रिक्षा पलटी झाल्याने मजूर महिलेचा मृत्यू ; चार जण जखमी
रावेर-बऱ्हाणपूर रस्त्यावर घडला अपघात
कृषीसेवक न्यूज नेटवर्क / रावेर
मजूर घेऊन जाणारी रिक्षा पलटी झाल्याने एका महिलेचा मृत्यू झाला आहे. तर चार जण जखमी झाले असून दोन्ही महिला गंभीर आहेत. सुनंदा गुलाब तायडे (वय ६० ) रा तामसवाडी ता रावेर असे मृत्यू झालेल्या महिला मजुराचे नाव आहे.
गुरुवारी दिवसभर केळीचे घड वाहण्याचे मजुरीचे काम आटोपून तामसवाडी येथील मजूर आपे रिक्षाने रावेरवरून तामसवाडी येथील घराकडे जात होते. बऱ्हाणपूर रस्त्यावरील बालाजी तोल काट्याजवळ हा अपघात झाला आहे. खड्डा चुकवण्याचा प्रयत्नात चालकाचे नियंत्रण सुटल्याने रिक्षा पलटी झाली. हि घटना गुरुवारी संध्यकाळी सात वाजता घडली. या अपघातात सुंनदा गुलाब तायडे हि मजूर महिला गंभीर जखमी झाली होती. तिच्यावर ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू असतानाच तिचा मृत्यू झाला. तर सुलोचना हिरामण रायमळे, रंजना पंडित रायमळे, राजू लक्ष्मण रायमळे, प्रवीण प्रकाश रायमळे हे चौघे जण जखमी झाले आहेत. सुलोचना रायमळे व रंजना रायमळे यांच्यावर बऱ्हाणपूर येथील तर राजू व प्रवीण रायमळे यांच्यावर रावेर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. येथील पोलीस ठाण्यात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला असून रिक्षा चालकाला ताब्यात घेतल्याची माहिती पोलीस निरीक्षक कैलास नागरे यांनी दिली. नागरे यांच्या मार्गदशनाखाली पीएसआय इस्माईल शेख करीत आहेत.