रावेर मतदार संघ : राजकीय विश्लेषण : खासदार खडसे स्वपक्षियांसह विरोधकांचा कसा करणार सामना ?

घराणेशाही विरूद्ध शेतकरी पुत्राची लढाई

रावेर मतदार संघ : राजकीय विश्लेषण : खासदार खडसे स्वपक्षियांसह विरोधकांचा कसा करणार सामना ?

कृष्णा पाटील 

रावेर लोकसभा मतदार संघाच्या निवडणुकीकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. या मतदार संघातून महायुतीने भाजपच्या उमेदवार म्हणून विद्यमान खासदार रक्षा खडसे यांना उमेदवारी दिली आहे. तर महाविकास आघाडीने राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) पक्षातर्फे उद्योजक श्रीराम पाटील या नवख्या उमेदवाराला संधी दिली आहे. प्रस्थपित विरुद्ध सामान्य कुटुंबातील उमेदवार अशी येथे लढत होणार आहे. दहा वर्षे लोकसभेचे प्रतिनिधित्व केलेल्या खासदार रक्षा खडसे यांच्यासमोर या काळात मतदार संघात केलेल्या विकास कामांची मतदारांना माहिती द्यावी लागणार आहे. त्याशिवाय त्यांच्यासमोर अनेक आव्हाने आहेत.  या आव्हानांचा सामनाही त्यांना निवडणुकीत प्रचारादरम्यान करावा लागणार आहे. 

रावेर लोकसभा मतदार संघाचे सध्या रक्षा खडसे या प्रतिनिधित्व करीत आहेत. २०१४ व २०१९ अशी दोन वेळा त्यांनी लोकसभेत प्रतिनिधित्व केलेले आहे. पक्षाने आता पुन्हा त्यांना तिसऱ्यांदा संधी दिली आहे. तर त्यांचे प्रतिस्पर्धी उमेदवार म्हणून राष्ट्रवादीतर्फे शेतकरी कुटुंबातील मात्र संघर्षातून उद्योजक झालेल्या श्रीराम पाटील यांना पक्षाने तुल्यबळ उमेदवार म्हणून निवडणुकीच्या मैदानात उतरवले आहे. 

खडसे यांची भूमिका सुनेच्या हिताची  

भाजपचे तत्कालीन जेष्ठ नेते व माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्या रक्षा खडसे या सून आहेत. २०१४ व २०१९ च्या निवडणुकीत एकनाथराव खडसे भाजपमध्ये होते. त्यामुळे रक्षा खडसे यांच्या विजयासाठी श्री खडसे यांनी मोठी ताकद उभी केली होती. बारा खात्यांचे मंत्री असलेल्या खडसेंवर गैरव्यवहाराचे आरोप झाल्यावर त्यांना मंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला होता. त्यानंतर त्यांनी भाजप सोडून राष्ट्र्वादीत प्रवेश केला. या पक्षाने त्यांना विधान परिषदेत संधी दिली. मात्र लोकसभेची उमेदवारी सून रक्षा खडसे यांनाच मिळावी यासाठी श्री खडसे यांनी रावेर लोकसभेची निवडणूक राष्ट्रवादीतर्फे लढण्याचे संकेत दिले. हा रक्षा खडसे यांनाच भाजपने उमेदवारी द्यावी यासाठी निर्माण केलेला दबाव होता असे राजकीय जाणकार खासगीत सांगतात. रक्षा खडसे यांना भाजपने उमेदवारी जाहीर केल्यावर श्री खडसे यांनी तब्बेतीचे कारण पुढे करत निवडणुकीतून अचानक माघार घेतली. तर भाजपमध्ये जाण्याचे पुन्हा संकेत दिले. यावरून सून रक्षा खडसे यांच्या विजयासाठी श्री खडसे पुन्हा ताकद उभी करतील हे सांगण्यासाठी कोणत्या ज्योतिषाची गरज नाही. 

प्रस्थापितांविरुद्ध  सामान्य उमेदवारात लढत 

भाजपच्या उमेदवार रक्षा खडसे या तिसऱ्यांदा लोकसभेची निवडणूक लढत आहेत. तर राजकारणाचा प्रदीर्घ अनुभव असलेले माजी मंत्री एकनाथराव खडसे हे त्यांच्या पाठीशी भक्कमपणे पुन्हा यावेळीही उभे राहतील यात शंका नाही. प्रतिस्पर्धी राष्ट्रवादीचे उमेदवार श्रीराम पाटील हे सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील आहेत. मोटार सायकल मेकॅनिक ते उद्योजक हा त्यांचा जीवन प्रवास नागरिकांनी जवळून अनुभवला आहे. यामाध्यमातून त्यांनी सर्वच समाजातील जनसामान्यांचा गोतावळा तयार केला आहे. साधी ग्रामपंचायतीची निवडणूक लढण्याचा त्यांना अनुभव नसताना पक्षाने त्यांना थेट लोकसभेच्या निवडणुकीत उतरवून भाजपसमोर कडवे आव्हान उभे केले आहे. हा शरद पवारांचा पॉवर गेम आहे. सुनेच्या विजयासाठी एकनाथराव खडसे पुन्हा भाजप प्रवेश करणार आहे. मात्र त्यांचा या निवडणुकीत कितपत फायदा रक्षा खडसे यांना होईल हे निवडणूक निकालानंतरच समजणार आहे. 

