रावेर लोकसभा निवडणूक : एकनाथराव खडसे खरंच निवडणूक लढवतील की सुनेच्या उमेदवारीसाठी भाजपवर दबावतंत्राचा वापर ?

रावेर विधानसभेची निवडणूक होणार चौरंगी-पंचरंगी

रावेर लोकसभा निवडणूक : एकनाथराव खडसे खरंच निवडणूक लढवतील की सुनेच्या उमेदवारीसाठी भाजपवर दबावतंत्राचा वापर ?
कृष्णा पाटील/रावेर
लोकसभा व विधानसभा निवडणुकीची तयारी सर्वच राजकीय पक्षांनी सूरु केली असून रावेर लोकसभा व विधानसभा मतदार संघात राजकीय हालचालींना वेग आला आहे. नियमानुसार लोकसभेची निवडणूक विधानसभा निवडणुकीच्या आधी होणार असली तरी राज्यातील दररोज बदलणारी राजकीय स्थिती पाहता या दोन्ही निवडणुका एकाच वेळी होण्याची शक्यता राजकीय गोटातून वर्तवली जात आहे. सध्या रावेर लोकसभा मतदार संघाचे प्रतिनिधित्व भाजपच्या खासदार रक्षा खडसे करीत असून रावेर विधानसभा मतदार संघाचे प्रतिनिधित्व काँग्रसचे आमदार शिरिष चौधरी करीत आहेत. मात्र भाजपची रणनीती बदलती असल्याने येत्या लोकसभा निवडणुकीत विद्यमान खासदार रक्षा खडसे यांना पक्षातर्फे पुन्हा संधी मिळते की त्यांच्या ऐवजी नवीन चेहऱ्याला संधी दिली जाते हे निवडणुकीवेळी दिसणार आहे. दरम्यान, माजी मंत्री व एकनाथराव खडसे यांनी पक्षाने आदेश दिल्यास लोकसभेची रावेरमधून निवडणूक लढवू असे वक्तव्य केल्याने चर्चेला उधाण आले आहे. खडसे खरंच लोकसभेची निवडणूक लढवतील कि सुनबाई रक्षा खडसे यांना भाजपची उमेदवारी मिळण्यासाठी ही खेळी खेळत भाजपवर दबावतंत्राचा वापर करीत आहेत याचीही राजकीय वर्तुळात चर्चा सुरु आहे. रावेर विधानसभा निवडणुकीसाठी अपक्षांसह विविध राजकीय पक्षांचे किमान अर्धा डझन उमेदवार इच्छूक आहेत.

