प्रलंबीत फळ पिक विमाचा प्रश्न : तक्रार निवारण समिती गठीत करण्याचे आदेश
खासदार रक्षा खडसे यांच्या मागणीला यश
कृषीसेवक न्यूज नेटवर्क/मुक्ताईनगर
पुनर्रचित हवामानावर आधारित फळ पिक विमा योजना आंबिया बहार सन २०२२ मध्ये विमा उतरविलेल्या शेतकऱ्यांना अद्यापही पिक नुकसानीपोटी पिक विम्याचा लाभ प्रलंबित आहे. या बाबत असंख्य शेतकऱ्यांच्या तक्रारी आल्या होत्या. या तक्रारींचे तत्काळ निराकरण होणेसाठी "तक्रार निवारण समिती" गठीत करण्याची मागणी केंद्रीय कृषी मंत्रालयाकडे खासदार रक्षा खडसे यांनी केली होती. त्याची दाखल केंद्रीय कृषी मंत्रालयाने घेतली असून ही समिती गठीत करण्याचे आदेश केंद्रीय कृषी मंत्रालयाकडून राज्याच्या कृषी सचिवांना आदेश देण्यात आले आहेत.
शेतकऱ्यांच्या प्राप्त तक्रारी व प्रलंबीत फळ पीक विम्याच्या रक्कमेचा प्रश्न सोडविण्यासाठी तक्रार निवारण समिती गठीत करण्याची मागणी खासदार रक्षा खडसे यांनी केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्रसिंग तोमर, केंद्रीय कृषी राज्यमंत्री कैलास चौधरी व श्रीमती शोभा करंदलाजे यांची दिल्ली येथे भेट घेवून केली होती. तसेच केंद्रीय कृषी राज्यमंत्री कैलास चौधरी यांच्याकडे पत्रव्यवहार केला होता.
आज त्याबाबत कार्यवाही होऊन केंद्रीय कृषी मंत्रालयाकडून तक्रार निवारण समिती गठीत करणे बाबत आदेश देण्यात आले आहे. सदर समितीकडे विमा नाकारण्यात आलेल्या शेतकऱ्यांनी अर्ज करून संबंधित कागदपत्रे सादर केल्यावर, समितीतर्फे त्वरित समस्येचे निवारण करण्यात येणार आहे. जिल्हाधिकारी यांचे मार्फत “तक्रार निवारण समिती” गठन झाल्यावर संबधित शेतकऱ्यांनी तत्काळ संबधित ठिकाणी आपले अर्ज दाखल करावेत असे आवाहन खासदार श्रीमती रक्षाताई खडसे यांनी फळ पिक विमाच्या प्रलंबित लाभबाबत समस्या असलेल्या केळी उत्पादक शेतकऱ्यांना केले आहे.