सकारात्मक बातमी : आणि दुभंगलेला संसार पुन्हा फुलविण्यात रावेर लोकन्यायालयाला यश
पतिपत्नीने गुलाबपुष्प देवून केले परस्परांचे स्वागत
कृषीसेवक न्यूज नेटवर्क/रावेर
शहाण्या माणसाने कोर्टाची पायरी चढू नये अशी जुन्या काळात एक म्हण प्रचलित होती. मात्र या म्हणीला आज रावेरच्या लोकन्यायालयाने कालबाह्य ठरवीले आहे. गेल्या दोन वर्षांपासून दुभंगलेला पतीपत्नीचा संसार पुन्हा फुलविण्यात रावेरचे न्यायधीश व वकील मंडळींना यश मिळाले आहे. रावेर तालुक्यातील चिनावल येथील माहेर व बऱ्हाणपूर येथील सासर असलेल्या या विवाहितेचा संसार वकील मंडळींच्या समुपदेशनाने पुन्हा बहरणार आहे. सदर विवाहितेने पती व सासरच्या मंडळीविरूद्ध दाखल केलेला दावा काढून घेतला आहे. पतीपत्नीमध्ये समझोता झाला असून न्यायमूर्ती पी पी यादव यांच्या उपस्थितीत दोघांनी एकमेकांना गुलाबपुष्प देवून स्वागत केले. तर विवाहिता यावेळी माहेरी चिनावल येथे न जाता बऱ्हाणपूर येथे पतीसोबत सासरी गेली. दुभंगलेला संसार पुन्हा फुलविण्यात येथील वकील मंडळींना यश आल्याने समाजातून त्यांचे अभिनंदन होत आहे.
पतिपत्नीमधील नाते अतिशय संवेदनशील व तितकेच नाजूक असते. मात्र कोणत्या ना कोणत्या कारणाने या नात्यात वितुष्ट निर्माण झाल्यास संसार मोडून पडण्याचीच अधिक शक्यता असते. असाच काहीसा प्रकार चिनावल येथील माहेर व बऱ्हाणपूर येथील सासर असलेल्या विवाहितेच्या बाबतीत घडले होते. पती व सासरच्या मंडळींनी छळ केल्याच्या आरोपावरून या विवाहितेने जानेवारी २०२२ मध्ये येथील न्यायालयात सासरच्या मंडळींविरुध्द दावा दाखल केला होता. तेव्हापासून ती मुलासह विभक्त राहत होती. दोन वर्षापासून हा खटला रावेर न्यायालयात सुरू होता. मात्र आज ९ डिसेंबर रोजी असलेल्या लोकन्यायालयात हा खटला तडजोडीसाठी ठेवण्यात आला. यावेळी तालुका विधी सेवा समितीने या दोघांमध्ये समेट घडवून आणला. पती तर्फे ऍड योगेश गजरे यांनी तर पत्नीतर्फे एड दिपक एच गाढे यांनी काम पाहिले. गेल्या दोन वर्षापासून या दोघांचा दुभंगलेला संसार पुन्हा एकदा आता फुलणार आहे. यावेळी पतीपत्नीने न्यायधिश श्री यादव व विधी सेवा समितीच्या सदस्यांच्या उपस्थितीतए कमेकांना गुलाबपुष्प देऊन स्वागत केले. यावेळी दोन्ही कुटुंबातील सदस्य व या दाम्पत्याचा मुलगा यावेळी हजर होता.
११३ खटले निकाली
रावेर येथिल लोकन्यायालयात दिवाणी व फौजदारी एकूण ११३ खटले निकाली काढण्यात आले. तर दहा लाख रुपये वसुल झाले आहेत. येथील दिवाणी व फौजदारी न्यायालयात दि.९ डिसेंबर रोजी राष्ट्रीय लोक अदालतीअंतर्गत लोकन्यायालय रावेर न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश पी. पी. यादव यांचे अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आले होते. सदर लोकन्यायालयात दिवाणी स्वरूपाचे पस्तीस खटले व फौजदारी स्वरूपाचे एकेंशी खटले असे एकूण एकशे तेरा खटले आपसी तडजोडीने निकाली काढण्यात आले. तर विविध बँका, शासकीय संस्था, बीएसएनएल, ग्रामपंचायत व महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी इत्यादींच्या दाखल पूर्व खटल्यांमध्ये सहा लाख साठ हजार रुपये तर इतर दाखल खटल्यांमध्ये तीन लाख पंधरा हजार रुपये असे एकुण दहा लाख रुपये वसुल झाले. याप्रसंगी मुख्य न्यायाधीश पी. पी. यादव यांनी अध्यक्ष म्हणून कामकाज पाहिले तर रावेर वकिल संघाचे अध्यक्ष ॲड. शीतल जोशी, उपाध्यक्ष ऍड. बी. डी. निळे, सचिव ऍड. दिपक एच. गाढे, सहसचिव अड.किशोर पाटील, सरकारी वकिल श्रीकृष्ण दुट्टे, ऍड.टी.डी.पाटील, ऍड. व्हि. पी. महाजन , एड. आर. एन. चौधरी, एड.विपिन गडे, ऍड. योगेश गजरे, एड. सुभाष धूंदले, ऍड. जगदीश महाजन, ऍड. डी. डी. ठाकूर, ऍड. तुषार पी. चौधरी, ऍड. के. बी. खान, ऍड. आर. ए. पाटील, ऍड. मुजाहीद शेख, ऍड, अमोल कोंघें, ऍड. मोहन कोचुरे, ऍड. शिवदास कोचूरे, ऍड.संदेश पाटील, ऍड. दिपक तायडे यांच्यासह न्यायालयीन कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. तर पंच न्यायाधिश म्हणून ऍड. संदेश पाटील यांनी काम पाहिले.