नगरपालिका निवडणूक : रावेरला नगराध्यक्ष पदासाठी 13 तर नगरसेवक पदासाठी 121 अर्ज दाखल
भाजपतर्फे रॅलीद्वारे उद्या शक्तीप्रदर्शन
प्रतिनिधी/रावेर
रावेर नगरपालिकेची निवडणूक 2 डिसेंबरला होत असून नामनिर्देशन पत्र दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे. नगराध्यक्ष पदासाठी आतापर्यंत एकूण 13 अर्ज दाखल झालेले आहेत. तर नगरसेवक पदासाठी 12 प्रभागातील 24 जागासाठी आजपर्यंत एकूण 121 अर्ज दाखल झाल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार बी ए कापसे यांनी दिली.
नगरपालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी अवघा एक दिवस शिल्लक असल्याने आज रविवारी इच्छुकांची अर्ज दाखल करण्यासाठी मोठी गर्दी उसळली. गेल्या चार दिवसातील अर्ज दाखल करण्याचा आज विक्रम मोडला. नगरपालिकेच्या परिसरात उमेदवारी दाखल करणारे व त्यांच्या समर्थकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली होती. प्रथमच तरुण व नवख्यांचा उमेदवारी अर्ज दाखल करणाऱ्यांमध्ये समावेश दिसून येत आहे. तर जुन्या प्रस्थापितांची यावेळी कसोटी लागणार आहे. भारतीय जनता पक्षातर्फे ही निवडणूक पक्षीय चिन्हावर लढली जात असल्याने प्रतिस्पर्धी उमेद्वारांपुढे कडवे आव्हान उभे राहण्याची अधिक शक्यता आहे.
निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरु असून आजपर्यंत नगराध्यक्ष पदासाठी एकूण 13 महिला उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केलेले आहेत. तर 12 प्रभागातील एकूण 24 नगरसेवक पदासाठी आतापर्यंत एकूण 121 उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले आहेत. नगराध्यक्ष पदाचे 13 व नगरसेवक पदाचे 121 असे एकूण 134 उमेदवारी आजअखेर दाखल झालेले आहेत. नगराध्यक्ष पदासाठी आज 8 महिला उमेदवारांनी अर्ज दाखल केले असून नगरसेवक पदासाठी 64 उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून बी.ए. कापसे काम पाहत असून प्रभारी मुख्याधिकारी सतीश पुदाके हे सहकार्य करीत आहेत.
उमेदवारी अर्जासाठी उद्या शेवटचा दिवस
आज रविवार असतांना सुद्धा नगराध्यक्ष पदासाठी 8 तर सदस्यासाठी 64 असे एकूण 72 उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची उद्या अंतिम तारीख असून उद्या इच्छुकांची त्यांच्या समर्थकांसह मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे. भारतीय जनता पक्षातर्फे उद्या नगराध्यक्ष व सदस्य पदासाठी अधिकृत उमेदवारी दाखल करण्यात येणार आहे. यावेळी पाराचा गणपती मंदिरापासून भव्य रॅलीद्वारे शक्तिप्रदर्शन होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

krushisewak 
