गहुखेडा येथे शेतकऱ्यांना पाल कृषी विज्ञान केंद्रातर्फे ड्रोन फवारणीचे प्रात्यक्षिक : विकसित कृषी संकल्प अभियानाचा समारोप
कृषी तज्ञांचे विविध विषयांवर मार्गदर्शन

प्रतिनिधी / रावेर
गहुखेडा (ता. रावेर) येथे विकसित कृषी संकल्प अभियानाचा समारोप करण्यात आला. पाल येथील कृषी विज्ञान केंद्रातर्फे २९ मे ते १२ जूनपर्यंत कृषी विज्ञान केंद्राच्या कार्यक्षेत्रात विकसित कृषी संकल्प अभियान राबविण्यात आले. समारोप प्रसंगी शेतकऱ्यांना तज्ञांचे मार्गदर्शन व ड्रोन फवारणीचे प्रात्यक्षिक दाखवण्यात आले. येथील विठ्ठल मंदिरात समारोप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भाजपचे मुक्ताईनगर विधानसभा क्षेत्रप्रमुख शिवाजी पाटील होते. यावेळी व्यासपीठावर सातपुडा विकास मंडळाचे अध्यक्ष अशोक झांबरे, राजगुरुनगर येथील कांदा व लसून संशोधन केंद्राचे शास्त्रज्ञ डॉ हेमराज भंडारी, डॉ राधाकृष्णन, मुक्ताईनगर कृषी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ एस.डी. पाटील, डॉ. पाचारणे, अकोला पशुवैद्यकीय महाविद्यालयाचे सहाय्यक प्राध्यापक डॉ सुहास अमृतकर, साप्ताहिक कृषीसेवकचे संपादक कृष्णा पाटील, पाल कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख प्रा महेश महाजन, डॉ धीरज नेहेते, अतुल पाटील यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालया अंतर्गत भारतीय कृषी अनुसंधान परिषदेतर्फे संपूर्ण देशात खरीप हंगामापूर्वी शेतकऱ्यांपर्यंत आधुनिक तंत्रज्ञानाची जनजागृती करण्यासाठी हे अभियान राबविले गेले. अभियान काळात पाल कृषी विज्ञान केंद्रातर्फे कार्यक्षेत्रातील रावेर, यावल, मुक्ताईनगर, बोदवड, जामनेर, भुसावळ, चोपडा या तालुक्यात विविध मार्गदर्शक शिबिरे, चर्चासत्रे, पद्धत प्रात्याक्षिके, शासकीय योजनांची माहिती, नैसर्गिक शेती, ड्रोन प्रात्याक्षिके, नाविन्यपूर्ण पद्धतीने तंत्रज्ञानाचा प्रसार आदी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. या कालावधीत पाल केव्हीकेच्या अधिकाऱ्यांची टीम, कृषी तंत्रज्ञान प्रदर्शनयुक्त रथाच्या माध्यमातून कृषी विज्ञान केंद्राचे व इतर संशोधन संस्थांच्या शास्त्रज्ञानी प्रत्यक्ष शेतकऱ्यांशी संवाद साधला. यावेळी तज्ञांनी विविध विषयांवर मार्गदर्शन केले. उपस्थित शेतकऱ्यांना ड्रोनद्वारे फवारणीचे प्रात्यक्षिक दाखवण्यात आले. यावेळी प्रगतीशील शेतकरी तथा तापी माता कृषी विज्ञान मंडळ सुद्गावचे अध्यक्ष ज्ञानेश्वर पाटील, तापी माता दुध उत्पादक सोसायटी गहुखेडा चेअरमन निवृत्ती चौधरी, नारायण चौधरी, पितांबर पाटील, संतोष पाटील, अशोक पाटील, दत्तू पाटील, गहुखेडा सरपंच संगीता सुधाकर तायडे, उपसरपंच रामलाल चौधरी, पद्माकर पाटील दुसखेडा, रणगावचे माजी पोलीस पाटील बळीराम पाटील, विकास धनगर, किशोर लंके, बंटी तायडे यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.