सावदा बाजार समितीतील वृक्ष तोडीसंदर्भात गुन्हा दाखल करण्याची मागणी
मंदार पाटीलसह तिघा संचालकांनी सचिवांना दिले निवेदन
प्रतिनिधी / रावेर
रावेर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सावदा येथील सब मार्केट यार्डमधील अवैध वृक्षतोड प्रकरणी फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी बाजार समितीचे संचालक मंदार पाटील, सिंकदर तडवी व सविता पाटील यांनी केली आहे.
काय आहे प्रकरण ?
रावेर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सावदा येथे सब यार्ड आहे. या यार्डच्या आवारात असलेली दोन मोठी हिरवीगार वृक्ष अनधिकृतपणे ७ ऑक्टोबरला तोडण्यात आली. याबाबत बाजार समितीच्या संचालक मंडळाच्या बैठकीत कोणताही ठरव झालेला नाही. तसेच वृक्ष तोडण्यासंदर्भात वन विभागाची व नगरपालिकेची कोणतीही परवानगी घेतलेली नसताना या वृक्षांची कत्तल करण्यात येत असल्याचे संचालक मंदार पाटील यांना समजले. त्यांनी घटनास्थळी जाऊन सावदा उप बाजार समितीच्या सचिवांकडे चौकशी केली असता सभापती व सावदा उप समिती चेअरमन व सचिव गोपाळ महाजन यांनी वृक्ष तोडण्याचे सांगितले आहे असे सावदा सब यार्डचे सचिव नितीन महाजन यांनी सांगितले. तसेच उपसमिती चेअरमन सैय्यद असगर यांच्या निर्देशानुसार असलम नामक व्यक्तीला झाड तोडून नेण्याचे सांगण्यात आले होते. यापोटी बाजार समितीकडे १७ हजार रुपये जमा करण्यात येणार असल्याचे नितीन महाजन यांनी सांगितले असे संचालक मंदार पाटीलसह तिघांनी बाजार समितीचे सचिव गोपाळ महाजन यांना दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. याबाबत सचिव गोपाळ महाजन यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांचा फोन लागत नव्हता.
हा तर चोरीचा प्रकार
" बाजार समितीच्या संचालक मंडळाची परवानगी न घेता तसेच रीतसर कोणतीही रक्कम बाजार समितीकडे न भरता अनधिकृतपणे दोन वृक्षांची कत्तल करण्यात आली असून चोरीच्या मार्गाने हि झाडे विकण्याचा प्रयत्न करणाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करावेत अशी मागणी केली आहे."
मंदार पाटील, संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती रावेर