झाडाझडती : आमदार अमोल जावळे यांच्याकडून भूमीअभिलेखच्या कर्मचाऱ्यांची झापाई : कार्यालयाच्या कारभाराची थेट राज्याच्या संचालकांकडे तक्रार : राज्याचे भूमिअभिलेख संचालक डॉ सुहास दिवसे यांचे चौकशी करून कारवाईचे संकेत

नागरिकांनी वाचला तक्रारींचा पाढा

झाडाझडती : आमदार अमोल जावळे यांच्याकडून भूमीअभिलेखच्या कर्मचाऱ्यांची झापाई  : कार्यालयाच्या कारभाराची थेट राज्याच्या संचालकांकडे तक्रार : राज्याचे भूमिअभिलेख संचालक डॉ सुहास दिवसे यांचे चौकशी करून कारवाईचे संकेत

प्रतिनिधी / रावेर

रावेर भूमिअभिलेख कार्यालयाबाबत नागरिकांच्या असंख्य तक्रारी असल्याने आमदार श्री जावळे यांनी आज दुपारी या कार्यालयाला अचानक भेट दिली. यावेळी कार्यरत असलेल्या २०ते २२ कर्मचाऱ्यांपैकी केवळ चार ते पाच कर्मचारी कार्यालयात उपस्थित होते. उप अधीक्षक आर एन तडवी उपस्थित नसल्याने त्यांचा कक्ष कुलुपबंद होता. कार्यालयाची श्री जावळे यांनी पाहणी केली.  त्यावेळी कार्यालयात सर्वत्र कागदाचे तुकडे, कचरा पडलेला होता. स्वच्छतेचा मोठा अभाव यावेळी दिसून आला. याबाबत उपस्थित कर्मचाऱ्यांना श्री जावळे यांनी चांगलेच खडे बोल सुनावत कानउघाडणी केली. तसेच कर्मचाऱ्यांच्या कारभाराबाबत राज्याचे भूमिअभिलेख विभागाचे संचालक डॉ सुहास दिवसे यांच्याकडे तक्रार केली आहे. यावेळी डॉ दिवसे यांनी या कार्यालयातील कर्मचाऱ्यांची चौकशी करून कारवाई करण्याचे आश्वासन आमदार श्री जावळे यांना दिले आहे. रावेर मतदार संघातील शासकीय कामकाजात सुधारणा व्हावी, जनतेची कामे वेळेवर व्हावीत या हेतूने आमदार अमोल जावळे शासकीय कार्यालयांना सरप्राईज व्हिजीट देत आहेत.   

आज दुपारी रावेर येथील तहसील कार्यालयात अधिकाऱ्यांच्या समन्वय बैठकीसाठी आमदार अमोल जावळे आले होते. बैठक संपल्यावर त्यांनी दुपारी चार वाजता थेट रसलपूर रस्त्यावरील भूमिअभिलेख कार्यालय गाठले. आमदार कार्यालयात येताच कर्मचाऱ्यांची धांदल उडाली. यावेळी त्यांनी प्रलंबित मोजणीच्या प्रकरणांची माहिती घेतली. हि प्रकरणे का प्रलंबित आहेत याची माहिती घेतांना श्री जावळे यांनी अर्जदार शेतकऱ्यांशी संपर्क साधला. आमदार भूमिअभिलेख कार्यालयात आल्याची माहिती अर्जदारांना समजताच  प्रतीक्षेत अनेक शेतकरी कार्यालयात आले. आलेल्या शेतकऱ्यांनी कर्मचाऱ्यांबाबत तक्रार केळी. तसेच पैसे घेवूनही कर्मचारी काम करत नसल्याचे सांगितले.

 

कर्मचाऱ्यांची झापाई

केवळ चार ते पाच कर्मचारी कार्यालयात उपस्थित असल्याने बाकीचे कर्मचारी कुठे आहेत असे विचारले असता दौऱ्यावर असल्याचे अंकात पाटील यांनी सांगितले. तेव्हा श्री जावळे यांनी हालचाल रजिस्टरची मागणी केली असता ते सापडत नसल्याचे उत्तर दिले. हालचाल रजिस्टर शोधा व आणा असा पवित्रा आमदारांनी घेतला. त्यावेळी एका कर्मचाऱ्याने चलाखी करत तात्काळ कोऱ्या कागदावर हालचाल रजिस्टर बनवून ते श्री जावळे यांच्यासमोर सादर केले. मूळ रजिस्टर आणा हि चलाखी बंद करा असे म्हणत श्री जावळे कर्मचाऱ्यांवर चांगलेच भडकले. तर हजेरी रजिस्टरमध्ये अनेक कर्मचाऱ्यांच्या पाच ते सहा दिवसापसुन सह्या नसल्याचे दिसून आले. याचा फोटो आमदारांनी काढला असून तो राज्याचे भूमिअभिलेख संचालक डॉ सुहास दिवसे यांच्याकडे कारवाईसाठी पाठविण्यात येणार आहे.

नागरिकांनी वाचला तक्रारींचा पाढा

आमदार अमोल जावळे भूमिअभिलेख कार्यालयात आल्याची माहिती शेतकऱ्यांना समजताच शेतकऱ्यांनी कार्यालय गाठले. यावेळी शेतकऱ्यांनी कार्यालयाच्या कारभाराबाबत जावळे यांच्यासमोर तीव्र संताप व्यक्त केला. तसेच कर्मचारी पैसे घेतल्याशिवाय काम करीत नसल्याच्या तक्रारीही केल्या आहेत. यावेळी भाजपचे जेष्ठ पदाधिकारी सुरेश धनके, शहर अध्यक्ष दिलीप पाटील, केऱ्हाळा येथील अमोल गणेश पाटील, मनोज श्रावक, देवेन शहा, यांच्यासह नागरिक शेतकरी उपस्थित होते.