."
----भूषण प्रल्हाद पाटील, युवा शेतकरी उटखेडा ता रावेर मो 7972840662