महसूल अधिकाऱ्यांच्या आर्थिक सेटलमेंटच्या हालचाली : पकडलेले अवैध गौण खनिज वाहतूक करणारे डंपर कारवाईच्या नावाखाली सावदा पोलीस ठाण्याच्या बाहेर दोन दिवसापासून उभे
प्रांतधिकाऱ्यांनी कारवाई करावी

प्रतिनिधी / रावेर
शनिवारी( दि 1 मार्च ) खिरोदा-रोझोदा रस्त्यावर अवैध गौण खनिजाची वाहतूक करणारे एक डंपर खिरोदा मंडळ अधिकाऱ्यांनी पकडले. मात्र या डंपरवर कारवाई न करता आर्थिक सेटलमेंट करण्याच्या महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांकडून मध्यस्थ्यांच्या माध्यमातून हालचाली सुरु आहेत. याबाबत महसूल विभागाचे दोन अधिकारी व मध्यस्थ यांची सावदा येथील शासकीय विश्रामगृहावर काल गोपनीय एक बैठक झाल्याची माहिती विश्वासनीय सूत्रांनी दिली आहे. कारवाई न करता कारवाईच्या नावाखाली पकडलेले डंपर मंडळ अधिकाऱ्याने दोन दिवसापासून सावदा पोलीस ठाण्याच्या बाहेर उभे करून ठेवले असून आर्थिक सेटलमेंटच्या हालचाली सुरु आहेत.
शनिवारी सकाळी खिरोदा-रोझोदा रस्त्यावर खिरोदा येथील मंडळ अधिकारी अमोल चौधरी यांनी गौण खनिजाची अवैध वाहतूक करणारे एक डंपर पकडले. हे डंपर कारवाईसाठी मंडळ अधिकाऱ्याने ताब्यात घेतल्यावर ते तहसील कार्यालय किंवा सावदा पोलीस स्टेशनच्या आवारात लावणे क्रमप्राप्त होते. मात्र हे डंपर आर्थिक सेटलमेंट करण्यासाठी मस्कावद रस्त्याजवळील ख्वाजानगर जवळ नेण्यात एकांत जागेत नेण्यात आले.
सेटलमेंटसाठी गोपनीय बैठक
पकडलेले डंपर कारवाई न करता सोडून देण्यासाठी आर्थिक सेटलमेंट करण्याचा प्रयत्न झाला. महसूल विभागातील अधिकारी, मंडळ अधिकारी, व मध्यस्थ यांची संयुक्त बैठक काल सावदा येथील विश्रामगृहावर झाली. मात्र यात तडजोड न झाल्याने अखेर डंपर मालकावर कारवाईचा दबाव निर्माण करण्यासाठी अखेर हे डंपर सावदा पोलीस ठाण्याच्या आवारात लावण्यात आले आहे. काल सकाळी पकडलेल्या या डंपरवर महसूल विभागाने कालच कारवाई करणे अपेक्षित होते. मात्र कारवाईच्या नावाखाली दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न महसूल अधिकारी व मध्यस्थांकडून सुरु आहे. या प्रकाराची रावेर तालुक्यात चर्चा सुरु आहे. अवैध गौण खनिजाची वाहतूक करणारे पकडलेले डंपर कारवाई न करता दोन दिवसापासून उभे करून ठेवण्यामागील महसूल अधिकाऱ्यांचा हेतू नेमका काय आहे ? हे समजण्या एवढी जनता दूधखुळी नाही. प्रांतधिकारी बबनराव काकडे हे कर्तव्यनिष्ठ व प्रामाणिक अधिकारी म्हणून प्रशासनात कार्यरत आहेत. त्यांनी या प्रकाराची गांभीर्याने दखल घेवून डंपरवर कारवाई करण्यासह आर्थिक सेटलमेंटच्या माध्यमातून शासनाचा महसूल बुडवणाऱ्या "घर का भेदी" असणाऱ्या अधिकाऱ्यांची खातेनिहाय चौकशी करून कारवाई करावी.
"काल पकडलेले डंपर सावदा पोलीस ठाण्याच्या आवारात उभे करण्यात आले आहे. अद्याप कारवाई अथवा गुन्हा दाखल केलेला नाही. कारवाईची प्रक्रिया सुरु आहे."
-- अमोल चौधरी, मंडळ अधिकारी खिरोदा
"महसूल विभागाने सुरक्षिततेच्या कारणास्तव डंपर पोलीस ठाण्याच्या आवारात लावलेले आहे. याबाबत अद्यापतरी कोणताही गुन्हा दाखल नाही. डंपरवर महसूल विभाग कारवाई करेल."
--- विशाल पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक सावदा