खतांच्या लिंकिंगवर आळा घालावा, शेतकऱ्यांना लिंकिंगविना खते उपलब्ध करावीत : आमदार अमोल जावळेंची कृषीमंत्र्यांकडे मागणी
लिंकिंग करणाऱ्या कंपन्यांवर कारवाईची मागणी

प्रतिनिधी | रावेर
सध्या खरीप हंगामाला सुरुवात झाली असून पिकासाठी रासायनिक खतांची सध्या मोठ्या प्रमाणावर गरज भासत आहे. याचा फायदा घेत काही कंपन्यांकडून लिंकिंग करण्याचा प्रकार घडत आहे. तसेच खतांची यामुळे कृत्रिम टंचाई निर्माण झाली आहे. रावेर मतदार संघातील शेतकऱ्यांना युरिया व डीएपी या अत्यावश्यक खतांचा लिंकिंग विना शासनाने तात्काळ पुरवठा करावा तसेच लिंकिंग करणाऱ्या कंपन्यांवर कारवाई करावी अशी मागणी आमदार अमोल जावळे यांनी राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे व जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्याकडे निवेदनद्वारे केली आहे.
रावेर यावल तालुक्यात रासायनिक खतांचा तीव्र तुटवडा जाणवत आहे. लिंकिंग प्रणालीच्या अंमलबजावणीमुळे अनेक शेतकऱ्यांना वेळेवर खत मिळत नसल्याने खरीप हंगामावर प्रतिकूल परिणाम होत आहे. याची आमदार अमोल जावळे यांनी दखल घेवून कृषी मंत्री माणिकराव कोकाटे व जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांना निवेदन दिले आहे. लिंकिंग शिवाय युरिया व डीएपी खत तातडीने उपलब्ध करून देण्याची मागणी या निवेदनात केली आहे. शेतकऱ्यांना वेळेत आणि पुरेशा प्रमाणात खत मिळावे, यासाठी जिल्हा प्रशासनाने तत्काळ पावले उचलावीत आणि खत वितरणात लवचिकता ठेवावी, अशी आग्रही भूमिका आमदार जावळे यांनी मांडली आहे. तसेच लिंकिंग करणाऱ्या कंपन्यांवर कडक कायदेशीर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.