रावेर/ प्रतिनिधी
तालुक्यातील कोचुर खुर्द येथील तत्कालीन अपात्र सरपंच ज्योती कोळी यांच्या जात प्रमाणपत्राची चौकशी करून गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी येथील ग्रामपंचायत सदस्य कविता पाटील, गणेश महाजन, प्रशांत तायडे, लिलाबाई तायडे यांनी तहसीलदार व जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे. त्यामुळे तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.
कोचुर खुर्द येथील ग्रामपंचायतीच्या अनुसूचित जमाती जागेच्या आरक्षणावर ज्योती संतोष कोळी सरपंचपदी निवडून आल्या होत्या. त्यांनी एसटी टोकरे कोळी जातीचा दाखला यासाठी दिला होता. मात्र हा दाखला अस्तित्वात नसून शासकीय दप्तरी याची नोंद आढळून आलेली नसल्याची माहिती संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. अनुसूचित जमाती आरक्षित जागेवर जातीचा बोगस दाखला दाखल करून श्रीमती कोळी यांनी निवडणूक लढवून निवडणूक निर्णय अधिकारी यांची फसवणूक केलेली आहे. याबाबत ग्रामपंचायत सदस्य लिलाबाई तायडे यांनी जिल्हाधिकारी जळगाव यांच्याकडे तक्रार दाखल करून ज्योती संतोष कोळी यांनी मुदतीत जात वैधता प्रमाणपत्र सादर केलेले नसल्यामुळे त्यांना पदावरून अपात्र करण्याची मागणी केली होती. त्यानुसार सुनावणीवेळी सबळ पुरावे सादर न केल्याने ज्योती कोळी यांना जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी अपात्र घोषित केले होते.
तहसीलदारांकडे माहिती नाही
सरपंच ज्योती कोळी यांनी तत्कालीन जळगाव तहसीलदार यांच्या स्वाक्षरीचे निवडणूक लढण्यासाठी अनुसूचित जातीचे प्रमाणपत्र रावेर तहसील येथे दिले होते. परंतु, माहितीच्या अधिकारात प्राप्त झालेल्या माहितीनुसार ज्योती कोळी यांना जळगाव तहसील कार्यालयातून जात प्रमाणपत्र दिले नसल्याची माहिती समोर आली आहे.
बोगस जात प्रमाणपत्र
वेळेत जात वैधता प्रमाणपत्र सादर न केल्याने 30 एप्रिलला तत्कालीन सरपंच ज्योती कोळी या अपात्र झाल्या होत्या. परंतु, शासनाच्या नवीन आदेशानुसार नव्याने सरपंचपद बहाल करण्याचा आदेश जिल्हाधिकारी यांनी पारित केला आहे. या आदेशानुसार ज्योती कोळी या सरपंचपदी विराजमान झालेल्या आहे. मात्र त्यांनी निवडणुकीत अस्तित्वात नसलेला जातीचा बोगस दाखला जोडून विजयी झालेल्या आहेत. अस्तित्वात नसलेला बोगस बनावट जातीचा दाखल्यावर निवडणूक लढवून शासनाची फसवणूक केल्या प्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा अशी मागणी कोचुर खुर्द ग्रामपंचायत सदस्य कविता पाटील, गणेश महाजन, प्रशांत तायडे, लिलाबाई तायडे यांनी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद व तहसीलदार बी ए कापसे यांच्याकडे केली आहे.