अंतुर्लीच्या भूमीपुत्राने कन्येच्या विवाहात राबविला अनोखा उपक्रम : उपस्थितांना भेट दिले १ हजार वृक्षाचे रोपटे व बियाण्याचे पाकीट
माफदाचे अध्यक्ष विनोद तराळ यांच्या कन्येचा आदर्श विवाह
कृष्णा पाटील / रावेर
विवाह सोहळा म्हटलं म्हणजे थाटमाट, बडेजावपणा बहुतांशी ठिकाणी दिसून येतो. मात्र याला फाटा देत लेकीच्या विवाहात नैसर्गिक समतोलपणा राखण्याचा व शेतकऱ्यांप्रती सामाजिक बांधिलकी जोपासण्याचा अनोखा उपक्रम अंतुर्ली (ता मुक्ताईनगर जि. जळगाव) येथील शेतकरी पुत्र विनोद तराळ यांनी राबविला आहे. विवाहात उपस्थित राहणाऱ्या पाहुणे मंडळींना १,००० वडाच्या वृक्षाचे रोपटे व तितकेच तुरीच्या बियाण्यांचे पाकीट त्यांनी विवाहप्रसंगी वधूवरांच्या हस्ते वितरित केले आहे. शेतकऱ्यांप्रती असलेले या भूमीपुत्राचे प्रेम या विवाह सोहळ्यातुन अधोरेखित झाले आहे. या विवाह सोहळ्याच्या निमित्ताने एक आदर्श वधूपिता विनोद तराळ यांनी समाजासमोर ठेवला आहे.
थाटमाट टाळून जोपासली सामाजिक बांधिलकी
अंतुर्ली येथील रहिवासी असलेले भूमिपुत्र व सीड्स -फर्टिलायझर-पेस्टीसाईड (माफदा-पुणे) या संघटनेचे राज्याचे अध्यक्ष विनोद तराळ यांची कन्या ऐश्वर्या हिचा विवाह रोशन देवकर यांच्यासोबत अंतुर्ली येथे पार पडला. विवाह सोहळ्यात मोठ्या प्रमाणावर थाटमाट व बडेजावपणावर खर्च केला जात असल्याचे आपण नेहमी पाहतो. मात्र हा विवाह सोहळा वधुपित्याचे शेतकऱ्यांप्रती असलेल्या प्रेमामुळे चर्चेचा विषय ठरला आहे. विवाह सोहळयाला उपस्थित राहणाऱ्या वऱ्हाडी व पाहुण्यासाठी साधी भारतीय बैठक व्यवस्था होती. लग्नात कुठलाही थाटमाट दिसून आला नाही. यामुळे खर्चात बचत झाली. बचत झालेली रक्कम तराळ कुटुंबीयांनी पाहुणे म्हणून विवाह सोहळ्याला उपस्थित राहिलेल्या शेतकऱ्यांना वडाचे रोपटे व तुरीच्या बियाण्याचे पाकीट भेट म्हणून देण्यावर खर्च केली.
१००० वडाचे रोपटे दिले भेट
तराळ कुटुंबियांची पिढ्यापिढ्यापासून शेतकऱ्यांशी बांधिलकी आहे. शेतकऱ्यांच्या सुखदुःखात धावून जात त्यांना मदतीसाठी तराळ कुटुंब नेहमीच अग्रेसर आहे. याच भावनेतून त्यांनी मुलीच्या विवाहप्रसंगी वृक्ष लागवड, संवर्धन व पर्यावरण जागृतीचा संदेश देत उपस्थित पाहुणे मंडळींना, शेतकऱ्यांना वडाच्या १,००० वृक्षांचे रोपटे भेट दिले आहे.याचबरोबर खरीप हंगाम लक्षात घेऊन १,००० तुरीच्या बियाण्यांची पाकिटे मोफत भेट दिली आहेत. प्रत्येक शेतकऱ्याने शेतात वडाचं रोपट लावावे यासाठी चक्क लग्न मंडपात वधूवराच्या हस्ते शेतकऱ्यांना वडाचं रोपटे व तुरीच्या बियाणायचे पाकीट भेट म्हणून देण्यात आले.
मंडपात जनजागृतीचे फलक
या विवाह सोहळ्यात 'झाडे लावा झाडे जगवा', दुष्काळाची नको असेल आपत्ती तर वेळीच जपा जलसंपत्ती', 'पाणी अडवा पाणी जिरवा' असे जनजागृतीपर फलक विवाह मंडपात लावण्यात आले होते. माजी मंत्री तथा आमदार एकनाथ खडसे यांच्यासह राजकीय तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर या सोहळ्याला उपस्थित होते. लग्न सोहळ्यातील या उपक्रमामुळे उपस्थित असलेले शेतकरी चांगलेच भारावले. शेतकऱ्यांनी विनोद तराळ आणि त्यांच्या कुटुंबाचं कौतुक करीत उपक्रमासाठी त्यांचे अभिनंदन केले आहे.
"भूमिपुत्रांशी असलेली माझ्या कुटुंबीयांची नाळ पिढ्यांपिढ्यापासून घट्ट आहे. मी शेतकऱ्यांच्या विकासासाठी व प्रगतीसाठी काम करीत आहे. सामाजिक बांधिकलीतून मुलीच्या विवाहप्रसंगी हा उपक्रम राबविला. शेतकऱ्यांना वृक्षाचे रोपटे व तुरीच्या बियाण्याची पाकिटे स्वतः खरेदी करून भेट दिली आहेत".
विनोद तराळ, भूमिपुत्र तथा अध्यक्ष, माफदा पुणे
"अतिशय साध्या पद्धतीने हा विवाह सोहळा पार पडला आहे. अतिरिक्त खर्च टाळून ती रक्कम शेतकऱ्यांप्रती असलेल्या बांधिकलीसाठी खर्च केली आहे. शेतकऱ्यांसाठी लग्न सोहळ्यात राबविण्यात आलेला उपक्रम अविस्मरणीय ठरला आहे. शेतकऱ्यांना आमच्या हाताने वडाचं रोपट आणि बियाणं देण्याचा आनंद पैशात मोजता येणार नाही".
---रोशन देवकर, वर .
.