स्व. भवरलाल जैन जयंती विशेष : शेतकऱ्यांमध्ये हायटेक शेतीचा आत्मविश्वास वाढविणारा कृषि महोत्सव : जिल्हा कृषी अधीक्षक रविशंकर चलवदे यांचे शेतकऱ्यांना कृषी महोत्सवाला भेट देण्याचे आवाहन

शेतकऱ्यांना तंत्रज्ञानाची दारे केली खुली

स्व. भवरलाल जैन जयंती विशेष : शेतकऱ्यांमध्ये हायटेक शेतीचा आत्मविश्वास वाढविणारा कृषि महोत्सव : जिल्हा कृषी अधीक्षक रविशंकर चलवदे यांचे शेतकऱ्यांना कृषी महोत्सवाला भेट देण्याचे आवाहन
हळद व अद्रक पिकांची माहिती घेताना रविशंकर चलवदे, श्री. साळवे

कृषीसेवक न्यूज नेटवर्क/जळगाव

शेतीचे तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहचावायचे असेल पिकांमध्ये केल्या जाणाऱ्या विविध प्रयोगामध्ये शेतकऱ्यांना सामावून घेतले पाहिजे. हाच प्रयोग जैन इरिगेशनतर्फे सुरु आहे. जैन हिल्सवर १० डिसेंबर पासून सुरु असलेला कृषी महोत्सव हा खऱ्या अर्थाने हायटेक शेतीचा शेतकऱ्यांमध्ये आत्मविश्वास वाढविणारा आहे. येथे आधुनिक तंत्रज्ञानाने केली जाणारी शेती प्रत्यक्ष बघायला मिळत असल्याने जळगावसह संपूर्ण महाराष्ट्रातीलच नव्हे तर देशातील शेतकऱ्यांनी कृषि महोत्सवात सहभाग घ्यावा व शेतीतील तंत्रज्ञान अवगत करावे असे आवाहन जळगावचे जिल्हा कृषी अधीक्षक रविशंकर चलवदे यांनी केले आहे.

जैन उद्योग संघूहाचे संस्थापक श्रद्धेय स्व. भवरलाल जैन यांच्या जयंतीनिमित्त शेतकऱ्यांना शेतीचे आधुनिक तंत्रज्ञान जैन इरिगेशनने खुले केले आहे. जैन हिल्सवर सुरु असलेल्या  हायटेक शेतीचा नवा हुंकार या कृषि महोत्सवात शेतकऱ्यांसोबत रविशंकर चलवदे यांनीही प्रत्यक्ष पाहणी केली. हा महोत्सव १० जानेवारी २०२४ पर्यंत सुरू राहणार असून तो सर्व शेतकऱ्यांसाठी विनामूल्य खुला आहे. तंत्रज्ञानातून पिकपद्धतीमध्ये बदल करून शेतकऱ्यांच्या जीवनात सकारात्मक बदल कसे करता येतील हे श्री चलवदे यांनी अनुभवले. त्यांच्यासोबत आत्माचे उपसंचालक श्री. साळवे, जैन इरिगेशनचे कृषितज्ज्ञ संजय सोनजे, डॉ. विकास  बोरोले यांच्यासह कृषीतज्ज्ञ उपस्थित होते.

जैन इरिगेशन सिस्टीम्स लि.तर्फे शेतकऱ्यांसाठी सुरू असलेल्या कृषी महोत्सवाची प्रत्यक्ष फिल्ड पाहणीसाठी ते आले होते. पाहणी केल्यानंतर शेतकऱ्यांसोबतच चर्चा करताना इतर शेतकऱ्यांनीही या महोत्सवात सहभाग घ्यावा यासाठी त्यांनी आवाहन केले. ‘एकाच ठिकाणी वेगवेगळ्या पिकांची लागवड जैन हिल्स कृषि महोत्सवात दिसून आली. यात केळी हे आपल्या भागातील प्रमूख पिक आहे. आर्थिक चलनवलन यापिकातून मोठ्याप्रमाणात होत असते. त्यात सात ते आठ प्रकारची केळी लागवड, ठिबक व बेडवर लागवड, आठ महिन्यात आलेले पिक, ३० फूट उंचीचे केळीचे पिक अशी एकाच ठिकाणी विविध केळी पिकांची लागवड बघायला मिळत असल्याचे ते म्हणाले. यातून शेतकऱ्यांना नवीन तंत्रज्ञान समजून घेता येत आहे. तंत्रज्ञानासोबतच कुठले पिक घ्यावे, कसे घ्यावे, कुठली व्हरायटी लावावी असे एकच ठिकाणी वेगवेगळी माहिती शेतकऱ्यांना उपलब्ध होत असल्याने त्यांच्या ज्ञानात भर पडत असल्याचे ते म्हणाले. शिवाय हळद, अद्रक, टॉमोटो व कांदा सारख्या पिकांमध्ये समृद्धी मार्ग आहे. ह्यासंबंधीत अनेक व्हरायटीची माहिती याठिकाणी मिळते. कांदा हे आपल्या भागातील प्रमूख पिक घेतले जाते त्यात प्रक्रियेसाठी वापरल्या जाणाऱ्या पांढरा, लाल कांद्यासह अन्य जातींचाही पिकांची प्रत्यक्ष पाहणी शेतकऱ्यांना करता येत आहे. पांढऱ्या कांद्याच्या करार शेतीतून हमी भावाने कांदा व टमोटो खरेदी करून शेतकऱ्यांना हक्काची बाजारपेठ उपलब्ध करून दिल जात आहे. असे अनेक प्रकारांसह फळबागांमध्ये डाळिंब, मोसंबी, जैन स्वीट ऑरेंज, आंबा, लिंबू, पपई यासह अन्य फळपिकांची लागवड पद्धतीमध्ये बदल केला आहे. अतिसघन लागवड पद्धतीतून शेतकऱ्यांना कमी जागेत, कमी पाण्यात, कमी खर्चात जास्त उत्पन्नाचा मार्ग मिळत आहे. सूक्ष्म सिंचनामध्ये ठिबक, तुषार सिंचनासह अन्य पद्धतींसह ज्यांच्याकडे ५० ते १०० किंवा त्यापेक्षा मोठ्या क्षेत्रामध्ये जैन ऑटोमेशन पद्धतीचा वापर करता येऊ शकतो. यातून सिंचनासह फर्टिगेशन यंत्रणाद्वारे खतांचे नियंत्रण ठेवता येते व मजूरीवरील अतिरीक्त खर्च कमी करता येतो. एकाच ठिकाणी हे सर्व तंत्रज्ञान बघायला मिळत आहे. 

" प्रदर्शन केवळ ग्राऊंडवर होतात. स्टॉल लावले जातात. मात्र जैन हिल्स कृषी महोत्सव हा खऱ्या अर्थाने हायटेक शेतीचा शेतकऱ्यांमध्ये आत्मविश्वास वाढवित आहे. प्रत्यक्ष शेती बघायला मिळत असल्याने शेतकऱ्यांनी कृषि महोत्सवात सहभाग घ्यावा."  

--- रविशंकर चलवदे जिल्हा कृषी अधीक्षक , जळगाव