ब्रेकिंग : रसलपुरच्या महिलेचा प्रसूतीनंतर मृत्यू : रावेरच्या ग्रामीण रुग्णालयात वैद्यकिय अधिकारी व नातेवाईकांमध्ये शाब्दिक बाचाबाची
जिल्हा परिषद आरोग्य विभागाचे दुर्लक्ष
कृषीसेवक न्यूज नेटवर्क / रावेर
रसलपुर येथील एका गर्भवती महिलेचा प्रसूतीनंतर अवघ्या दोन तासात मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी रात्री घडली आहे. हनीफा संजय तडवी वय ३८ असे मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. दरम्यान बुधवारी सकाळी मयत महिलेचा मृतदेह शव विच्छेदनासाठी जळगाव येथे पाठविण्याचा निर्णय येथील ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकिय अधिकाऱ्यांनी घेतल्यानंतर मयताचे नातेवाईक व वैद्यकिय अधिकाऱ्यांमध्ये यावरून शाब्दिक बाचाबाची झाली. त्यामुळे रुग्णालयात काही काळ गोंधळ निर्माण झाला. मात्र वरिष्ठांशी बोलणी झाल्यावर येथेच शवविच्छेदन करण्यात येईल असे सांगितल्यावर नातेवाईक शांत झाले. मात्र जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाचे अधिकारी व कर्मचारी या घटनेपासून अनभिज्ञ आहेत.
रसलपुर येथील गर्भवती हनिफा तडवी ही मंगळवारी रात्री दहा वाजता घरी नॉर्मल प्रसूती झाली. मात्र प्रसूतीनंतर त्रास होऊ लागल्याने तिला येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी तिला तपासणी केल्यावर मयत घोषित केले. व सकाळी शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात येईल असे सांगितले. मात्र सकाळी वैद्यकिय अधिकाऱ्यांनी मृतदेह शव विच्छेदनसाठी जळगाव येथे पाठविण्याचा निर्णय घेतला. याला मयत महिलेच्या नातेवाईकांनी तीव्र विरोध केला. त्यामुळे वैद्यकिय अधिकारी व नातेवाईक यांच्यामधे शाब्दिक बाचाबाची झाली. यामुळे काही काळ गोंधळ निर्माण झाला. पोलीस उप निरीक्षक सचिन नवले उप निरीक्षक दिपाली पाटील व कर्मचाऱ्यांनी ग्रामीण रुग्णालयात जाऊन मयताच्या नातेवाईकांची समजूत काढली. तर वैद्यकिय अधिकाऱ्यांनी याची माहिती वरिष्ठांना दिल्यावर शव विच्छेदन रावेर येथेच करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यांनतर नातेवाईकांचा रोष शांत झाला.
आरोग्य विभाग अनभिज्ञ
ग्रामीण भागात आरोग्य सेवा जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातर्फे पुरवली जाते. रसलपुर येथे प्राथमिक आरोग्य उपकेंद्र आहे. मात्र येथील कर्मचारी गावात घडलेल्या एवढ्या मोठ्या घटनेपासून अनभिज्ञ होते. मयताच्या नातेवाईक व ग्रामस्थांनी आरोग्य उप केंद्रातून सेवा पुरवली जात नसल्याची तक्रार यावेळी केली.