हायटेक शेतीचा नवा हुंकार : जैन हिल्सवर आजपासून कृषि महोत्सवाचे आयोजन

शेतकऱ्यांसाठी जैन इरिगेशनच्या संशोधनाची दारे खुली

हायटेक शेतीचा नवा हुंकार :  जैन हिल्सवर आजपासून कृषि महोत्सवाचे आयोजन

प्रतिनिधी/जळगाव  

शेती संबंधित नाविन्यपूर्ण प्रयोग व संशोधन बघण्याची संधी जैन इरिगेशनचे संस्थापक भवरलाल जैन यांच्या जन्मदिनानिमित्त उपलब्ध होणार आहे. १० डिसेंबर २३ ते १५ जानेवारी २४ पर्यंत शेतकऱ्यांना जैन हिल्सवरील भव्य कृषी महोत्सवामध्ये हायटेक शेतीचा नवा मार्ग शोधता येईल. कृषीक्षेत्रातील जगात जे नव्याने तंत्रज्ञान विकसीत झाले आहे. ते शेतकऱ्यांपर्यंत पोहोचावे या उद्देशाने पिकांची प्रात्यक्षिके जैन हिल्सवरील कृषी संशोधन विकास प्रात्यक्षिक केंद्रावर उभी केली आहेत.

हायटेक शेतीचा नवा हुंकार असलेल्या जैन हिल्सवरील कृषी महोत्सवात गादीवाफ्यावर ठिबक संच बसवून एक डोळा पद्धतीने ऊसाची लागवड. क्रॉप कव्हरसह क्रॉपकुलिंग यंत्रणा तापमान वाढीवर नियंत्रणासाठी मिस्टर स्प्रिंकलर यंत्रणा, कापूस पिकात ठिबक मल्चिंग आणि गादीवाफाचा त्रिवेणी संगम, आंबा, चिकू, पेरू, सिताफळ, मोसंबी, संत्रा या फळझाडांची अतिसघन पद्धतीने गादीवाफ्यावर ठिबक संचावरती केलेली लागवड बघता येईल.. हवामान बदलांच्या संकटावरील उपाय म्हणून शेडनेट, पॉलिहाऊस, ग्रीन हाऊस यासारख्या बंदिस्त व नियंत्रित वातावरणात बागांची शेती किती गरजेची आहे हे अनुभवता येईल. जैन हिल्सवर शेडनेट व इनसेक्टरनेटमध्ये केळीआंबा, जैन स्वीट ऑरेंज, संत्रा यांची केलेली लागवड पाहायला मिळेल. 

अवकाळीपासून केळीचे संरक्षण…

अवकाळी पाऊस, गारपीट यापासून बचाव व्हावा म्हणून शेडनेटमध्ये ग्रैन्डनैन व्हरायटी केळीची लागवड, गादीवाफा, दोन ठिबकच्या नळ्या आणि मल्चिंग असलेल्या बिगर हंगामी या केळीला पावणे सहा महिन्यात सर्व झाडांना घड पडले. बागेचे फ्रूट केअर मॅनेजमेंट कशी करता येते हे अभ्यासता येईल. मोकळ्या शेतात ग्रॅन्डनैन बरोबरच नेंद्रन, पूवन, बंथल व रेड बनाना या जातींची लागवडही पाहता येईल.

कांद्याच्या १५ जाती पाहणीसाठी

ठिबक, गादीवाफा व मल्चिंगवर पांढऱ्या व लाल रंगाच्या कांद्याच्या १५ जाती, लसुणच्याही १० जाती, हळदीच्या १९ जातींसह पपईच्या पाच जातींची लागवड कृषी महोत्सवात अभ्यासता येईल. पपईमध्ये हळद व आले ही आंतरपीके घेता येईल हा विश्वास निर्माण होईल. पॉलिमल्च करून गादीवाफ्यावर आधार देऊन व आधार न देता अशा दोन्ही पद्धतीने टोमॅटो व मिरचीची शेती अभ्यासता येईल.

फ्युचर फार्मिगची हायटेक शेती 

जैन हायटेक प्लॉट फॅक्टरी टाकरखेडा येथे एरोपोनीक, हायड्रोपोनिक, भविष्यातील शेती फ्यूचर फार्मिंग, रोपवाटिका, दर्जेदार व रोगमुक्त रोपे कशी बनतात ते अभ्यासता येईल. परिश्रम समोर वेगवेगळ्या प्रकारचे ठिबक सिंचनाचे प्रात्यक्षिक व अद्यावत साधन सामुग्री व कृषी उपयुक्त अनेक गोष्टी पाहता येतील. मनात काही शंका, प्रश्न असतील तर कृषितज्ज्ञांशी सुसंवाद साधता येईल. कृषी महोत्सवात भेटीसाठी https://www.jains.com/farmers.meet/ या लिंकवर नोंदणी करता येईल.