राजकारण : रावेर नगराध्यक्षपदासाठी ५ तर नगरसेवक पदासाठी ५७ अर्ज दाखल

नगराध्यक्ष पदाची संधी कोणाला ?

राजकारण : रावेर नगराध्यक्षपदासाठी ५ तर नगरसेवक पदासाठी ५७ अर्ज दाखल

प्रतिनिधी/रावेर

रावेर नगरपालिकेची निवडणूक २ डिसेंबरला होत असून नामनिर्देशन पत्र दाखल करण्याची प्रक्रिया १० नोव्हेंबरपासून सुरु आहे. नगराध्यक्ष पदासाठी आतापर्यंत एकूण ५ अर्ज दाखल झालेले आहेत. तर नगरसेवक पदासाठी १२ प्रभागातून आजपर्यंत एकूण ५७ अर्ज दाखल झाल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार बी ए कापसे यांनी दिली.

रावेर नगरपालिकेचा निवडणुकीचा आखाडा तापायला सुरवात झाली आहे. मोठ्या प्रमाणावर इच्छुकांची भाऊगर्दी यावेळी होण्याची चिन्हे दिसत आहेत. प्रथमच तरुण व नवख्यांचा उमेदवारी अर्ज दाखल करणाऱ्यांमध्ये समावेश दिसून येत आहे. तर जुन्या प्रस्थापितांची यावेळी कसोटी लागणार आहे. भारतीय जनता पक्षातर्फे ही निवडणूक पक्षीय चिन्हावर लढली जात असल्याने प्रतिस्पर्धी उमेद्वारांपुढे कडवे आव्हान उभे राहण्याची अधिक शक्यता आहे.

निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरु असून आजपर्यंत नगराध्यक्ष पदासाठी डॉ सौ. योगिता संदीप पाटील, वाजीदाबी शेख सादिक, सौ. नलिनी पद्माकर महाजन, सौ. संगीता भास्कर महाजन, व हमीदाबी अय्युब या पाच महिला उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केलेले आहेत. तर १२ प्रभागातील एकूण २४ नगरसेवक पदासाठी १३ नोव्हेंबरला २, १४ नोव्हेंबरला १६ व आज (दि.१५) ३९ असे आतापर्यंत एकूण ५७ उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले आहेत. नगराध्यक्ष पदाचे ५ व नगरसेवक पदाचे ५७ असे एकूण ६२ उमेदवारी आजअखेर दाखल झालेले आहेत. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून बी.ए.कापसे काम पाहत असून प्रभारी मुख्याधिकारी सतीश पुदाके हे सहकार्य करीत आहेत.