रावेर लोकसभा मतदार संघ ठरणार लक्षवेधी
भाजपच्या खासदार रक्षा खडसे या सध्या रावेर लोकसभा मतदार संघाच्या विद्यमान खासदार आहेत. २०१४ व २०१९ अशा सलग दोन निवडणुकीत श्रीमती खडसे यांनी विजय मिळवला आहे. या मतदार संघातून श्रीमती खडसे यांनी २०१४ मध्ये राष्ट्रवादीचे उमेदवार मनीष जैन यांचा पराभव केला होता. यावेळी रावेर लोकसभा मतदार संघाची जागा राष्ट्रवादीला सोडण्यात आल्याने काँग्रेसचे माजी खासदार डॉ उल्हास पाटील यांनी अपक्ष निवडणुक लढवली होती. मात्र त्यात त्यांचा पराभव झाला होता. तर २०१९ मध्ये भाजपतर्फे रक्षा खडसे यांच्यावर पक्षाने विश्वास दाखवत पुन्हा त्यांना उमेदवारी दिली होती.  त्यावेळी आघाडीची ही जागा काँग्रेसला सोडण्यात आल्याने रक्षा खडसे विरूद्ध डॉ उल्हास पाटील अशी लढत झाली होती. त्यात खडसे यांचा विजय झाला होता. मात्र त्यावेळी रक्षा खडसे यांचे सासरे व माजी मंत्री एकनाथराव खडसे हे भाजपमध्ये होते. त्यांची मोठी शक्ती सून रक्षा खडसे यांच्या विजयासाठी कामी आली होती. मात्र आता माजी मंत्री खडसे यांनी भाजपची वाट सोडून राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. त्यामुळे खडसे यांची भूमिका यावेळी निर्णायक ठरणार आहे. तर भाजपतर्फे येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत पुन्हा एकदा रक्षा खडसे यांच्यावर विश्वास दाखवत त्यांना उमेदवारी दिली जाते की त्यांच्या ऐवजी नवीन चेहऱ्याला संधी दिली जाते हे निवडणुकीवेळी दिसणार आहे. 
खडसे निवडणुक लढणार की भाजपवर दबावाचा प्रयत्न
राष्ट्रवादीचे नेते व राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत जळगाव येथे झालेल्या राष्ट्रवादीच्या मेळाव्यात प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी रावेर लोकसभेची जबाबदारी एकनाथराव खडसे यांनी घ्यावी असे विधान केले होते. हाच धागा पकडून माजी मंत्री व सध्या राष्ट्रवादीचे नेते असलेल्या खडसे यांनी पक्षाने आदेश दिल्यास रावेर लोकसभेची निवडणूक लढवू असे सांगून राजकारणातील वातावरण गरम करून टाकले आहे. जर समजा राष्ट्रवादीने एकनाथराव खडसे यांना रावेर लोकसभा मतदार संघातून उमेदवारी दिली तर भाजप नेमकी कोणती राजकीय खेळी खेळणार याची या मतदार संघातील नागरिकांमध्ये उत्सुकता आहे. भाजपने तिसऱ्यांदा रक्षा खडसे यांना उमेदवारी दिली व राष्ट्रवादीतर्फे एकनाथराव खडसे उमेदवार असल्यास सासरे विरूद्ध सून अशी लढत होण्याची शक्यता आहे. मात्र भाजप अशी खेळी खेळणार नाही. रक्षा खडसे यांच्या ऐवजी भाजप एकनाथराव खडसे यांचे कट्टर विरोधक व राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांना खडसे यांच्या विरोधात रिंगणात उतरवण्याची शक्यता नाकारता येत नाही. मात्र महाजन केंद्रात जाण्यास फारसे उत्सुक नाहीत. परंतु अशा परिस्थितीत पक्षाने आदेश दिल्यास त्यांना नाकारता येणार नाही. तर भाजपतर्फे माजी खासदार स्व हरिभाऊ जावळे यांचे सुपुत्र अमोल जावळे, पक्षाचे लोकसभा क्षेत्र प्रमुख नंदकिशोर महाजन हे पदाधिकारी या निवडणुकीसाठी इच्छुक आहेत. दरम्यान, भाजपने रक्षा खडसे यांना उमेदवारी द्यावी यासाठी भाजपवर दबाव निर्माण करण्यासाठी राष्ट्रवादीच्या उमेदवारीच्या माध्यमातून गुगली टाकण्याचा एकनाथराव खडसे यांचा हा प्रयत्न असावा अशीही चर्चा मतदारांमध्ये आहे. ही माजी मंत्री खडसे यांची राजकीय खेळी असू शकते. कारण खडसे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्यावर ते काही महिन्यांपूर्वीच विधान परिषदेवर निवडून आलेले आहेत. त्यांचा किमान पाच वर्षांचा कालावधी बाकी आहे. त्यामुळे ते लोकसभा निवडणुकीत उतरण्याची शक्यता जवळजवळ नसल्यासारखीच आहे. भाजपने रक्षा खडसे यांना उमेदवारी दिल्यास सून म्हणून एकनाथराव खडसे यांचा निवडणुकीत फारसा हस्तक्षेप व विरोध राहणार नाही असे काही जाणकारांचे मत आहे. याउलट ते सुनेच्या विजयासाठी अप्रत्यक्षरीत्या पडद्यामागून प्रयत्नच करतील असेही बोलले जात आहे. या जागेवर असाही दावा काँग्रसने केलेला असल्याने महाविकास आघाडीत ही जागा काँग्रेसला सुटू शकते. त्यामुळे राष्ट्रवादीकडून उमेदवारी देण्याचा प्रश्नच येत नाही. मात्र महाविकास आघाडी न झाल्यास परिस्थिती वेगळी राहू शकते. गेल्या दहा वर्षात रक्षा खडसे यांनी मतदार संघातील केंद्र सरकारच्या माध्यमातून अनेक प्रश्न सोडविण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न केलेला आहे ही त्यांच्यासाठी जमेची बाजू  आहे. मात्र रावेर लोकसभा मतदार संघाचे ठिकाण असलेल्या रावेर रेल्वे स्टेशनवर सुरू असलेला महानगरी एक्स्प्रेसचा बंद केलेला थांबा तसेच सचखंड एक्स्प्रेस, दानापुर-पुणे एक्स्प्रेस या गाड्यांना वर्षानुवर्षापासून प्रवाशांनी केलेल्या थांब्याच्या मागणीला रक्षा खडसे न्याय देवू शकल्या नाहीत याबद्दल मतदार संघातील असंख्य प्रवाशांची नाराजी आहे. तिसऱ्यांदा निवडणुक लढविण्यासाठी रक्षा खडसे यांनी पूर्व तयारी सुरू केली आहे.
भाजपचे प्राबल्य पण मतदारांमध्ये नाराजी

