सन्मानाने गहीवरल्या शेतीतल्या दुर्गा : कुटुंब प्रमुखाची जबाबदारी सांभाळत शेतीत राबणाऱ्या २० भगिनींचा सन्मान
निंभोरा कृषी तंत्र विदयालयाचा पुढाकार
कृषीसेवक न्यूज नेटवर्क/निंभोरा
निंभोरा येथील कृषी तंत्र विद्यालयात एका उद्योगातर्फे शेतकरी प्रशिक्षण मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. याचे औचित्य साधून गावातील कुटूंब प्रमुखाची जबाबदारी सांभाळत उत्कृष्ट पद्धतीने शेती करणाऱ्या २० महिला शेतकऱ्यांचा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. जीवनात होणाऱ्या पहिल्या सन्मानाने सर्वच सन्मानार्थी महिला भारावून गेल्या. कंठ दाटून आल्याने व भावनावश झाल्याने त्यांच्या डोळ्यातून तरळलेले अश्रू मात्र लपून राहीले नाहीत.
निभोरा येथील कृषी तंत्र विद्यालयात शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी व्यासपीठावर एका उद्योगाचे मुंबई येथील व्यवस्थापक सयाजीराव पाटील, जळगाव येथील कृषीतज्ञ डॉ बी डी जडे, मुक्ताईनगर येथील कृषी महाविद्यालयाचे वरिष्ठ संशोधक डॉ.भरत मालुंजकर, आयसीएलचे आशिया प्रमुख डॉ शैलेंद्रसिंग, रावेर तालुका कृषी अधिकारी भाऊसाहेब वाळके, पंचायत समिती कृषी अधिकारी एल ए पाटील, कृषी तंत्र विद्यालयाचे अध्यक्ष प्रल्हाद बोंडे, केळी उत्पादक शेतकरी भास्कर पाटील, वैभव मोहोड, संदीप चव्हाण उपस्थित होते.
मेळाव्यात उपस्थित शेतकऱ्यांना डॉ शैलेंद्र सिंग यांनी केळी व्यवस्थापन, डॉ बी डी जडे यांनी मका व्यवस्थापन तर डॉ मालुंजकर यांनी तणनाशक व्यवस्थापन याबाबत मार्गदर्शन केले. निंभोरा व परिसरातून मोठ्या प्रमाणावर शेतकरी उपस्थित होते. यावेळी स्वतः शेतीत राबून उत्कृष्ट पद्धतीने शेती करणाऱ्या गावातील २० महिला शेतकऱ्यांचा या कार्यक्रमात सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुनिल कोंडे यांनी तर प्रास्ताविक वैभव मोहोड यांनी केले . आभार विवेक बोंडे यांनी मानले.
सन्मानाने दुर्गा गहिवरल्या
निंभोरा गावातील पुष्पाबाई आनंदा कोळंबे, मंगलाबाई नेमचंद भंगाळे, सुनंदा पद्माकर पाटील, रजनी मनोहर बोंडे, वैशाली धनराज खाचणे, सुनिता पद्माकर येवले, अनुसयाबाई काशिनाथ खाचणे, विमलबाई मुरलीधर महाजन, शीतल रणजित पवार, सुशिला सुधाकर कोळंबे, वैशाली नीळकंठ भंगाळे, कल्पना चंद्रकांत ब-हाटे, शकुंतला सुधाकर ब-हाटे, निर्मला विठ्ठल कोंडे, कलावती रघुनाथ दोडके, ममता महेश भंगाळे, प्रतिभा हिरामण ब-हाटे, देवकाबाई नंदकुमार दोडके, सुमनबाई भागवत बोरोले या महिला शेतकऱ्यांचा स्वतः कुटुंबप्रमुख म्हणून काम करताना सन्मान करण्यात आला. यावेळी अनेक महिलांना गहिवरून आले. मात्र त्यांच्या भावना शब्दातून व्यक्त होण्याऐवजी डोळ्यातील अश्रूच्या माध्यमातून व्यक्त झाल्या.
"उभ्या आयुष्यात काम करताना कोणी सत्कार करेल असे वाटले नव्हते, मात्र कृषी विद्यालय व आयोजकांनी केलेल्या सत्कार, सन्मानाने भावी काळात शेतीत अधिक काम करण्याची ऊर्जा मिळाली आहे."
पुष्पाबाई कोळंबे, निंभोरा