आमदार अमोल जावळे यांच्या प्रयत्नाला यश: रावेर आगाराला मिळाल्या पाच नवीन बस
उद्या सकाळी साडे नऊ वाजता लोकार्पण

प्रतिनिधी/ रावेर
रावेर आगारातील बसची कमतरता लक्षात घेवून आमदार अमोल जावळे यांनी रावेर आगारासाठी 10 बसची मागणी केली होती. शासनाकडे पाठपुरावा केल्याने 5 बस रावेर आगाराला उपलब्ध झाल्या उद्या दि 5 रोजी सकाळी साडे नऊ वाजता या बसचे भाजपचे पदाधिकारी व आगाराच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत लोकार्पण करण्यात येणार आहे.
रावेर आगारातून राज्यात लांब पल्ल्याची बस सेवा असून बसची संख्या कमी असल्याने त्याचा परिणाम प्रवाशी सेवेवर होत होता. आमदार अमोल जावळे यांनी तीन महिन्यापूर्वी बस स्थानक व आगाराला सरप्राईज व्हिजिट देत प्रवाशांच्या समस्या जाणून घेतल्या होत्या. तसेच प्रवाशांना अधिक चांगली प्रवाशी सेवा पुरविण्याबाबत अधिकाऱ्यांशी चर्चा केली होती. त्यावेळी प्रवाशी संख्या अधिक असून बस संख्या कमी असल्याने किमान दहा बस मिळाव्यात अशी मागणी आमदार जावळे यांच्याकडे करण्यात आली होती. याची दखल घेत आमदार जावळे यांनी शासनाकडे दहा बसची मागणी व पाठपुरावा केला. त्यांच्या प्रयत्नांना यश आले असून पाच नवीन बस रावेर आगाराला प्राप्त झाल्या आहेत. या बसचा लोकार्पण सोहळा उद्या सकाळी साडे नऊ वाजता भाजप पदाधिकाऱ्यांच्या हस्ते व आगाराच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत करण्यात येणार आहे.
आणखी पाच बस लवकरच मिळणार
मागणी असलेल्या दहा बस पैकी आज पाच बस उपलब्ध झाल्या असून उर्वरित पाच बस पुढील पंधरा दिवसात आगाराला प्राप्त होणार आहे. तसेच चालक वाहकांची कमतरता लक्षात घेवून अवशकतेनुसार चालक व वाहक उपलब्ध करून दिले जाणार असल्याची माहिती आमदार अमोल जावळे यांनी दिली