रयत क्रांतीचा कावड मोर्चा ; दुधाला पाच रुपये प्रति लिटर अनुदानाची मागणी

पुणे प्रादेशिक दुग्ध व्यवसाय विकास कार्यालयावर शेतकरी धडकले

रयत क्रांतीचा कावड मोर्चा ; दुधाला पाच रुपये प्रति लिटर अनुदानाची मागणी

कृषीसेवक न्यूज नेटवर्क /पुणे 

दुधाचे दर कमी झाल्यामुळे सरकारने मध्यस्थी करून प्रति लिटर दुधाला पाच रुपये अनुदान द्यावे अशी मागणी रयत क्रांती संघटनेतर्फे करण्यात आली. यासाठी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष व माजी मंत्री सदाभाऊ खोत यांच्या नेतृत्वाखाली पुणे येथील दुग्ध व्यवसाय विकास कार्यालयावर शेतकऱ्यांचा कावड मोर्चा काढण्यात आला.  

संपूर्ण राज्यात दुधाचे दर जवळजवळ आठ ते दहा रुपयांनी कमी झाले असून सध्या प्रतिलीटर २६ ते २८ रुपये दर दूध उत्पादक शेतकऱ्याला मिळत आहे. त्यामुळे दूध ऊत्पादक शेतकऱ्यांचा दूध व्यवसाय तोट्यात आला आहे. खासगी व सहकारी दूध संघांच्या मक्तेदारीमुळे दुधाचे दर कमी झाले. सरकारने दूध दर प्रश्नी ताबडतोब मार्ग काढून संपूर्ण महाराष्ट्रातील दूध उत्पादक शेतकऱ्यांना न्याय द्यावा अशी मागणी यावेळी करण्यात आली. जूनमध्ये ३.८/८.५ फॅट व एसएनएफ प्रतीच्या दुधाला प्रतिलीटर ३४ रुपये हमीभाव देण्यासंबंधीचा शासन निर्णय झालेला आहे त्याची अंमलबजावणी करावी. सध्या पशुखाद्याचे दर गगनाला भिडलेले आहेत. तसेच भरडा, पशु औषधांच्या वाढलेल्या किमती व वैरणीच्या तुटवड्यामुळे दूध उत्पादक शेतकरी अडचणीत सापडला आहे. त्यामुळे लक्ष घालून येत्या १५ दिवसात दुधाला प्रतिलीटर ३४ रुपये हमीभाव द्यावा व प्रतीलिटर ५ रुपये अनुदान मिळाव अशी मागणी सदाभाऊ खोत यांनी कावड मोर्चाच्या माध्यमातून राज्य सरकारकडे केली आहे. यावेळी रयत क्रांती संघटनेचे राज्य कार्याध्यक्ष दिपक भोसले, प्रदेशाध्यक्ष सागर खोत, राज्य प्रवक्ते प्रा सुहास पाटील, सोलापुर जिल्हाध्यक्ष नामदेव पवार, सरचिटणीस हणुमंत गिरी, युवा जिल्हाध्यक्ष अमोल वेदपाठक, युवाध्यक्ष नंदु व्यवहारे, पक्ष  संपर्कप्रमुख राजकुमार सरडे, माजी जिल्हाध्यक्ष शशिकांत थोरात, जिल्हा उपाध्यक्ष बाळकृष्ण बोबडे, राहुल बिडवे, अजित घाडगे, पंढरपूर तालुकाध्यक्ष सुनिल पाटील, राहुल पवार, संतोष वारगड, रमेश भणगे, पुणे जिल्हाध्यक्ष सुर्यकांत काळभोर यांचेसह राज्यातील विविध पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच दूध उत्पादक शेतकरी मोठ्या प्रमाणात कावड मोर्चामध्ये उपस्थित होते.