गोपनीय बैठक : रावेर तालुका खरेदी विक्री संघाच्या चेअरमनपदी निलेश चौधरी तर व्हॉईस चेअरमनपदी उर्मिला पाटील यांची वर्णी लागण्याची शक्यता

आगामी पाच वर्षांच्या काळात कोणाला केव्हा संधी मिळणार

प्रतिनिधी /रावेर

येथील रावेर तालुका खरेदी विक्री संघाच्या चेअरमन व व्हॉईस चेअरमन पदासाठी उद्या बुधवारी निवडणूक होत असून चेअरमन पदावर निलेश साहेबराव चौधरी तर व्हॉईस चेअरमन पदावर उर्मिला चंद्रकांत पाटील यांची वर्णी लागण्याची शक्यता आहे. संघाच्या आगामी पाच वर्षांच्या काळात कोणाला केव्हा संधी द्यायची यासाठी मंगळवारी एका बैठकीत नियोजन करण्यात आल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे. 

संघाच्या कार्यालयात माजी आमदार अरुण पाटील, राष्ट्रवादी किसान सेलचे (शरद पवार गट) जिल्हाध्यक्ष सोपान पाटील, डॉ राजेंद्र पाटील, अर्जुन पाटील, पी आर पाटील, किशोर पाटील, राजेंद्र चौधरी, वाय व्ही पाटील जिजाबराव चौधरी यांच्यासह नवनिर्वाचित संचालकांची गोपनीय बैठक झाली.या बैठकीत उद्या होणाऱ्या चेअरमन व व्हॉईस चेअरमन पदासाठी चर्चा झाली. त्यात चेअरमन पदासाठी निलेश चौधरी यांच्या नावावर शिक्कमोर्तब झाले. मात्र व्हॉईस चेअरमन पदासाठी कोणाच्याच नावावर एकमत होत नसल्याने अखेर चिठ्ठ्या काढण्यात आल्या. त्यात उर्मिला पाटील यांच्या नावाची चिठ्ठी निघाल्याने या पदावर त्यांची वर्णी लागण्याची शक्यता आहे. दरम्यान आगामी पाच वर्षांच्या काळासाठी या बैठकीत नियोजन करण्यात आले असल्याचे समजते. त्यात निलेश चौधरी यांना पाहिले दोन वर्ष, नितीन पाटील यांना तिसरे एक वर्ष, लक्ष्मण मोपारी यांना चौथे एक वर्ष व रमेश अण्णाजी पाटील व किशोर पाटील यांना पाचव्या वर्षी प्रत्येकी सहा महिने चेअरमनपद मिळण्याची शक्यता आहे. तर व्हॉईस चेअरमन पदासाठी प्रथम उर्मिला पाटील, बिसन सपकाळ, यशवंत महाजन, पुरुषोत्तम पाटील, सिताराम महाजन, नीलकंठ चौधरी व ज्ञानेश्वर धनगर यांची या क्रमाने वर्णी लागण्याची विश्वसनीय माहिती मिळाली आहे. 

व्हॉईस चेअरमन पदासाठी चढाओढ

प्रथम व्हॉईस चेअरमन पदासाठी आपल्याला संधी मिळावी यासाठी काही संचालकांमधे चढाओढ झाल्याचे समजते. या पदासाठी एकमत होत नसल्याचे लक्षात आल्यावर बैठकीच्या प्रमुखांनी प्रत्येकाच्या नावाच्या चिठ्ठ्या टाकून त्यानुसार संधी देण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय सर्व संचालकांनी मान्य केल्यावर चिठ्ठ्या टाकून नियोजन करण्यात आले. या बैठकीची गोपनीयता पाळण्यात आली होती. मात्र पत्रकरांपर्यंत ही माहिती अखेर पोहचलाच.