रोखठोक : राजकारणी म्हणतायेत आम्ही सारेच शेतकऱ्यांचे कैवारी पण नुकसानीच्या आर्थिक मदतीसाठी लढा कोण देणार ?
शेतकऱ्यांबद्दल खरंच सहानुभूती की निवडणुकीपूर्वीचा स्टंट
कृष्णा पाटील / रावेर
रावेर व मुक्ताईनगर तालुक्यात चार दिवसापूर्वी झालेल्या वादळामुळे कापणीला आलेल्या केळी बागा जमीनदोस्त झाल्या आहेत. केळी उत्पादक शेतकऱ्यांचे न भरून निघणारे नुकसान गेल्या आठवड्यात दोन दिवसात झाले आहे. लोकप्रतिनिधींसह सर्वच राजकीय पक्षाच्या राजकारण्यांनी नुकसानीची तात्काळ दखल घेत नुकसानग्रस्त केळी बागांची पाहणी केली. यावेळी शेतकऱ्यांना या राजकारण्यांनी धीर देण्याचा प्रयत्न केला. राजकीय पदाधिकारी व लोकप्रतिनिधींचे याबाबत कौतुक केले पाहिजे. मात्र जसा काळ पुढे जाईल तसे शेतकऱ्यांना धीर देणारे किती राजकीय पदाधिकारी नुकसानीची भरपाई मिळवून देण्यासाठी प्रयत्न करतील हे येणाऱ्या काही दिवसातच तमाम शेतकरी बांधवाना दिसेल. नुकसानीची पाहणी करतांना दिलासा देत शासनाकडून आर्थिक मदत मिळवून देण्याचे दिलेले आश्वासन किती पदाधिकारी पाळतात. यासाठी शासन दरबारी कोण लढा देणार याचे दर्शनही येणाऱ्या काळात जनतेला नक्कीच होणार आहे.
आम्हीच शेतकऱ्यांचे कैवारी
जळगाव जिल्ह्यात झालेल्या वादळी वाऱ्याने शेतकऱ्यांचे कोट्यावधी रुपयांचे नुकसान झाले आहे. या वादळाचा जोरदार तडाखा रावेर, यावल व मुक्ताईनगर तालुक्याला बसला आहे. नुकसानीची पाहणी करण्यासाठी लोकप्रतिनिधी व विविध राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी थेट नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावर पोहचून पाहणी करीत त्यांना धीर देण्याचा प्रयत्न केला. यावेळी प्रसार माध्यम व सोशल मीडियातून प्रसिद्धी मिळवण्यासाठी फोटोसेशन करून घेतले होते. नुकसानीची पाहणी करणाऱ्या व शासन दरबारी नुकसानीची आर्थिक मदत मिळवून देण्याचे आश्वासन देणाऱ्या लोकप्रतिनिधीमध्ये खासदार रक्षा खडसे, रावेरचे आमदार शिरीष चौधरी, मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटातर्फे निवडणूक लढलेले श्रीराम पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे, प्रहार जनशक्ती पक्षाचे पदाधिकारी अनिल चौधरी, भाजपचे जिल्हाध्यक्ष अमोल जावळे, भाजपचे पदाधिकारी डॉ कुंदन फेगडे यांचा समावेश होता. या साऱ्याच राजकारण्यांनी नुकसानग्रस्त गावांच्या शेतशिवाराचा परिसर पालथा घातला. शेतकऱ्यांशी चर्चा करीत नुकसान भरपाई मिळाली पाहिजे असेही सांगितले. मात्र हि आर्थिक मदत कोण मिळवून देणार हा प्रश्न मात्र अनुत्तरित आहे. आम्ही सारेच शेतकऱ्यांचे कैवारी अशा अविर्भावात शेताच्या बांधावर पोहचलेल्या राजकीय पदाधिकाऱ्यांनी स्वतःचे वजन वापरून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत मिळवीन द्यावी .
एकत्रित लढ्याची गरज
नुकसानीची पाहणी विविध राजकीय पक्षाच्या लोकप्रतिनिधींसह पदाधिकाऱ्यांनी केली आहे. आपसातील मतभेद बाजूला सारून शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीपोटी या पदाधिकाऱ्यांनी आर्थिक मदत मिळवून द्यावी अशी रास्त अपेक्षा शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री म्हणून अनिल पाटील हे जळगाव जिल्ह्यातील रहिवासी आहेत. त्यांच्याकडे याबाबत राजकीय पदाधिकाऱ्यांनी पाठपुरावा केल्यास नक्कीच यातून मार्ग निघेल. ऐन खरीप हंगामाच्या तोंडावर लागणारा खर्च मिळणाऱ्या या मदतीतून भागवत येईल. मात्र जर राजकीय पदाधिकाऱ्यांनी याच्याकडे दुर्लक्ष केल्यास हा येणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी शेतकऱ्यांची सहानुभूती मिळवण्यासाठी केलेला राजकीय स्टंट होता असा संकेत गेल्याशिवाय राहणार नाही.