INSIDE STORY : बियाण्यांच्या होलसेल डिलरकडून कृषी केंद्र चालकांची आर्थिक कोंडी : मागणीएवढा पुरवठा न करणाऱ्या कंपन्यांचे बियाणे विक्री न करण्याचा ऍग्रो डीलर असोसिएशनचा निर्णय

लिंकींगची सक्ती शेतकऱ्यांच्या जीवावर

INSIDE STORY : बियाण्यांच्या होलसेल डिलरकडून कृषी केंद्र चालकांची आर्थिक कोंडी : मागणीएवढा पुरवठा न करणाऱ्या कंपन्यांचे बियाणे विक्री न करण्याचा ऍग्रो डीलर असोसिएशनचा निर्णय

प्रतिनिधी  / रावेर 

जळगाव जिल्ह्यात बियाण्यांचा बिनबोभाटपणे काळाबाजार सुरु असून विशिष्ट्य कंपन्यांची जादा दराने बियाणे विक्री होत असल्याची शेतकऱ्यांची ओरड आहे. तर बियाण्यांचा अत्यल्प पुरवठा करून कृत्रिम टंचाई निर्माण करणाऱ्या कंपन्यांची बियाणे विक्री न करण्याचा निर्णय जळगाव जिल्ह्यातील रावेरसह यावल, मुक्ताईनगर व भडगाव येथील ऍग्रो डीलर असोसिशनने घेतला आहे. दरम्यान, बियाण्यांची कृषी विक्रेत्यांकडून जादा दराने विक्री का केली जाते ? यामागील कारण शोधण्याचा कृषीसेवक टीमने प्रयत्न केला असता धक्कादायक माहिती समोर आली आहे. बियाण्यांचे काही होलसेल डीलर बियाण्यांच्या पाकिटावर असलेल्या एमआरपी किंमतीच्या दराने रिटेल कृषी केंद्र चालकांना विक्री करतात. या बियाण्याच्या पाकिटावर नफा मिळणे तर दूरच आहे. वाहतूक खर्च स्वतःच्या खिशातून करावा लागतो हि वस्तुस्थिती आहे. अशा प्रकारे होलसेल डिलरकडून रिटेल कृषी विक्रेत्यांची आर्थिक कोंडी केली जात असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. कृषी विभागाने याची उच्चस्तरावरून चौकशी केल्यास सत्यता समोर येईल. 

खरीप हंगामाला येत्या काही दिवसात सुरुवात होणार आहे. शेतकऱ्यांची पेरणीपूर्व तयारीच्या दृष्टीने लगबग सुरु आहे. बियाणे मिळवण्यासाठी शेतकऱ्यांची दमछाक होत आहे. मात्र मागणी असलेल्या कापसाची बियाणे बाजारात उपलब्ध होताना दिसत नाही. अनेक कंपन्यांनी बियाण्यांचा मागणीनुसार पुरवठा केलेला नसल्याने हि कृत्रिम टंचाई निर्माण झाल्याचे समजते. 

होलसेल डिलरकडून कृषी विक्रेत्यांची कोंडी 

बियाणे पुरवठादार कंपन्या या त्यांच्या अधिकृत होलसेल डिलरला बियाण्यांचा पुरवठा करतात. तर होलसेल डीलर हे कंपनीकडून पुरवठा झालेले बियाणे रिटेल कृषी विक्री केंद्रांना पुरवठा करतात. व शेतकरी स्थानिक ठिकाणी असलेल्या कृषी केंद्रावरून बियाण्यांची खरेदी करतात. हि कृषी निविष्ठा विक्रीची साखळी आहे. होलसेल विक्रेत्याला नफा ठेवूनच कंपनी बियाण्यांचा पुरवठा करते. होलसेल डीलरने वाजवी नफा घेऊन रिटेल विक्रेत्यला एमआरपी पेक्षा कमी दराने बियाण्यांचा पुरवठा केला पाहिजे. मात्र बियाण्यांच्या पाकिटावर असलेल्या एमआरपी किमतीत काही होलसेल डीलर रिटेल विक्रेत्याला बियाणे विक्री करीत आहे. त्यामुळे स्थानिक पातळीवर बियाणे विक्री करणाऱ्या विक्रेत्याला नफा मिळत नाही. उलट बियाणे वाहतुकीचा खर्च स्वतः करावा लागत असल्याची स्थिती आहे. बियाण्यांचा खरा काळाबाजार येथे घडत असून कृषी विभागाच्या रडारवर मात्र किरकोळ कृषी विक्रेते आहेत. कृषी विभागाने याची दखल घेऊन चौकशी करून कारवाई करावी अशी मागणी होत आहे. 

होलसेलरकडून पळवाटा

होलसेल डीलरकडून एमआरपी किमतीत रिटेल विक्रेत्याला बियाण्यांची विक्री करण्यात येत आहे. मात्र एमआरपी पेक्षा कमी किमतीत बियाण्याची विक्री केली असे दर्शविण्यासाठी होलसेल डिलरकडून एमआरपी पेक्षा कमी दराने चेक अथवा ऑनलाईन पेमेंट घेतले जाते व उर्वरित फरकाची रक्कम रोख स्वरूपात घेतली जाते अशी माहिती एका कृषी विक्रेत्याने नाव न छापण्याच्या अटीवर दिली आहे.कंपनीतर्फे होलसेल डिलरला झालेला पुरवठा, त्याने विक्री केलेला साठा, गोदामात शिल्लक असलेला साठा याची तपासणी केल्यास सत्यता समोर येईल व जाणवणारी  बियाण्याची टंचाई काही अंशी दूर होईल. 

लिंकिंगमुळे शेतकरी त्रस्त 

दरम्यान शेतकऱ्यांकडून मागणी असलेली काही ठरविक कंपन्यांची बियाणे विक्री करताना होलसेल डिलरकडून काही मागणी नसलेल्या बियाण्याची रिटेलरला सक्तीने लिंकिंग केली जात आहे. त्यामुळे कृषी विक्री केंद्र चालक हि बियाणे नाईलाजाने लिंकिंग पद्धतीने शेतकऱ्यांच्या माथी मारत आहेत. याची चौकशी होणे गरजेचे आहे.