एकदा संधी द्या, दोन वर्षात रावेरचा चेहरामोहरा बदलवून टाकतो : मंत्री गिरीष महाजन

रावेरला भाजपसेना युतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ सभा

एकदा संधी द्या, दोन वर्षात रावेरचा चेहरामोहरा बदलवून टाकतो : मंत्री गिरीष महाजन

प्रतिनिधी/रावेर

एकदा संधी द्या, दोन वर्षात रावेर शहराचा चेहरामोहरा बदलवून देतो असे आश्वासन जलसंपदा मंत्री गिरीष महाजन यांनी रावेरवासियांना दिले. भाजपसेना युतीच्या नगराध्यक्ष व नगरसेवक पदाच्या उमेदवाररांच्या प्रचारार्थ येथे आयोजित केलेल्या प्रचार सभेत ते मतदारांशी संवाद साधतांना बोलत होते. भारतमातेच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून सभेला सुरुवात करण्यात आली. यावेळी व्यासपीठावर आमदार अमोल जावळे, निवडणूक प्रभारी नंदकिशोर महाजन, माजी आमदार अरुण पाटील, जेष्ठ पदाधिकारी सुरेश धनके, महिला आघाडीच्या प्रदेश उपाध्यक्ष डॉ केतकी पाटील, पद्माकर महाजन, बाजार समितीचे सभापती प्रल्हाद पाटील, मंडळ अध्यक्ष रवींद्र पाटील, शिवसेनेचे राहुल पाटील, प्रवीण पंडीत, वाय व्ही पाटील, भास्कर महाजन, शीतल पाटील अनिल अग्रवाल यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी, नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार संगीता महाजन व नगरसेवक पदाचे सर्व उमेदवार उपस्थित होते. मंत्री गिरीष महाजन यांचे स्वागत पद्माकर महाजन यांनी केले तर आमदार अमोल जावळे यांचे स्वागत रवींद्र पाटील यांनी केले.

यावेळी मंत्री श्री महाजन यांनी केंद्रात व राज्यात भाजपचे सरकार आहे त्यामुळे शहराच्या विकासासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही. चांगल्या विचारांच्या लोकांना निवडून द्या शहराचा कायापालट करण्याची जबाबदारी माझी व आमदार अमोल जावळे यांची आहे असे सांगून भाजपसेना युतीच्या उमेदवारांना भरगोस मतांनी विजयी करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले. माजी खासदार स्व हरिभाऊ जावळे यांच्या संकल्पनेतील मेगा रिचार्ज प्रकल्पची दोन महिन्यात टेंडर प्रक्रियाहोणार असून यामुळे रावेर तालुका सुजलाम सुफलाम होणार असल्याचे यावेळी श्री महाजन यांनी सांगितले. रावेर शहराच्या विकासाची ब्लु प्रिंट तयार असून अनेक योजनाच्या माध्यमातून स्वच्छ, सुंदर शहराची संकल्पना अस्तित्वात आणायची आहे त्यासाठी नगरसेवक पालिका निवडणुकीत भाजप सेनेच्या उमेदवारांना विजयी करा असे आवाहन आमदार अमोल जावळे यांनी केले. 

स्थानिक पातळीवर सर्वांगीण विकासाच्या योजना पोहचवायच्या असतील तर तेथील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये सत्ताधारी पक्षाचे पदाधिकारी असले पाहिजे. सत्ताधारी पक्षाचे पदाधिकारी नगरपालिकेत सत्तेवर असल्याशिवाय विकासाला चालना मिळणार नाही. सामान्य माणसाला प्राथमिक सुविधा निर्माण करण्यासाठी राज्य व केंद्राच्या माध्यमातून अधिक निधी मिळवता येईल शहराची प्रगतीकरता येईल. यासाठी नगरपालिका निवडणुकीत भाजपसेनेच्या उमेदवारांना विजयी करा असे आवाहन माजी आमदार अरुण पाटील यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वासुदेव नरवाडे यांनी केले.