एकाला हात, दुसऱ्याला बाय करत तिसऱ्याशी घरोब्यासाठी रफूचक्कर : दोघे मित्र राहिले बिनलग्नाचे
रावेर तालुक्यातील घटना

प्रतिनिधी / रावेर
प्रेमाचे सूत कुठे कुणाशी आणी कसे जुळेल हे आजच्या काळात काही सांगता येत नाही. दोघे जिवलग मित्र. दोघेही एकाच ठिकाणी भाड्याच्या घरात कामानिमित्त राहत होते. याच भागातील एका युवतीशी त्यातील एकाचे प्रेमाचे सूत जुळले. या दोघांनी मुलीला पळून जाऊन विवाहासाठी तयार केले. त्यांनी नाशिक सोडून स्वतःचे गाव गाठले. मात्र दोघांचेही लग्न झालेले नसल्याने मीच या मुलीशी लग्न करीन असा पवित्रा दोघा मित्रांनी घेतला. या तरुणीसमोरच वादविवादापासून सुरु झालेले दोघा मित्रांचे भांडण हात घाईवर येत रस्त्यावर आले. या ठिकाणी जमलेल्या गर्दीत तरुणीचा नात्यातला एक युवक भेटला. घटनेची माहिती तरुणीकडून ऐकून घेतली व तरुणीला त्याच ठिकाणी लग्नाची मागणी घातली. तरुणीनेही दोघा मित्रामधील प्रकार पाहता नात्यातल्या तरुणासोबत लग्नाचा निर्णय घेत तेथून काढता पाय घेतला. ही घटना रावेर तालुक्यातील एका गावात घडल्याने याची संपूर्ण तालुक्यात चर्चा सुरु आहे.
रावेर तालुक्यातील रहिवासी असलेल्या दोघा मित्रांचे चारपाच वर्षांपासून लग्न होत नव्हते. नोकरी व शेती नसल्याने कोणी मुली द्यायला तयार नव्हते. त्यामुळे या दोघांनी कामाच्या शोधात नाशिक गाठले. या ठिकाणी त्यांना कामही मिळाल्याने एक घर भाड्याने घेवून त्यांचा दिनक्रम सुरळीत सुरु होता. काही दिवसानंतर याच भागात राहणाऱ्या एका युवतीशी त्यांची ओळख झाली. ओळखीतून या दोघा मित्रांच्या व तरुणीच्या भेटीगाठी वाढल्या. ओळखीचेव भेटीगाठीचे रूपांतर एकाच्या प्रेमात झाले. तोपर्यंत सारे काही ठीक होते. प्रियकर मित्राने गाव गाठून या तरुणीशी लग्न करण्याचा निर्णय दुसऱ्या मित्राला सांगितला. दोन्ही मित्र व तरुणीने थेट नाशिकवरून रावेर तालुक्यातील गाव गाठले. दोघांच्या लग्नाच्या दृष्टीने हालचाली सुरु झाल्या. मात्र नियतीला वेगळेच काही मंजूर होते. दुसऱ्या मित्राने
लग्नासाठी बाशिंग बांधून तयार असलेल्या त्याच्या मित्राला या तरुणीसोबत विवाहाला विरोध केला. व मीच या तरुणीशी लग्न करीन असा पवित्रा घेतला. ओळख करण्यापासून तर प्रत्येक भेटीवेळी मी सुद्धा सोबत होतो. त्यामुळे मीच लग्न करील अशी भूमिका दुसऱ्या मित्राने घेतली. व दोघा मित्रांमध्ये वादाला सुरुवात झाली. वाद वाढत जाऊन रस्त्यावर येत हात घाईपर्यंत पोहचला. रस्त्यावर तरुणीच्या उपस्थितीत दोघा मित्रामध्ये सुरु असलेली शाब्दिक बाचाबाचीमुळे या ठिकाणी गर्दी जमली. याच गर्दीत तरुणीचा नात्यातला एक तरुण तेथे पोहचला. तरुणीला त्याने विचारपूस केल्यावर सर्व हकीकत तरुणाला ऐकवली. त्याचवेळी नात्यातल्या तरुणाने थेट त्याच ठिकाणी दोघा मित्रांसोबत आलेल्या तरुणीला लग्नाची मागणी घातली. दोघा मित्रांमध्ये घडलेला प्रकार पाहून तरुणीने नात्यातल्या तरुणाला जागेवरच होकार देत तेथून दोघांनी काढता पाय घेतला. नाशिक वरून लग्नासाठी पळून आलेली ही तरुणी तिसऱ्याच तरुणाला आपलेसे करत निघून गेली. पहिल्याला हात देत दुसऱ्याला टाटा करत तिसऱ्याशी घरोबा करण्यासाठी तरुणी रफूचक्कर झाल्याचा प्रकार यावेळी अनेकांनी पहिला. जेव्हा टी तरुणी तिसऱ्या मुलासोबत निघून गेल्याचे कळले तेव्हा या दोघा मित्रांनी मात्र हिरमुसलेल्या चेहऱ्याने घराकडची वाट पकडली. या घटनेची रावेर तालुक्यात एकच चर्चा सुरु आहे.