स्वयंनिर्मित वस्तूंमध्ये ममत्वाची भावना असणे तीच खरी ताकद आहे : आमदार अमोल जावळे
रोझोदा येथे महिला संघाची सभा संपन्न

प्रतिनिधी | रावेर
स्वयंनिर्मित उत्पादनांमध्ये नवतंत्रज्ञानाचा वापर केल्यास बाजारपेठेत चांगली मागणी असते. महिलांनी ही उत्पादने शहरांपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्नशील राहणे गरजेचे आहे. शहरातील विविध बचत गटांशी समन्वय साधून व्यवसायाची, व्याप्ती वाढवा. उत्पादनांची निर्मिती करताना मनाची एकाग्रता असल्याने या वस्तूंमध्ये ममत्वाची भावना असते.हीच तुमची खरी ताकद आहे. व्यवसाय करताना कुठलीही अडचण उद्भवली, तरी हा तुमचा लाडका भाऊ नेहमीच तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहील, असे आश्वासन आमदार अमोलभाऊ जावळे यांनी उपस्थित महिलांना दिले.
रोझोदा येथील श्री कामसिद्ध देवस्थान सभागृहात आयोजित सावित्रीबाई फुले महिला प्रभाग संघाच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ते व्यासपीठावरून बोलत होते. या वेळी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल, ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक राजू लोखंडे, गटविकास अधिकारी विनोद मेढे, प्रभाग संघाच्या अध्यक्षा पुष्पा कोळंबे, सचिव मनीषा भंगाळे, कोषाध्यक्ष सारिका वायकोळे, तसेच रझोदा ग्रामपंचायतीचे सरपंच पुष्कर फेगडे, माजी जिल्हा बॅंक संचालक गणेश नेहते, तालुका अध्यक्ष सूर्यकांत देशमुख, चेतन पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.
मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांनी महिलांना प्रोत्साहित करताना सांगितले, "कर्ज घेण्यास घाबरू नका. मोठी स्वप्न बघा, स्वतःवर विश्वास ठेवा आणि प्रयत्न सातत्याने करत रहा."प्रकल्प संचालक राजू लोखंडे म्हणाले, "उत्पादनांचे पॅकेजिंग आकर्षक आणि ब्रँडिंग प्रभावी असणे गरजेचे आहे, जेणेकरून ते बाजारात आपली ओळख निर्माण करू शकेल." कार्यक्रमाच्या निमित्ताने आमदार अमोल जावळे यांच्या हस्ते समुदाय गुंतवणूक निधीचे वाटप करण्यात आले. या प्रसंगी परिसरातील शेकडो बचत गटांच्या महिला उपस्थित होत्या. या सभेद्वारे महिलांच्या सक्षमीकरणाच्या दिशेने एक सकारात्मक ऊर्जा निर्माण झाली असून, स्वावलंबनाच्या प्रवासात हा टप्पा निर्णायक ठरेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.