आमदार शिरीष चौधरींनी केली नुकसानीची पाहणी : पंचनामे करण्याच्या प्रशासनाला सूचना
शेतकऱ्यांना दिला धीर
प्रतिनिधी / रावेर
रावेर तालुक्यात शनिवारी संध्याकाळी झालेल्या प्रचंड वेगाच्या वादळी वाऱ्यामुळे केळी बागांचे मोठया प्रमाणात नुकसान झाले आहे. कापणीला आलेल्या बागा जमीनदोस्त झाल्याने शेतकऱ्यांवर अस्मानी संकट कोसळले आहे. नुकसानग्रस्त केळी बागांची पाहणी आमदार शिरीष चौधरी यांनी केली असून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासनाकडून आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन यावेळी श्री चौधरी यांनी दिले.
तालुक्यातील दोधे, नेहेते, अटवाडा, अजनाड,खिरोदा,सावखेडा, या गावांच्या शेत शिवाराला वादळी वाऱ्याने झोडपले.यात अनेक शेतकरी बांधवांच्या केळी बागा भुईसपाट झाल्या आहेत. यामुळे शेतकरी बांधवांवर संकट उभे राहिले आहे. दोधे ,नेहेते, अटवाडा, या परिसरातील नुकसानाची आमदार शिरीष चौधरी यांनी पाहणी केली व नुकसानग्रस्तांना धीर देऊन तहसीलदार यांच्या सोबत भ्रमणध्वनीद्वारे संपर्क साधुन नुकसानीचे पंचनामे करून तात्काळ मदत देण्यासंबंधी चर्चा केली.सोबत कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक डॉ राजेंद्र पाटील,जयेश कुयटे माजी पंचायत समिती सदस्य योगेश पाटील, सुनील पाटील, राहुल महाजन, सरपंच गोपाळ महाजन, कांतीलाल पाटील, विलास पाटील, गोकुळ महाजन, रुपेश महाजन, भगवान धनगर, हितेश पाटील यांच्यासह शेतकरी उपस्थित होते