रावेरबाजार समितीत सभापती पदाची कोणाला मिळणार संधी ? महाविकास आघाडीच्या पॅनल प्रमुखांच्या बैठकीत ठरणार धोरण

रावेरबाजार समितीत सभापती पदाची कोणाला मिळणार संधी ?

रावेरबाजार समितीत सभापती पदाची कोणाला मिळणार संधी ?   महाविकास आघाडीच्या पॅनल प्रमुखांच्या बैठकीत ठरणार धोरण

प्रतिनिधी / रावेर 

येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती व उप सभापती पदासाठी १७ मे रोजी निवडणूक होत आहे. या दोन्ही पदांवर कोणाची वर्णी लागते याकडे तालुकावासीयांचे लक्ष लागले आहे. या पदासाठी नावे निश्चित करण्यासाठी महाविकास आघाडीच्या पॅनल प्रमुखांची रविवारी बैठक होत आहे. 

बाजार समितीच्या गेल्या तीन पंचवार्षीक निवडणुकीची सर्व पक्षीय पॅनलची परंपरा या निवडणुकीद्वारे मोडीत काढण्यात आली आहे. संचालक मंडळाच्या एकूण १८ जागांपैकी १३ जागा महाविकास आघाडीला, तीन जागा भाजप शिंदे गटाला तर दोन जागा अपक्षांना मिळाल्या आहेत. महाविकास आघाडीला स्पष्ट बहुमत असल्याने सभापती व उप सभापती हि दोन्ही पदे महाविकास आघाडीकडे राहतील यात शंका नाही. मात्र या पदांवर नेमकी कोणाची वर्णी लागणार याची उत्सुकता वाढली आहे. 

आज पॅनल प्रमुखांची बैठक 

महाविकास आघाडीचे पॅनल प्रमुख आमदार शिरीष चौधरी, माजी आमदार अरुण पाटील व शिवसेना(ठाकरे गट) जिल्हा उप प्रमुख योगीराज पाटील, जिल्हा बँकेचे माजी उपाध्यक्ष राजीव पाटील यांची संयुक्त बैठक आज (रविवारी) होत आहे. या बैठकीत सभापती व उप सभापती पदासाठी नाव निश्चित करण्यासह कोणत्या पक्षाला किती कालावधी याचे धोरणही ठरविले जाण्याची शक्यता आहे. तर सोमवारी महाविकास आघाडीचे पॅनल प्रमुख व आघाडीचे नवनिर्वाचित संचालकांची बैठक होण्याची शक्यता आहे. या बैठकीत सभापती व उप सभापती पदासाठी नाव निश्चित होण्याची अधिक शक्यता आहे. आगामी काळात होऊ घातलेल्या जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका, लोकसभा व विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून आमदार शिरीष चौधरी व माजी आमदार अरुण पाटील तसेच शिवसेना ठाकरे गट यांची महाविकास आघाडी एक संघ राहून निर्णय घेतली अशी अपेक्षा आहे. 

भाजप वेट अँड वॉचच्या भूमिकेत

भाजपला केवळ तीन जागा मिळल्या असून बहुमताचा आकडा गाठण्यासाठी १० हे संख्याबळ आवश्यक आहे. अपक्ष ५ जरी धरले तरी हि संख्या ५ पर्यंत जाऊ शकते. त्यामुळे भाजपने कितीही प्रयत्न केले तरी १० संख्याबळाचा आकडा त्यांना गाठता येणे मुश्किल आहे.