BREAKING : रावेरला अतिक्रमाणावर हातोडा : पोलीस बंदोबस्तात 6 दुकानांचे अतिक्रमण जमीनदोस्त

निवडणुकीनंतर पालिकेची धडक कारवाई

BREAKING : रावेरला अतिक्रमाणावर हातोडा : पोलीस बंदोबस्तात 6 दुकानांचे अतिक्रमण जमीनदोस्त

प्रतिनिधी/रावेर

येथील नगरपालिका निवडणुकीच्या धामधुमीत पालिका प्रशासन यंत्रणा कामात व्यस्त असल्याची संधी साधत अतिक्रमण करणाऱ्यांनी तब्बल 6 दुकानांचे आरसीसी बांधकाम करून अतिक्रमण केले होते. तर काही दुकानांचे बांधकाम सुरु होते. नगरपालिकेकडे या संदर्भात तक्रार झाल्यावर पालिकेने आज पोलीस बंदोबस्तात अतिक्रमणावर हातोडा टाकत अतिक्रमित बांधकाम पाडण्याची कार्यवाही सुरु केली आहे. पालिका प्रशासनाने शहरातील इतर ठिकाणी झालेल्याअतिक्रमणांकडेही लक्ष द्यावे अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे. 

नगर पालिका हद्दीतील डॉ बाबासाहेब आंबेडकर चौकालगतच्या नाल्यात काही अज्ञात दुकानदारांनी आरसीसी कॉलम टाकून पक्के बांधकाम केलेले आहे. तर नगर पालिका निवडणुकीत अधिकारी व कर्मचारी व्यस्त असल्याची संधी साधून काही जण पक्के बांधकाम करीत असल्याचे मुख्याधिकारी सतीश पुदाके यांच्या निदर्शनास आले होते. अतिक्रमित बांधकाम सुरु असलेल्या जागांची प्रत्यक्ष पालिका कर्मचाऱ्यांनी पाहणी करून या ठिकाणी नोटीस चिटकवल्या होत्या. मात्र नोटिशीला उत्तर देण्यासाठी व याबाबत बाजू मांडण्यासाठी कोणीही न आल्याने अखेर मुख्याधिकारी पुदाके यांनी पथक नियुक्त करीत अतिक्रमित बांधकाम पाडण्याची आज पोलीस बंदोबस्तात कारवाई केली आहे. 

अतिक्रमण काढण्यासाठी पथक नियुक्त करण्यात आले असून पथक प्रमुख सुधीर माळी यांच्या नेतृत्वात गोपाळ राठोड, नितेश चांगरे, युवराज गोयल, प्रशांत कोकाटे,कुणाल पाटील अभिजित लबडे तुषार रायपूरकर, दीपक सुरवाडे, योगेश भोई, वाजीद खान, प्रदीप सदनशिव, शिवाजी महाजन, ललित महाजन, निलेश महाजन, वैभव नेहेते यांचा अतिक्रमण काढण्याच्या पथकात समावेश आहे. याशिवाय पोलीस निरीक्षक डॉ विशाल जयस्वाल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

निवडणुकीनंतर अतिक्रमणावर हातोडा

शहरात मोठया प्रमाणावर अतिक्रमण झालेले आहे. तसेच बिनबोभाटपणे अतिक्रमण केले जात आहे. निवडणुकीनंतर पालिकेने अतिक्रमण काढण्याची राबवलेली प्रक्रिया शहरात चर्चेचा विषय ठरली. अतिक्रमणस्थळी नागरिकांची मोठी गर्दी दिसून आली. शहरातील इतर भागातीलही अतिक्रमण पालिकेने काढावे अशी चर्चा याठिकाणी नागरिकांमध्ये सुरु होती