मुलाखत : रावेर शहराच्या आगामी २५ वर्षाच्या विकासाची ब्लू प्रिंट तयार ; नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार संगीता महाजन यांचे व्हिजन

देशातील आदर्श शहर बनविण्याचा निर्धार

मुलाखत : रावेर शहराच्या आगामी २५ वर्षाच्या विकासाची ब्लू प्रिंट तयार ; नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार संगीता महाजन यांचे व्हिजन

प्रतिनिधी/रावेर

रावेर शहरातील प्रत्येक घटकापर्यंत असलेला जनसंपर्क, सामाजिक कार्यात नेहमी असलेला पुढाकार, नागरिकांच्या सुखदुखात धावून जाऊन केली जाणारी मदत याचा वारसा व परंपरा माझ्या कुटुंबाला आहे. शहराचा गेल्या १० ते १५ वर्षात खुंटलेला विकास व त्यामुळे निर्माण झालेल्या समस्या भावी काळात सोडविण्यासाठी माझा प्रयत्न राहणार आहे. भाजपतर्फे नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार असलेल्या संगीता भास्कर महाजन यांची निवडणुकीबाबत असलेली भूमिका जाणून घेण्याचा प्रयत्न केला. यावेळी त्यांनी रावेर शहराच्या आगामी २५ वर्षाच्या विकासाची ब्लू प्रिंट आपल्याकडे तयार असून भविष्यात राज्यातीलच नव्हे तर देशातील आदर्श शहर बनविण्याचा आपला मानस असल्याचा विश्वास नगराध्यक्ष पदाच्या भाजपच्या उमेदवार संगीता महाजन यांनी व्यक्त केला.

उद्या(दि.२ डिसेंबर) येथील नगरपालिकेची निवडणूक होत आहे. लोकनियुक्त नगरध्यक्ष पदासाठी भाजप-शिवसेना युतीतर्फे संगीता भास्कर महाजन यांना अधिकृत उमेदवारी देण्यात आलेली आहे. शहराच्या विकासाबाबत त्यांची नेमकी काय संकल्पना आहे, त्यांचे याबाबतचे व्हिजन, असलेली भूमिका जाणून घेण्यासाठी त्यांच्याशी केलेली बातचीत...

पक्षाचा विश्वास असल्याने उमेदवारी

माझे कुटुंबीय सुरुवातीपासूनच भाजपचे कार्यकर्ते आहेत. पक्षावर असलेली अढळ निष्ठा, पक्षाच्या प्रत्येक कार्यक्रमात, सभा, मेळावे, निवडणुकीत असलेला सहभाग, पक्षाचे विचार तळागाळापर्यंत पोहचविण्यासाठी घेतलेली मेहनत व पक्षाशी मोठ्या प्रमाणावर जोडलेल्या कार्यकर्त्यांची टीम यासह पक्षश्रेष्ठींचा असलेला विश्वास यामुळे नगरध्यक्ष पदाच्या उमेदवारीची संधी मला दिली आहे. हा भाजपने माझ्यावर व माझ्या कुटुंबावर दाखवलेला विश्वास आहे असे संगीता महाजन यांनी यावेळी सांगितले.

सामाजिक सेवेचा कुटुंबाचा वसा

माझे जेठ श्री पद्माकर महाजन हे गेल्या अनेक वर्षापासून भाजप पक्षाचे सक्रीय कार्यकर्ते आहेत. पक्षाचे प्रामाणिकपणे काम करून पक्ष संघटन वाढीचे कार्य असो की, सभा मेळावे असो यात त्यांची भूमिका महत्वाची असते. रावेर शहरात जेव्हा भाजपचा झेंडा खांद्यावर घ्यायला कुणी धजावत नव्हते तेव्हा त्यांनी पक्षाचा झेंडा खांद्यावर घेवून संघटन वाढवले. तेव्हापासून शहरात व तालुक्यात भाजपचा विस्तार वाढत गेला व पक्षाला प्रत्येक निवडणुकीत यश मिळत गेले ही वस्तुस्थिती आहे. पद्माकर महाजन यांना सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय क्षेत्राची उत्तम जाण आहे. तर पती भास्कर महाजन हे सुद्धा अंबिका व्यायाम शाळेच्या माध्यमातून सांस्कृतिक, क्रीडा, सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर आहेत. अपघातग्रस्तांना तातडीची मदत, कोरोना काळात केलेली मदत, अनाथांना दिलेला मदतीचा हात, रुग्णांना केलेली मदत यासारख्या सामाजिक कार्यात माझ्या कुटुंबाचा नेहमीच पुढाकार राहिला आहे. सामाजिक कार्य करीत असतांना जातपात धर्म यांना त्यांनी कधीही थारा दिला नाही. त्यामुळे सर्वच समाजातील नागरिकांचे माझ्या कुटुंबाशी जिव्हाळ्याचे संबध आहेत. नागरिकांचा असलेला विश्वास याबळावरच निवडणुकीत भाजपला विजय मिळणार आहे असा विश्वास सौ. महाजन यांनी व्यक्त केला.  

शहराच्या विकासाची ब्लू प्रिंट

यापूर्वी नगरसेवक म्हणून काम केल्याचा मला अनुभव असल्याने पालिकेच्या माध्यमातून शहराचा विकास करण्यावर अधिक भर राहणार आहे. प्रत्येक घराला मुबलक व शुद्ध पाणीपुरवठा, शहरातील मुख्य व अंतर्गत रस्त्यांची दुरुस्ती, स्वच्छता व कचरा व्यवस्थापन, आधुनिक सार्वजनिक स्वच्छता गृहे, दिवाबत्ती व स्मार्ट पथदिवे, युवकांसाठी क्रीडासुविधा, गरजूंसाठी सुरक्षित, दर्जेदार घरे, जेष्ठांसाठी मनोरंजन केंद्र व बगीचा, आरोग्य सुविधा, वाहतूक व्यवस्थेवर नियंत्रणासाठी सिग्नल यंत्रणा, महिला सक्षमीकरण अद्ययावत बाजारपेठ, पर्यावरण संरक्षण, कचरा प्रक्रिया प्रकल्प ,नागरिक एप व तक्रार निवारण कक्ष, तसेच पालिकेचा जलद व पारदर्शक कारभार यासह अन्य विषयांवर विकासाची आगामी २५ वर्षाची ब्लू प्रिंट तयार करण्यात आली आहे. शहराच्या विकासासाठी पक्षाचे जेष्ठ नेते जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे, वस्त्रोद्योगमंत्री संजय सावकारे, रावेर मतदार संघाचे आमदार अमोल जावळे व शिवसेनेचे मंत्री तसेच आमदार यांच्या मार्गदर्शनात शहराच्या विकासाच्या योजना राबविल्या जाणार आहेत. यासाठी भाजापसेनेच्या पदाधिकाऱ्यांचे तसेच पद्माकर महाजन, पती भास्कर महाजन यांचे मार्गदर्शन मिळणार आहे.

विजयाचा कौल भाजपसेनेलाच

रावेर पालिका निवडणुकीत नगरध्यक्ष व नगरसेवक पदासाठी भाजपसेना युतीचे उमेदवार उभे असून मतदारांचा मोठा पाठींबा असल्याने सर्व उमेदवार विजयी होतील असा आशावाद नगरध्यक्ष पदाच्या उमेदवार संगीता भास्कर महाजन यांनी यावेळी व्यक्त केला. भाजपसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांचे परिश्रम भाजप सेनेच्या उमेदवारांना विजय मिळवून देण्यात यशस्वी होतील असा दावा संगीता महाजन यांनी यावेळी केला आहे.