रावेर लोकसभा मतदार संघातील रावेर, भुसावळ, जामनेर, चोपडा, मुक्ताईनगर, मलकापूर या सहा विधानसभा मतदार संघापैकी रावेर व मलकापूर वगळता चार विधानसभा मतदार संघात भाजप-शिंदे गटाचे प्राबल्य आहे. पूर्वीचा जळगाव व अताचा रावेर लोकसभा मतदार संघ हा एखादा अपवाद वगळता आतापर्यंत भाजपचा बालेकिल्ला राहिलेला आहे. मात्र वाढत्या महागाईने केंद्र सरकार व राज्य सरकार विरोधात मतदारांमध्ये असलेल्या नाराजीचा फटका यावेळी भाजपच्या उमेदवारास बसण्याची शक्यता नाकारता येत नाही.   

विधानसभेची निवडणूक चौरंगी-पंचरंगी होण्याची शक्यता 

रावेर विधानसभा मतदार संघाचे काँग्रेसचे आमदार शिरीष चौधरी हे सध्या विधानसभेत प्रतिनिधित्व करत आहेत. भाजपचे उमेदवार हरिभाऊ जावळे, अपक्ष उमेदवार अनिल चौधरी व काँग्रेसचे उमेदवार शिरिष चौधरी यांच्यात २०१९ मध्ये लढत झाली होती. त्यात शिरिष चौधरी यांचा विजय झाला होता. या निवडणुकीत अनिल चौधरी यांनी घेतलेली ४५ हजार मते नजरेआड करता येणार नाही. पहिल्याच निवडणुकीत अनिल चौधरी यांनी रावेर विधानसभा मतदार संघात राजकीय अस्तित्व दाखवून दिले आहे. तर उद्योजक श्रीराम पाटील यांनी त्यांच्या वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला विधानसभा निवडणूक अपक्ष लढण्याचे जाहीर केले आहे. त्या दृष्टीने त्यांच्या हालचाली व जनसंपर्क सुरू आहे. सार्वजनिक कार्यक्रम, आंदोलन अशा कार्यक्रमात आमदार शिरीष चौधरी, माजी आमदार अरूण पाटील, श्रीराम पाटील, अनिल चौधरी, डॉ कुंदन फेगडे, धनंजय चौधरी, सचिन पाटील उपस्थित राहून नागरिकांशी संवाद साधत आहेत. येणाऱ्या विधानसभेची निवडणूक चौरंगी होण्याची शक्यता आहे. या निवडणुकीत आमदार शिरीष चौधरी हे स्वतः काँग्रेसतर्फे पुन्हा निवडणुक रिंगणात उतरतील किंवा त्यांचे सुपुत्र धनंजय चौधरी यांना उतरवतील. भाजपतर्फे माजी आमदार स्व हरिभाऊ जावळे यांचे सुपुत्र अमोल जावळे, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा रंजना पाटील, यावलचे डॉ कुंदन फेगडे, फैजपुरचे माजी नगराध्यक्ष पांडुरंग सराफ, निलेश राणे हे इच्छुक आहेत. माजी आमदार अरूण पाटील हे सध्या राष्ट्रवादीत (शरद पवार गट) असून ते विधानसभा निवडणूक लढण्याच्या तयारीत आहेत. मात्र राज्यात महाविकास आघाडी असल्याने व रावेरची जागा काँग्रेसला असल्याने माजी आमदार श्री पाटील कोणत्या पक्षातर्फे निवडणुक लढतील याबाबत त्यांनी गोपनीयता पाळली आहे. अपक्ष उमेदवार म्हणून उद्योजक श्रीराम पाटील, प्रहार जनशक्ती पक्षातर्फे भुसावळचे माजी नगराध्यक्ष अनिल चौधरी, रावेर कृषी बाजार समितीचे सभापती सचिन पाटील हे विधानसभा निवडणुकीत उतरण्याची शक्यता आहे. पक्षाने जबाबदारी दिल्यास विधानसभेची निवडणूक लढवू असे बाजार समितीचे सभापती सचिन पाटील यांनी सांगितले. इच्छुक सर्वच उमेदवारांनी मतदारांच्या व विविध संस्थांच्या, संघटनांच्या पदाधिकाऱ्यांच्या भेटीगाठी घेऊन त्यांच्याशी चर्चा सुरू केली आहे. इच्छुकांकडून मतदारांशी संपर्क साधला जात आहे. येत्या विधानसभा निवडणुकीत इच्छुक उमेदवारांची संख्या अधिक राहणार असल्याने विद्यमान आमदार शिरीष चौधरी यांना त्यांचे अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी अधिक प्रयत्न करावे लागणार आहेत. त्यांच्यासाठी म्हणावी तितकी ही निवडणूक सोपी ठरणार नाही.  

--