रक्षा खडसेंपुढे अनेक आव्हाने 

तिसऱ्यांदा निवडणूक लढणाऱ्या विद्यमान खासदार रक्षा खडसे यांना पक्षातील अंतर्गत नाराजीचा सामना करावा लागणार आहे. भाजपचे जिल्हाध्यक्ष अमोल जावळे यांना उमेदवारी मिळेल असे त्यांच्या कार्यकर्त्यांना अपेक्षित होते. मात्र हि उमेदवारी रक्षा खडसे यांना दिल्याने यावल तालुक्यातील भाजपच्या पदाधिकाऱ्यांमध्ये नाराजीचा सूर आहे. नाराजी नाही असे वरवर पदाधिकारी सांगत असले तरी प्रत्यक्षात उमेदवाराच्या विजयासाठी या पदाधिकाऱ्यांकडून कितपत प्रयत्न होतील हा संशोधनाचा विषय आहे. एकनाथराव खडसे यांची सत्ताकाळात प्रतिस्पर्ध्यांना नामोहरण करण्याची भूमिका होती. या भूमिकेमुळे भाजपसह महायुतीतील घटक पक्षांचे अनेक राजकीय पदाधिकारी दुखावलेले आहेत. याचा परिणाम उमेदवाराच्या जय पराजयावर होईल. मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील यांचे खडसे परिवाराशी असलेलले वैर सर्वश्रुत आहे. त्यामुळे आमदार पाटील महायुतीचा धर्म पाळतील का ? याबाबत सांशकता आहे. चोपड्याच्या आमदार लता सोनवणे यांच्या आमदार अपात्र प्रकरणाला जिल्ह्यातील एका नेत्याच्या विरोधाची किनार आहे. तर भुसावळचे माजी आमदार संतोष चौधरी यांची उमेदवारी कापण्यामागे श्री खडसे असल्याचा आरोप चौधरी यांचा आहे. रावेर तालुक्यातील भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता आहे. रक्षा खडसे यांच्या भोवती केवळ "लाभार्थी" कार्यकर्त्यांची गर्दी असते. तालुक्यातील भाजपचे अनेक पदाधिकारी खासदार खडसे यांच्या कामावर समाधानी नसल्याचा सूर रावेर तालुक्यातील भाजप पदाधिकाऱ्यांमध्ये आहे. रावेरचा भाजप पक्ष दोन चार लोक चालवतात असे पदाधिकारी आता उघडपणे बोलत आहेत. या नाराज पदाधिकाऱ्यांची नाराजी श्रीमती खडसे यांना वेळीच दूर करावी लागणार आहे. अन्यथा त्याचा विपरीत परिणाम मताधिक्य घटण्यावर होण्याची शक्यता नाकारता येत नाही. 

खासदार खडसेंबद्दल नाराजीची करणे

*दहा वर्षापूर्वी मेगा रिचार्ज प्रकल्प पूर्ण करण्याचे दिलेले आश्वासन दहा वर्षांच्या काळात पूर्ण होऊ शकलेले नाही.  *सर्वसामान्य जनतेशी थेट संपर्क व सुसंवादाचा अभाव. * केळी पीक विम्याची रक्कम अद्यापही बहुसंख्य शेतकऱ्यांना मिळालेली नाही.  * पक्षाच्या विशिष्ट पदाधिकाऱ्यांशीच संपर्क ,कार्यकर्ते नाराज  * रावेर रेल्वे स्टेशनवर मागणी केलेल्या प्रवाशी गाड्यांना थांबा देता आला नाही. *केळीवर प्रक्रिया उद्योग दहा वर्षात उभारता आला नाही.  *कोरोना काळानंतर बंद केलेला किसान रेल्वे रॅक पुन्हा सूरु करता आला नाही. * अंकलेश्र्वर-बऱ्हाणपूर राष्ट्रीय महामार्गातून रावेर शहराला वगळण्यात आल्याने नागरिकांमध्ये असलेली नाराजी  * मागणी नसताना अंतूर्ली शिवरातून महामार्ग वळविण्यात आल्याने मुक्ताईनगर तालुक्यातील शेतकऱ्यांची नाराजी.

श्रीराम पाटील यांच्या जमेच्या बाजू

* प्रतिस्पर्धी भाजपच्या उमेदवार रक्षा खडसे यांच्या नणंद व राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे यांनी भावजयी विरूद्ध घेतलेला आक्रमक पवित्रा. * उमेदवार श्रीराम पाटील यांच्या प्रचारात रोहिणी खडसे यांचा सहभाग व विजयासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न. *महाविकास आघाडीचे उमेदवार उद्योजक श्रीराम पाटील हे नवखे आहेत. घराण्याला कोणताही राजकीय वारसा नाही.  *कोरी पाटी असा हा उमेदवार असून स्वतः उद्योजक असल्याने त्यांच्याकडे विकासाचे व्हिजन आहे.  *व्यवसायाच्या माध्यमातून ग्रामीण भागातील सर्वच समाजातील जनतेशी त्यांचा असलेला दांडगा जनसंपर्क.  *आमदार शिरीष चौधरींचे मार्गदर्शन त्यांच्यासाठी जमेची बाजू आहे. *राजकीय पदाधिकारी नसल्याने जनेतेत सहानुभूती. * भाजपमधील नाराजीचा लाभ होऊ शकतो. * मतदार संघातील अनेक युवकांना रोजगार उपलब्ध करून दिलेला आहे. * टीका करण्यासाठी विरोधकांकडे एकही मुद्दा नाही. *मतदार संघाचा सर्वांगीण विकास हेच ध्येय.