रावेरमध्ये हनीट्रॅपचा प्रकार : प्रतिष्ठित व्यक्तीला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून रक्कमेची मागणी: महिलेविरुद्ध खंडणीचा गुन्हा दाखल

पोलीस शोधणार पडद्यामागील सूत्रधार

रावेरमध्ये हनीट्रॅपचा प्रकार : प्रतिष्ठित व्यक्तीला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून रक्कमेची मागणी: महिलेविरुद्ध खंडणीचा गुन्हा दाखल

प्रतिनिधी / रावेर 

रावेर तालुक्यातील एका प्रतिष्ठित व्यक्तीला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून त्याच्याकडून लाखो रुपयांची खंडणी मागणाऱ्या एका महिलेविरुद्ध येथील पोलीस ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचे धागेदोरे कुठपर्यंत पोहचले आहेत याचा तपास पोलीस यंत्रणेने सुरु केला आहे. 

रावेर शहरातील बऱ्हाणपूर रस्त्यावरील एका कार्यालयाच्या मागे एका महिलेने रावेर तालुक्यातील एका प्रतिष्ठित व्यक्तीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून त्याच्याकडून वारंवार पैशांची मागणी केली होती. तसेच या महिलेने संबंधित व्यक्तीचे काही व्हिडीओ बनवीत पैसे न दिल्यास ते सोशल मीडियात व्हायरल करण्याची व बदनामी करण्याची सतत धमकी दिली होती. ही घटना 2/11/2018 ते 19/3/2025 या काळात घडली आहे. अखेर "त्या" महिलेच्या "या" प्रकाराला कंटाळून सदर व्यक्तीने पोलिसांना आपबीती सांगितली. यावरून सदर महिलेविरुद्ध फसवल्या गेलेल्या व्यक्तीने दिलेल्या फिर्यादीवरून खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रावेर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक डॉ विशाल जयस्वाल यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक अंकुश जाधव पुढील तपास करीत आहेत. 

धागेदोरे शोधणार पोलीस 

रावेर तालुक्यात हनी ट्रॅपचा हा घडलेला प्रकार असून यात आणखी कोणाकोणाचा सहभाग आहे, याचे धागेदोरे कुठपर्यंत पोहचले आहेत. आणखी किती जणांवर हा प्रयोग करण्यात सदर महिला यशस्वी झाली, याच पद्धतीने किती जणांची फसवणूक झाली आहे याचा तपास पोलीस यंत्रणा करणार आहे.