BREAKING : निंभोरा येथील 15 व्या वित्त आयोगातील निकृष्ट कामाबाबत तक्रार : 60 ते 65 लाखांच्या गैरव्यावहाराचा संशय

ग्रामपंचायत सदस्यांची बिडीओंकडे तक्रार

BREAKING : निंभोरा येथील 15 व्या वित्त आयोगातील निकृष्ट कामाबाबत तक्रार : 60 ते 65 लाखांच्या गैरव्यावहाराचा संशय

प्रतिनिधी/रावेर

रावेर तालुक्यातील रसलपूर येथील ग्रामपंचायतीत 15 व्या वित्त आयोगात आर्थिक गैरव्यवहाराचे प्रकरण गाजत असतानाच निंभोरा येथील 15 व्या वित्त आयोगातून निकृष्ट दर्जाची कामे झाल्याची तक्रार खुद्द या ग्रामपंचायतीच्या तीन सदस्यांनी आज पंचायत समितीचे बिडीओ यांच्याकडे केली आहे. 60 ते 65 लाख रुपये खर्चून ही कामे करण्यात आली असून यात मोठा आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. या कामांची बिले अदा करण्यात येऊ नये अशी मागणी ग्रामपंचायत सदस्य मनोहर तायडे, रेखा कोलंबे, मंदाकिनी बऱ्हाटे यांनी गट विकास अधिकाऱ्यांकडे आज केली आहे. दरम्यान, उद्या ग्रामपंचायतीची मासिक सभा असून आर्थिक संशयित गैरव्यवहाराच्या विषयावरून ही सभा गाजण्याची अधिक शक्यता आहे.

15 वा वित्त आयोगातून यापूर्वी 18 ते 21 लाख रुपये स्वच्छ भारत मिशनच्या कामावर खर्च करण्यात आलेले आहे. तसेच ग्रामपंचायत सदस्यांना विश्वासात न घेता सरपंच व ग्राम अधिकारी यांनी गावातील वार्ड क्रमांक 1 ते 6 मध्ये पेव्हार ब्लॉक बसवणे, गटार बांधकाम, व कॉक्रिटीकारण करणे यासारखी कामे केलेली आहेत. मात्र ही कामे अतिशय निकृष्ट दर्जाची झालेली असून याची चौकशी करण्यात यावी. तसेच चौकशी पूर्ण होईपर्यंत संबंधित ठेकेदाराचे बिल अदा करण्यात येऊ नये अशी मागणी या सदस्यांनी केली आहे.

आर्थिक गैरव्यहाराचा संशय

निंभोरा ग्रामपंचायतीला 15 वा वित्त आयोगातून गावातील विकास कामे करण्यासाठी मोठा निधी शासनाकडून प्राप्त झालेला आहे. मात्र हा निधी निकृष्ट विकासकामे करून खर्ची टाकून त्याचा गैरव्यवहार होत असल्याचा संशय आहे. निंभोरा ग्रामपंचायत सदस्यांचा पुढील महिन्यात कार्यकाळ संपत असल्याने कामे घाईघाईत उरकून निधी खर्ची टाकण्यासाठी ग्रामपंचायतीचे प्रयत्न सुरु आहेत. तसेच यापूर्वी झालेल्या बाजार ओटे बांधकाम, पाईप लाईन, सार्वजनिक शौचालय बांधकाम कायम वादात असून याचीही चौकशी केल्यास सत्य समोर येईल. या कामातही मोठ्या प्रमाणावर आर्थिक गैरव्यवहार झाला आहे. 

"सरपंच व ग्राम अधिकारी यांनी सदस्यांना विश्वासात न घेता 15 व्या वित्त आयोगातून घाईघाईत कामे करून आर्थिक गैरव्यवहार केला जात आहे. केलेल्या कामांची बिल संबंधित ठेकेदाराला अदा करू नये, तसेच या कामांची चौकशी करण्याची मागणी बिडीओंकडे करण्यात आली आहे."

----  मनोहर तायडे, ग्रा. प. सदस्य निंभोरा