मुलाखत : जनतेच्या आग्रहास्तव राजकारणात येण्याचा निश्चय : श्रीराम पाटील
उद्योजक श्रीराम पाटील यांनी घेतला निर्णय
कृष्णा पाटील / रावेर
रावेर विधानसभा मतदार संघाचा अद्यापही पाहिजे तसा विकास झालेला नाही. आतापर्यंत अनेक लोकप्रतिनिधींनी त्यांच्या परीने विकासासाठी प्रयत्न केलेले असले तरी मतदारांचे, जनतेचे समाधान होईल अशी विकास कामे झालेली नाहीत. म्हणून या मतदार संघातील जनतेला आता बदल हवा आहे. मला राजकारणाचा वारसा नसताना या मतदार संघातील जनतेची माझ्याकडून विकास कामाबाबत मोठी अपेक्षा आहे. म्हणून जनतेच्या, मतदारांच्या आग्रहास्तव विधानसभेची अपक्ष स्वबळावर निवडणूक लढण्याचा मी निर्णय घेतला असल्याची माहिती उद्योजक व २०२४ च्या विधानसभेचे भावी उमेदवार श्रीराम पाटील यांनी साप्ताहिक कृषीसेवकला दिली. उद्योजक श्रीराम पाटील यांनी गुरुवारी रावेर विधानसभा निवडणूक स्वबळावर (अपक्ष) लढविण्याची घोषणा केली. यामुळे राजकीय क्षेत्रात हालचाली गतिमान झाल्या आहेत.
शेतकऱ्यांच्या हितासाठी गेल्या अनेक वर्षांपासून कृषी क्षेत्रात काम करत असताना रावेर मतदार संघातील जनतेशी, मतदारांशी जवळीक निर्माण झाली. नागरिकांच्या सुखदुःखात सहभागी होताना आपोआपच स्नेहबंध वाढीस लागला. आपला जवळचा माणूस म्हणून गरज असेल तेव्हा नागरिक संपर्क करीत होते. त्यांच्या अडीअडचणी समजून घेऊन त्या सोडविण्याला तात्काळ प्राधान्य दिले. हे करत असताना प्रत्यक्ष होणाऱ्या सुसंवादातून वेळोवेळी नागरिकांनी मतदार संघाच्या विकासाबाबत चर्चा केली. मतदार संघात असलेल्या समस्या, वर्षानुवर्षांपासून प्रलंबित असलेले प्रश्न सोडविण्याची गळ घातली. मात्र कोणतेही प्रश्न, समस्या सोडवायच्या असतील तर त्या शासन दरबारी प्रभावीपणे मांडणे तितकेच महत्वाचे आहे. यासाठी या यंत्रणेचा भाग होणे तेवढेच गरजेचे आहे. मग जनतेने लोकप्रतिनिधी व्हा अशी साद घातली आहे. माझ्याकडून असलेल्या जनतेच्या अपेक्षांची पूर्ती करण्यासाठी मी राजकीय क्षेत्रात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला. लोकप्रतिनिधित्वाची संधी जनतेने दिल्यास रावेर विधानसभा मतदार संघात विकास कामे करून या मतदार संघाचा चेहरा मोहरा बदलण्याचा मी मनापासून प्रयत्न करणार आहे.
जनतेची ताकद कायम पाठीशी
माझा जीवन संघर्ष रावेर यावल तालुक्यातील जनतेने पाहिलेला आहे. मेकॅनिक ते यशस्वी उद्योजकांपर्यंतच्या प्रवासाचे अनेक जण साक्षीदार आहेत. जनतेच्या पाठबळावरच हा प्रवास यशस्वी होऊ शकलेला आहे. मी या समाजाचं देणं लागतो या भावनेतून समाजकार्य करून गरजुंना वेळोवेळी मदतीचा हात देऊन त्यांना आधार दिला आहे. नागरिकांचे राजकारणापेक्षा विकासाला प्राधान्य आहे. प्रामाणिक व विश्वासू सहकारी म्हणून जनता कायम माझ्या पाठीशी उभी आहे. जनतेच्या बळावरच व सहकार्याने आयुष्याची भावी वाटचाल सुरु आहे. रावेर विधानसभा मतदार संघातील मतदार पुन्हा तितक्याच ताकदीनिशी येणाऱ्या २०२४ च्या विधानसभा निवडणुकीवेळी माझ्या पाठीशी उभे राहतील असा विश्वास उद्योजक व भावी उमेदवार श्रीराम पाटील यांनी व्यक्त केला आहे.
नेतृत्वाची संधी मिळेल
समाजात काम करीत असताना सच्चा, प्रामाणिकपणा व मेहनतीला कायम प्राधान्य दिले. त्यामुळेच जनतेचा माझ्यावरील विश्वास टिकून आहे. याच शिदोरीवर २०२४ च्या रावेर विधानसभा मतदार संघाच्या निवडणुकीत जनता नेतृत्वाची संधी दिल्याशिवाय राहणार नाही असा विश्वास श्रीराम पाटील यांनी व्यक्त केला आहे. रावेर मतदार संघाचा अधिक जोमाने विकास घडवायचा असेल तर माझ्या पाठीशी जनता पुन्हा एकदा ताकद उभी करेल यात कोणतीही माझ्या मनात शंका नाही.