खेळखंडोबा : सेटलमेंटच्या प्रयत्नावर फिरले पाणी : पकडलेले डंपर अखेर कारवाईसाठी तहसील कार्यालयात जमा

उद्या प्रांतधिकारी कार्यालयाकडे कारवाईसाठी अहवाल जाणार

खेळखंडोबा : सेटलमेंटच्या प्रयत्नावर फिरले पाणी :  पकडलेले डंपर अखेर  कारवाईसाठी तहसील कार्यालयात जमा

प्रतिनिधी / रावेर

शनिवारी खिरोदा-रोझोदा रस्त्यावर अवैध गौण खनिजाची वाहतूक करणारे डंपर महसूलच्या अधिकाऱ्यांनी पकडले. मात्र कारवाईच्या नावाखाली दबाव निर्माण करीत आर्थिक सेटलमेंट करण्याचा प्रयत्न महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी काही स्थानिक मध्यस्थामार्फत करण्याचा प्रयत्न केला. यासाठी सावदा पोलीस ठाण्याच्या आवारात डंपर उभे करण्यात आले. मात्र रविवारी रात्री याचा भंडाफोड कृषिसेवक न्यूज नेटवर्कने केल्यावर महसूल यंत्रणा खडबडून जागी झाली. अखेर या प्रकरणाचा खेळखंडोबा झाल्याचे लक्षात येताच हे डंपर कारवाईसाठी आज तहसील कार्यालयात आणण्यात आले आहे. या डंपरवर दंडात्मक कारवाईसाठी अहवाल तयार करण्यात आला असून तो उद्या प्रांताधिकारी कार्यालयाकडे पाठविण्यात येणार आहे.

शनिवारी सकाळी खिरोदा-रोझोदा रस्त्यावर खिरोदा येथील मंडळ अधिकारी अमोल चौधरी यांनी गौण खनिजाची अवैध वाहतूक करणारे एक डंपर पकडले. हे डंपर कारवाईसाठी मंडळ अधिकाऱ्याने ताब्यात घेतल्यावर ते तहसील कार्यालय किंवा सावदा पोलीस स्टेशनच्या आवारात लावणे क्रमप्राप्त होते. मात्र हे डंपर आर्थिक सेटलमेंट करण्यासाठी मस्कावद रस्त्याजवळील ख्वाजानगर जवळ नेण्यात आले होते. त्याचवेळी पकडलेल्या डंपरवर कारवाई न करता सोडून देण्यासाठी आर्थिक सेटलमेंट करण्याचा प्रयत्न शनिवारी व रविवारी गोपनीय बैठकीच्या माध्यमातून झाला. यासाठी महसूल विभागातील अधिकारी, मंडळ अधिकारी, व मध्यस्थ यांची संयुक्त बैठक सावदा येथील विश्रामगृहावर झाली. मात्र यात तडजोड न झाल्याने अखेर डंपरवर कारवाईचा दबाव निर्माण करण्यासाठी अखेर हे डंपर सावदा पोलीस ठाण्याच्या आवारात लावण्यात आले होते. शनिवार व रविवार असे दोन दिवस हे डंपर पोलीस ठाण्याच्या आवारात उभे करून ठेवण्यात आले होते. शनिवारी पकडलेल्या डंपरवर महसूल विभागाकडून तात्काळ कारवाई होणे अपेक्षित होते. मात्र कारवाईच्या नावाखाली दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न सुरु होता. रविवारी रात्री याबाबतचे वृत्त प्रकाशित होताच महसूल विभागाचे अधिकारी सावध झाले. त्यांनी दोन दिवसापासून सावदा पोलीस ठाण्याच्या आवारात उभे असलेले डंपर यंत्रणेच्या माध्यमातून आज तहसील कार्यालयात जमा केले आहे .

तडजोडीचे प्रयत्न असफल 

दोन दिवसापासून सुरु असलेले आर्थिक तडजोडीचे प्रयत्न वृत्त प्रकाशित झाल्याने असफल ठरले. तर महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी प्रकरण अंगलट येऊ नये म्हणून आज डंपर सावदा येथून रावेर तहसील कार्यालयात आणले आहे. 

कारवाईसाठी अहवाल तयार  

शनिवारी पकडलेले डंपर जप्त करून तहसील कार्यालयाच्या आवारात जमा करण्यात आले आहे. कारवाईसाठी अहवाल तयार करण्यात आला असून उद्या प्रांतधिकारी कार्यालयाकडे पाठविण्यात येणार आहे.

-- बी ए कापसे, तहसीलदार रावेर