मराठा समाजाचा वधूवर परिचय मेळावा दिशादर्शक : माजी आमदार अरुण पाटील
रेशीमबंध परिचय पुस्तिकेचे प्रकाशन
प्रतिनिधी/रावेर
आधुनिकतेच्या नावाखाली संस्कृती व संस्कार नवी पिढी विसरत चालली आहे. पतीपत्नीने परस्परांना समजून घेतल्यास वाद टाळता येतो. वधूवरांच्या पालकांनी विवाहाच्याबाबत अवास्तव अपेक्षा ठेवू नये. नातेसंबध जुळवणे आजच्या काळात कठीण झाले असून आयोजित केले जाणारे वधूवर परिचय मेळावे समाजासाठी दिशादर्शक आहेत असा विश्वास माजी आमदार अरुण पाटील यांनी व्यक्त केला. रावेर तालुका मराठा समाज वधूवर परिचय मेळाव्यात ते अध्यक्षस्थानावरून मार्गदर्शन करतांना बोलत होते.
रावेर तालुका मराठा समाज वधूवर परिचय व सामुहिक विवाह समितीतर्फे येथील श्रीमती शेनाबाई गोंडू पंडित मराठा समाज मंगल कार्यालयात वधूवर परिचय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलनाने झाली. यावेळी व्यासपीठावर डायटचे माजी प्राचार्य निळकंठ गायकवाड, बुलडाणा जिल्हा परिषदेचे शिक्षाधिकारी विकास पाटील रावेर तालुका मराठा समाज विकास मंडळाचे अध्यक्ष राहुल पंडित, माऊली फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ संदीप पाटील, योगराज कन्स्ट्रक्शनचे संचालक विनोद सोनवणे,पिपल्स बँकेचे चेअरमन दिलीप पाटील, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक गणेश महाजन, खानापूर विविध कार्यकारी सोसायटीचे माजी अध्यक्ष संजय महाजन व्यासपीठावर उपस्थित होते.
मार्गदर्शन करतांना श्री पाटील पुढे म्हणाले की, शिक्षणाच्या नावाखाली मुलामुलींचे वय ३५ ते ४० वर्षापर्यंत पर्यंत वाढले आहे. याला जबाबदार पालक आहेत. पालकांकडून मोठ्या प्रमाणावर होणाऱ्या वधूवरांच्या कुटुंबीयांकडून अपेक्षा ठेवल्या जातात. हे अपेक्षांचे ओझे कमी केले तरच विवाह जुळून येण्यास मदत होणार आहे. माजी प्राचार्य निळकंठ गायकवाड यांनी पतीपत्नीमध्ये तडजोड असेल तर संसार सुखाचा होतो. दोघांमधील मतभेद टाळले पाहिजे. मात्र किरकोळ कारणावरून उच्च शिक्षितांमध्ये होणाऱ्या घटस्फोटाबद्द्ल त्यांनी चिंता व्यक्त केली. यावेळी शिक्षणाधिकारी विकास पाटील यांनी विवाहामधील अनिष्ट प्रथा व वास्तवतेवर प्रकाशझोत टाकला. कार्यक्रमाचे प्रास्तविक समिती सदस्य कृष्णा पाटील यांनी केले. सूत्रसंचालन पी आर पाटील व शेखर पाटील यांनी केले. आभार प्रा व्ही व्ही पाटील यांनी मानले. कार्यक्रमास तालुक्यातील तसेच तालुकाबाहेरील मराठा समाज बांधव मोठ्या संखेने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी वधुवर परिचय समितीच्या सर्व सदस्यांनी परिश्रम घेतले.
रेशीमबंध पुस्तिकेचे प्रकाशन
वधूवर परिचय समितीतर्फे विवाहेच्छुक वधुवरांचा परिचय असलेल्या “रेशीमबंध” पुस्तिकेचे प्रकाशन यावेळी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. या पुस्तिकेत एकूण १९० परिचय पत्रांचा समावेश असून ११९ मुलांचे तर ७१ मुलींचे परिचय पत्र आहेत.

krushisewak 
